Independence Day 2024 : 15 ऑगस्ट हा दिवस भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा दिवस आहे, कारण याच दिवशी भारताला ब्रिटीशाच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले. खरं तर 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीश राजवटीपासून दोन स्वतंत्र राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळाले, त्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन देश बनले. पण पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधी 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करतो? याचे कारण तुम्हाला माहित आहे का? नसेल माहित तर जाणून घ्या..



दोन देशांच्या स्वातंत्र्यदिनात एका दिवसाचा फरक कसा काय?


पाकिस्तान हा देश स्वतंत्र होऊन 77 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. जिथे 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. मात्र, दरवर्षी असा प्रश्न पडतो की, एकत्र स्वातंत्र्य मिळालेल्या दोन देशांच्या स्वातंत्र्यदिनात एका दिवसाचा फरक कसा काय? बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत आणि पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांना ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाले. दोन्ही देशांना एकत्र स्वातंत्र्य मिळाले. परंतु, पाकिस्तानने भारताच्या एक दिवस आधी 14 ऑगस्ट 1947 रोजी मुस्लिम बहुल राष्ट्र म्हणून आपला स्वातंत्र्यदिन साजरा केला, तर भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आला.



पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचे कारण काय होते?


इतिहासात भारत आणि पाकिस्तान वेगळे होण्यामागे आणि वेगवेगळ्या दिवशी स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे अनेक तर्कवितर्क दिले गेले आहेत. काही इतिहासकारांचे असे मत आहे की, 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती, म्हणून या दिवशी तेथे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला जातो. त्याच वेळी, एक युक्तिवाद असाही दिला जातो की तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन हे ब्रिटीश सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते, त्यामुळे ते एकाच वेळी दिल्ली आणि कराचीला जाऊ शकले नसते. त्यामुळे त्यांनी 14 ऑगस्टला पाकिस्तानकडे आणि 15 ऑगस्टला भारताकडे सत्ता हस्तांतरित केली. यामुळेच पाकिस्तान आपला स्वातंत्र्यदिन भारताच्या एक दिवस आधी साजरा करतो.


 




 


पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची भौगोलिक कारणे काय?


यामागचे आणखी एक कारण म्हणजे दोन्ही देशांची प्रमाणित वेळही सांगितली जाते. कारण, पाकिस्तानची वेळ भारतापेक्षा 30 मिनिटे मागे आहे. भारतात जेव्हा रात्रीचे 12 वाजलेले असतात, तेव्हा पाकिस्तानातील घड्याळात 11.30 वाजलेले असतात. असे मानले जाते की, ब्रिटिश सरकारने भारतीय स्वातंत्र्य कायद्यावर स्वाक्षरी केली, तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते. म्हणजे भारतात 15 ऑगस्ट आणि पाकिस्तानमध्ये 14 ऑगस्टला रात्री 11:30 वाजले होते.


 


 


हेही वाचा:


Independence Day 2024 : 15 ऑगस्ट हाच दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून का निवडला गेला? जपानशी संबंध काय? सर्वात मोठे कारण जाणून घ्या


 


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )