Important Days in September 2023 : सप्टेंबर (September 2023) महिना सुरु झाला आहे. अशातच, सप्टेंबर महिन्यात श्रावणाबरोबरच अनेक सणांचीही मांदियाळी आहे. या महिन्यात गणेश चतुर्थी, गोपाळकाला, पोळा यांसारखे अनेक सण साजरे केले जाणार आहेत. तसेच, अनेक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचे दिवसही या महिन्यात आहेत. या प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? हे जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊयात सप्टेंबर महिना दिनविशेष.
1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week)
भारतात दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान 'राष्ट्रीय पोषण सप्ताह' साजरा केला जातो. लोकांनी आपल्या आरोग्याबाबत आणि आहाराबाबत जागरूक राहावे हा उद्देश हा सप्ताह साजरा करण्यामागचा आहे .पोषण ही मूलभूत गरज आहे आणि निरोगी जीवन जगण्यासाठी देखील खूप महत्वाचे आहे. लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता नसल्यामुळे, रुग्णांची संख्या आरोग्य सुविधांपेक्षा जास्त आहे. आजची बिघडलेली जीवनशैली आणि चुकीचे खाणे हे याचे प्रमुख कारण आहे. निरोगी राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. पोषणाच्या पूर्ततेबद्दल लोकांना जागरूक करण्यासाठी, भारत सरकारने राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा करण्यास सुरुवात केली होती.
2 सप्टेंबर : जागतिक नारळ दिन (World Coconut Day)
नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असे म्हटले जाते. नारळापासून निर्माण होणाऱ्या सगळ्याच गोष्टी या मनुष्याला उपयोगी पडतात. नारळाचा उपयोग खाण्यासाठी, औषधांसाठी, तेलासाठी तसेच इतर अनेक गोष्टींसाठी केला जातो. नारळाच्या लागवडीपासून जगातल्या अनेक देशांत चांगला रोजगार मिळत आहे. त्यामुळे नारळाचे महत्व आणि त्याचा वापर याबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिन म्हणून साजरा केला जातो.
3 सप्टेंबर : संकष्ट चतुर्थी
निज श्रावण कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी 3 सप्टेंबर रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची आराधना केल्याने जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते. तसेच, या दिवशी गणपतीला त्याच्या आवडत्या वस्तू अर्पण केल्याने इच्छित फळ मिळते असे मानले जाते. यावेळी संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ रात्री 09.23 आहे.
3 सप्टेंबर : विवेक ओबेरॉय जन्मदिन.
बॉलिवूड सिनेसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉयचा जन्म हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. विवेकने आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. 2019 साली विवेकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित PM Narendra Modi या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.
3 सप्टेंबर : शक्ती कपूर यांचा जन्मदिन.
शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर. परंतु, लोक त्यांना शक्ती कपूर याच नावाने ओळखतात. शक्ती कपूर हे भारतीय चित्रपट अभिनेते. त्यांनी सहसा खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 700हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. सुपरहिट राजा बापू चित्रपटातील 'नंदू' ची भूमिका चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिली.
5 सप्टेंबर : शिक्षक दिन (Teachers’ Day)
आजचे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे भविष्य आहेत आणि या भविष्याला घडविण्याचे काम हे शिक्षक करतात. मनुष्याच्या आयुष्यातील शिक्षकाचे स्थान लक्षात घेऊन जगभरात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी विद्यार्थी त्यांच्या गुरूंसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
5 सप्टेंबर : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जन्मदिन (Dr. Radhakrishnan’s birthday)
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी या गावी झाला. त्यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला. त्यांच्याच स्मरणार्थ 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.
5 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस (International Day of Charity)
दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी 'आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवस' साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिवसाचे उद्दीष्ट जास्तीत जास्त गरजू लोकांना जागरूक करून त्यांना मदत करणे आणि त्यांना दान करण्यासाठी प्रोत्साहित करणे असा आहे.
6 सप्टेंबर : राकेश रोशन जन्मदिन
प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि सिनेनिर्माते राकेश रोशन यांचा जन्म मुंबईत झाला. राकेश रोशन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. खुबसूरत, कामचोर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांत त्यांनी मुख्य भूमिका निभावली.
8 सप्टेंबर : जागतिक साक्षरता दिन (World Literacy Day)
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात 1966 सालापासून झाली. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि जगभरातील लोकांचे शिक्षणाकडे लक्ष वेधणे असा आहे. एक साक्षर आणि सक्षम समाज घडवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
8 सप्टेंबर : जागतिक शारीरिक थेरपी दिवस (World Physical Therapy Day)
दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी जागतिक शारीरिक थेरपी दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. फिजिकल थेरपिस्टच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आणि लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी त्यांच्याद्वारे केल्या गेलेल्या उपचारांबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तसेच वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल जगभरातील फिजिओथेरपिस्टचे आभार मानण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
9 सप्टेंबर : अक्षय कुमार जन्मदिन.
अक्षयकुमार हा भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने जवळपास 140 हून अधिक हिंदी चित्रपट केलेले आहेत. अक्षयने कराटेमध्ये ब्लॅकबेल्ट मिळवलेले आहे. त्यामुळेच त्याने अनेक अॅक्शन चित्रपट दिले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त त्याने टेलिव्हिजनवर 'खतरों के खिलाडी' आणि 'अमुल मास्टर शेफ' सारखे कार्यक्रम देखील त्याने केले आहेत.
10 सप्टेंबर : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day)
जागतिक आरोग्य संघटनेने 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून जाहीर केला असून कोरोना संकटकाळात या दिनाला फार महत्व आले आहे. संसार नीट चालला नाही, परीक्षेत मार्क कमी मिळाले ,आर्थीक संकट आले या कारणांसोबतच आता आत्महत्यांची काही विचित्र कारणे समोर येत आहेत. याचबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस पाळला जातो.
11 सप्टेंबर : राष्ट्रीय वन शहीद दिन (National forest Martyrs day)
दरवर्षी 11 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय वन शहीद दिन भारतात साजरा केला जातो. भारतातील वन्यजीव, जंगले आणि जंगलांचे रक्षण करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा हा दिवस आहे.
14 सप्टेंबर : पोळा
पोळा किंवा बैलपोळा हा श्रावण अमावस्या साजरा करण्यात येणारा बैलांचा सण आहे. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा एक मराठी सण असून हा विशेषतः विदर्भात भव्य पातळीवर साजरा केला जातो, विदर्भातील सीमेवर असलेल्या मध्य प्रदेश आणि तेलंगण सीमाभागातसुद्धा हा सण साजरा होतो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलाची पूजा करतात.
14 सप्टेंबर : हिंदी दिवस (Hindi Day)
14 सप्टेंबर 1949 दिवशी संविधान सभेने देवनागरी लिपीमध्ये लिहलेल्या हिंदी भाषेचा भारताची राजभाषा म्हणून निवड केली. या दिवसाचं औचित्य साधून 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतामध्ये 14 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचं औचित्य साधून भारतामध्ये हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. राष्ट्रीय हिंदी दिवसाचं औचित्य साधून देशभरात सरकारी कार्यालयामध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून हिंदी या भारताच्या राजभाषेचा प्रसार केला जातो.
14 सप्टेंबर : जागतिक प्रथमोपचार दिन (World First Aid Day)
प्रथमोपचारासाठी जागरूकता आणि सुलभता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 12 सप्टेंबर हा जागतिक प्रथमोपचार दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट सोसायटीज (IFRC) द्वारे 2000 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. नावाप्रमाणेच, प्रथमोपचार म्हणजे अपघातानंतर ताबडतोब व्यावसायिक मदत येईपर्यंत इजा झालेल्या ठिकाणी प्राथमिक वैद्यकीय मदत दिली जाते.
15 सप्टेंबर : अभियंता दिन (Engineer’s day in India)
देशभर 15 सप्टेंबर हा दिवस “अभियंता दिवस’म्हणून साजरा केला जातो. भारतातील पहिले अभियंता सर मोक्षगुडम विश्वेश्वरय्या यांचा हा जन्मदिवस. भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वेश्वरय्या केवळ अभियंता नव्हते तर कट्टर आणि थोर देशभक्तही होते. त्यांच्या जयंती निमित्ताने हा दिवस साजरा केला जातो.
15 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन (International Day of Democracy)
आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन जगातील लोकशाही स्थितीचा आढावा घेतला जातो. 2007 मध्ये युएन जनरल असेंब्लीने लोकशाहीच्या प्रोत्साहन आणि एकत्रिकरणा संदर्भातील राष्ट्रीय कार्यक्रमांना बळकट करण्यासाठी हा ठराव जाहीर केला. 2008 मध्ये प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला.
16 सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन (World Ozone Day)
ओझोन दिन हा पर्यावरणासाठी एक अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. लोकांना ओझोनच्या थराचे जतन करण्यासाठी शक्य ते उपाय शोधण्यासाठी ‘जागतिक ओझोन दिन’ दरवर्षी 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. वातावरणातील ओझोनचे सुरक्षा कवच राखून ठेवण्यासाठी हा दिवस लक्षवेधी ठरतो.
17 सप्टेंबर : जागतिक रुग्ण सुरक्षा दिन ( World Patient Safety Day)
जागतिक रुग्ण सुरक्षा दिन (World Patient Safety Day) जागतिक स्तरावर 17 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी जागरूकता निर्माण करणे आणि आरोग्यसेवा अधिक सुरक्षित करण्याच्या वचनबद्धतेचे प्रतिपादन करणे या मुख्य उद्देशांसाठी हा दिवस साजरा करण्यात येतो.
18 सप्टेंबर : हरितालिका तृतीया
हरतालिका व्रत सुवासिनी आपल्या नवर्याच्या दिघार्युष्यासाठी करतात आणि या दिवशी महादेव-पार्वतीची पूजा केली जाते. या दिवशी स्त्रिया निर्जला व्रत करतात. शृंगार करून व्रत, पूजा, आरती आणि कहाणी करतात. अनेक स्त्रिया रात्री चंद्राला अर्घ्य देखील देतात. महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत हरतालिका तृतीय या नावाने प्रसिद्ध आहे तर दक्षिण भारतीय भागात याला गौरी हब्बा असे म्हणतात.
19 सप्टेंबर : गणेश चतुर्थी
गणेशोत्सव हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्रातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण चतुर्थी ते भाद्रपद महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत दहा दिवस चालत असतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश चतुर्थी असेही म्हणतात. यावर्षी 19 सप्टेंबर 2023 रोजी गणपतीचं आगमन होणार आहे.
20 सप्टेंबर : महेश भट्ट यांचा जन्मदिन
महेश भट्ट हे एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि कथाकार आहेत. 1974 सालापासून बॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या भट्टने वयाच्या 26व्या वर्षी मंझिलें और भी हैं ह्या चित्रपटाचे त्यांनी दिग्दर्शन केले. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याला आजवर फिल्मफेअरसह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.
21 सप्टेंबर : जागतिक अल्झायमर दिन (Alzheimer’s Day)
21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झायमर दिन म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभरामध्ये 21 सप्टेंबर हा दिन जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर म्हणजे माणसाला दुर्बल करणारा वार्धक्यातील विस्मृतीचा रोग. या रुग्णाची स्पष्टपणे विचार करण्याची क्षमता नाहीशी होते आणि स्वत:कडे लक्ष देण्यासाठी असमर्थ होतो. अॅलोइस अल्झेमर नावाच्या एका जर्मन डॉक्टरने 1906 साली ह्या आजाराचा शोध लावला.
21 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय शांती दिन (International day of peace)
आपल्या जीवनात शांतीचे महत्व मोठं आहे. ज्या ठिकाणी शांती असते त्या ठिकाणी बंधुभाव, मधुरता, समाधान आणि आनंद असतो. शांतीविना जगण्याला कोणताच अर्थ नाही. याच शांततेचं महत्व सांगण्यासाठी जगभरात दरवर्षी 21 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय शांती दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर संघर्षाची परिस्थिती संपवून शांतीला प्रोत्साहन देणं आहे.
23 सप्टेंबर : सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages)
सांकेतिक भाषेचे महत्त्व लक्षात घेऊन जनजागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासभेने 23 सप्टेंबर 2018 रोजी सांकेतिक भाषा दिन जाहीर केला. 2018 मध्ये प्रथमच सांकेतिक भाषा दिन साजरा करण्यात आला. वर्ल्ड डेफ युनियनने आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन (International Day of Sign Languages)साजरा करण्याचा प्रस्ताव पुढे ठेवला. संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाची स्थापना केली. वर्ल्ड डेफ युनियनची स्थापना 23 सप्टेंबर 1951 रोजी झाली.
