Indian National Calendar 2022: जगभरात नवीन वर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार (Gregorian Calendar) सुरू होतो. ब्रिटिश लोक याला आपल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा भाग मानतात. ब्रिटीश साम्राज्याने जवळजवळ सर्वत्र राज्य केले असल्याने, ग्रेगोरियन कॅलेंडरला जगभरात मान्यता मिळाली आहे. परंतु प्रत्येक देशाच्या स्वतःच्या संस्कृतीनुसार स्वतंत्र कालगणना आणि स्वतःची स्वतंत्र दिनदर्शिका असते. एका आकडेवारीनुसार, जगात 96 प्रकारचे कॅलेंडर आहेत. एकट्या भारतात 36 कॅलेंडर किंवा पंचांग आहेत. त्यापैकी 12 आजही वापरात आहेत. तर 24 हे चलनाच्या बाहेर झाले आहेत. या बातमीद्वारे आपण भारताच्या 'राष्ट्रीय कॅलेंडर'बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार नवीन वर्ष कधीपासून सुरू होणार आहे, हे देखील जाणून घेणार आहोत. 


भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरची सुरुवात कधी झाली? 


हे एक सौर कॅलेंडर आहे. भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरला 1957 मध्ये अधिकृत मान्यता मिळाली. हे कॅलेंडर शक संवतावर आधारित आहे. चैत्र हा यातील पहिला महिना असून ग्रेगोरियन कॅलेंडरच्या सोबतच हे कॅलेंडरही पुढे सरकत असतो. या कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरुवात मार्च-एप्रिलमध्ये चैत्र महिना आला की होते. गुढीपाडवा, नवरात्री हे सण नववर्ष म्हणून साजरे केले जातात. 


कसं तयार झालं हे अधिकृत कॅलेंडर?


नोव्हेंबर 1952 मध्ये भारत सरकारने प्रोफेसर 'मेघनाद साहा' यांच्या अध्यक्षतेखाली एक कॅलेंडर सुधारणा समिती स्थापन केली होती. ज्यांच्या शिफारशींवर एक राष्ट्रीय दिनदर्शिका तयार केली जाण्याचे काम सुरू झाले. या समितीने ग्रेगोरियन कॅलेंडरच्या तारखांसह सौर दिनदर्शिका अधिकृत कारणांसाठी वापरण्याची शिफारस केली. यासोबतच समितीने आणखी अनेक शिफारशी केल्या, ज्या सरकारने स्वीकारल्या. त्यानंतर हे अधिकृत कॅलेंडर तयार करण्यात आले.


सौर आणि लुनार कॅलेंडर


भारतात दोन प्रकारचे कॅलेंडर वापरले जातात. एक सौर आणि दुसरे म्हणजे लुनार कॅलेंडर. भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर खगोलशास्त्र केंद्राने तयार केले असून हे सौर कॅलेंडर आहे. यामध्ये शक युगाचा वापर करण्यात आला आहे. असेच ग्रेगोरियन कॅलेंडर आहे जे जानेवारी महिन्यापासून सुरू होते. हे कॅलेंडर देशभरात अचूक कॅलेंडर डेटा म्हणून वापरले जाते. शक युगाच्या वर्षातील प्रत्येक महिन्याच्या दिवसाची लांबी राष्ट्रीय कॅलेंडरमध्ये निश्चित आहे. राष्ट्रीय पंचांग 1879 शक संवत (1957-58 वर्ष) पासून खगोलशास्त्र केंद्राद्वारे प्रकाशित केले जात आहे.


कसे असतात महिने? कोणत्या महिन्यात किती दिवस?


या कॅलेंडरमध्येही 12 महिने असतात. ज्यात चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, अग्रहायण, पौष, माघ आणि फाल्गुन यांचा समावेश होतो. याच्या पहिल्या सहा महिन्यात 31 दिवस असतात तर दुसऱ्या सहा महिन्यात 30 दिवस असतात.


कधी होणार नवीन वर्षाची सुरुवात?


चैत्र हा भारतीय राष्ट्रीय कॅलेंडरचा पहिला महिना आहे. भारतात अनेक सण या कॅलेंडरनुसार साजरे केले जातात. महाराष्ट्रात गुढीपाडव्याला नववर्ष साजरा करतात.   


राष्ट्रीय कॅलेंडरनुसार चालते सरकारी कामकाज  


भारताच्या राष्ट्रीय कॅलेंडरनुसार भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या आणि भारतीय संसदेच्या कामकाजात केले जाते. तसेच भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू याच कॅलेंडरचा वापर करतात. नेपाळमधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली.