मुंबई : अलिकडच्या मुलांना, अगदी दोन-तीन वर्षाच्या मुलांना मोबाईलची इतकी सवय झाली आहे की जेवताना वा झोपतानाही त्यांना मोबाईल हातात लागतो. त्यामध्ये वेगवेगळे कार्टून्स अथवा गेम्स असल्याने कळत नसलेली बालकेही त्याशिवाय राहू शकत नाहीत. मुलांना मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप शिवाय चैनच पडत नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या शारीरिक तसेच मानसिक आजारांना सामोरं जावं लागतंय. आता या स्क्रीन टाईम संबंधित इंडियन अॅकेडमी ऑफ पेड्रियाट्रिक्सने पालकांच्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. 


काय आहे स्क्रीन टाईम? त्याचा परिणाम काय होतोय? 
आपण दिवसभरात मोबाईल, टीव्ही, कम्युटर, लॅपटॉप किंवा इतर स्क्रीन असलेल्या डिव्हीइसच्या स्क्रीनकडे दिवसभरात किती वेळ पाहतोय, ती वेळ म्हणजे स्क्रीन टाईम होय. सध्या कोणती ना कोणती स्क्रीन मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. पण लहान मुले यावर प्रमाणापेक्षा जास्त वेळ घालवतात. त्यामुळे पालक तसेच आरोग्य तज्ज्ञ चिंतेत आहेत. 


स्क्रीनचा वापर आपल्या शैक्षणिक कामासाठी, व्यावसायिक कामासाठी किंवा आपल्या नातेवाईकांशी बोलण्यासाठी होत असेल तर तो चांगला आहे. तर गरज नसलेले टीव्ही शोज्, हिंसक व्हिडीओ गेम्स, असुरक्षित वेवसाईट्स चाळण्याकरता स्क्रीनचा वापर होत असेल तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने तो नकारात्मक आहे. 


मुलांनी किती वेळ स्क्रीनचा वापर करावा? 
दोन वर्षाच्या आतील मुलांनी कोणत्याही प्रकारच्या स्क्रीनचा वापर करू नये. जर नातेवाईकांशी व्हिडीओच्या माध्यमातून बोलायचं असेल तरच स्क्रीनचा वापर करावा. 
एक ते पाच वर्षाच्या मुलांनी एका तासापेक्षा जास्त स्क्रीनचा वापर करू नये. त्या पेक्षा जास्त वयाच्या मुलांनी आणि प्रौढांनी गरजेनुसार स्क्रीनचा वापर करावा. त्या व्यतिरिक्त किमान एक तास मैदानी खेळणे वा फिरणे ही सवय लावावी. तसेच पौगंडावस्थेतील बालकांनी किमान आठ ते नऊ तासांची झोप घ्यावी. 


बालकांनी स्क्रीनचा वापर जास्त केला तर त्याचे परिणाम काय होतील? 
बालकांनी स्क्रीनचा वापर जास्त केला तर डोकेदुखी, डोळेदुखी, अंगदुखी, निद्रानाश, मानदुखी, पाठीचा कणा दुखणे अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागतं. त्याव्यतिरिक्त, मुलांमध्ये चिडचिडेपण, आक्रमकता, हिंसा, लक्ष केंद्रीत न होणे, फोब्लो म्हणजे आपल्याला कोणीतरी सोडून जायची भीती असणे, पोर्नोग्रॅफी, आणि नैराश्य हे मानसिक रोग होऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या शैक्षणिक विकासावर परिणाम होऊ शकतो.


डिजिटल मीडियाचा काही फायदा आहे का? 
आपण स्क्रीनचा वापर संतुलित प्रमाणात करू शकतो. त्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्याला ज्ञान आणि माहिती मिळू शकते. स्मार्ट फोनमधील काही अॅप्स आहेत, ज्यांचा वापर केल्याने आपले आरोग्य कसे सुधारायचे त्याची माहिती मिळते.


मोबाईलचा वापर कोणत्या वयात करायचा?
दोन वर्षाच्या आतील मुलांनी मोबाईलचा वापर सुरू केला तर त्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या कौशल्यावर किंवा आपले नातेवाईक किंवा इतर लोकांशी एकरूप होण्याच्या कौशल्यावर परिणाम होतो. त्यामुळे या वयाच्या मुलांच्या हातात मोबाईल देऊ नये. पौगंडावस्थेत येणाऱ्या मुलांना साधा फोन द्यावा, जेणेकरून त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकेल. त्यांना केवळ शैक्षणिक वापरासाठीच स्मार्ट फोन्सचा वापर करू द्यावा. 


मुलांनी सोशल मीडियाचा वापर करावा का?
अलिकडच्या मुलांमध्ये फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअ्रप, इन्स्टाग्रामचा वापर करण्याचा कल वाढत आहे. त्याचे काही फायदे असले तरी या वयातील मुलांसाठी त्याचे तोटेच जास्त आहेत. त्यामुळे मुले पोर्नोग्राफीकडे वळू शकतात, पब्जी सारख्या गेम्सच्या आहारी जाऊन हिंसक होऊ शकतात, अनोळखी माणसांशी मैत्री करू शकतात, तसेच त्यांच्या लैंगिक अत्याचाराची शिकार बनू शकतात. त्यामुळे सोशल मीडियाचा कमीत कमी वापर करणे किंवा वापरच न करणे हे चांगलं आहे. 


मुलांचे ऑनलाईन वर्तन चांगलं कसं करायचं? 
मुलांना डिजिटल वस्तू वापरायला देण्यापूर्वी त्यांच्या पालकांनी त्यांना विश्वासात घ्यावं, त्यांच्याशी बोलावं. आपले खासगी फोटो, माहिती सोशल मीडियावर शेअर करु नयेत, सोशल मीडियातील आपली भाषा सभ्य असावी, अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करू नये या गोष्टी पालकांनी आपल्या मुलांना सांगितल्या पाहिजेत. 


स्क्रीनचा वापर चांगल्या प्रकारे करण्यासाठी काय करावं? 
स्क्रीनचा वापर कामापूरता करावा यासाठी पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. स्क्रीनचा वापर आणि आपले अन्न, खेळ आणि कुटुंबातील इतर व्यक्तींशी संवाद यामध्ये समतोलता राहिली पाहिजे. झोपण्यापूर्वी एक तास आधी स्क्रीनचा वापर करू नये. आपले पाल्य सोशल मीडियावर काय करत आहे यावर पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे. 


20-20-20 सूत्राचे पालन करावे
स्क्रीनचा वापर करताना स्क्रीन ही डोळ्यांच्या दिशेच्या थोडी खाली असली पाहिजे. त्यामुळे मनक्याचा त्रास होत नाही. तसेच स्क्रीनचा वापर करताना 20-20-20 या सूत्राचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामध्ये दर 20 मिनीटांनी 20 सेकंदाचा ब्रेक घेणे आणि 20 फूट लांबच्या एखाद्या वस्तूकडे पाहणे हा मार्ग अवलंबला पाहिजे. त्यामुळे तुमचे आरोग्य संतुलित राहण्यात मदत होईल. 


मुले मीडिया अॅडिक्ट झालेत ते कसं समजायचं?
आपली मुले जर मीडिया अॅडिक्ट झाली असतील तर ती सातत्याने मोबाईलचा वापर करत राहतात. जर त्यांना ते थांबवण्यास सांगितलं तर ती आक्रमक होतात. मित्रांशी किंवा घरच्यांशी बोलत नाहीत. ती कायम मोबाईलमध्येत गुंतून राहतील आणि हे धोकादायक आहे. 


पालकांनी स्क्रीनचा वापर कमी करणे आवश्यक
मुलांचा  स्क्रीनचा वापर कमी करायचा असेल तर पहिल्यांदा पालकांना त्याचा वापर कमी करावा. त्यामुळ मुलांसमोर एक आदर्श निर्माण होऊ शकेल. त्याचा परिणाम मुले स्क्रीनचा वापर कमी करतील आणि त्यामुळे येणारी नकारात्मकता बाजूला सारता येईल.


महत्वाच्या बातम्या :