25 सप्टेंबर : जागतिक फार्मासिस्ट दिन (World Pharmacists Day)
जगभरामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन हा दिवस 25 सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. दरम्यान इस्तंबूल तुर्की येथे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) कॉंग्रेसने 2009 मध्ये 25 सप्टेंबरला वार्षिक जागतिक फार्मासिस्ट दिन (WPD) म्हणून नियुक्त केले. देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
26 सप्टेंबर : जागतिक कर्णबधिर दिन (Day of the Deaf)
कर्णबधिर लोकांच्या देनदिन जीवनातील समस्यांविषयी सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक कर्णबधिर दिन साजरा करण्यास सुरुवात झाली. कर्णबधिरत्व कानातील एखाद्या भागाला इजा झाल्याने किंवा एखाद्या रोगामुळे कानाच्या अनैसर्गिक विकासामुळे जन्माआधी किंवा जन्मानंतर आलेली असते. ऐकण्याच्या क्षमतेला मर्यादा पडतात. पण त्याच बरोबर बोलण्यात आणि उच्चारणात वाचादोष निर्माण होतो.
26 सप्टेंबर : जागतिक गर्भनिरोधक दिन (World Contraception Day)
दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक गर्भनिरोधक दिनाच्या निमित्ताने जागरूकतेचा संदेश दिला जातो. तसेच आई-वडील आणि व्यक्तींमध्ये मुक्तपणे आणि जबाबदारीने त्यांच्या मुलांची संख्या आणि त्यामधील अंतराबाबत निर्णय घेण्याच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण केली जाते.
26 सप्टेंबर : जागतिक सागरी दिन (World Maritime Day)
समुद्री मार्गांवरील व्यवसायाला सागरी व्यापार म्हणतात. जागतिक मेरीटाईम डेची स्थापना आंतरराष्ट्रीय मेरीटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) यांनी 1978 मध्ये केली होती. आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेद्वारे दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. संपूर्ण जगाच्या आर्थिक विकासासाठी सागरी उद्योगाला सन्मान देण्यासाठी दरवर्षी 26 सप्टेंबर रोजी जागतिक सागरी दिन साजरा केला जातो. हा दिवस सहसा शिपिंग सुरक्षा, सागरी सुरक्षा आणि सागरी पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. रशियामध्ये 27 सप्टेंबर रोजी जागतिक समुद्र दिन साजरा केला जातो.
26 सप्टेंबर : जागतिक पर्यावरण आरोग्य दिन (World Environmental Health Day)
जागतिक पर्यावरण आरोग्य दिन हा नावाप्रमाणेच पर्यावरणाशी संबंधित दिवस आहे. 2011 पासून, जगभरात दरवर्षी 26 सप्टेंबर हा जागतिक पर्यावरण आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या पर्यावरणाच्या आरोग्याबाबत जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने 44 सदस्य राष्ट्रांची एक संस्था असलेल्या इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एन्व्हायर्नमेंटल हेल्थ (IFEH) द्वारे या दिवसाची सुरुवात झाली.
27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day)
जागतिक पर्यटन दिवसाची सुरुवात 1970 पासून संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेद्वारे केली गेली. 27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी आजच्या दिवशी जगभर विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. नवनवीन ठिकाणी भेट देणं, स्थानिक गोष्टींची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देते.
28 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
या संदर्भात ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपतीची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीला देखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या प्रथेनुसार दुपारपर्यंत मूर्ती विसर्जनासाठी बाहेर आणावी. ह्यावेळी मूर्तीचे मुख घराच्या, मंडपाच्या दिशेकडेच हवे. वाजत-गाजत मिरवणुकीने ती ठरलेल्या ठिकाणी जलाशयावर आणावी. तिथे मूर्तीला पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. पुन्हा एकदा आरती करावी. नंतर तिचे श्रद्धापूर्वक-काळजीपूर्वक सन्मानाने विसर्जन करावे, असा सर्वसाधारणपणे ह्या विसर्जनाचा विधी आहे. यंदा गणपतीचं गणेश चतुर्थी 31 ऑगस्टला आहे तर अनंत चतुर्दशी 9 सप्टेंबर रोजी आहे.
28 सप्टेंबर : ईद-ए-मिलाद
इस्लाम धर्मात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाला मोठं महत्व आहे. पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन ‘ईद मिलाद उन-नबी’ (Eid-E-Milad) म्हणून साजरा करण्यात येतो. ईद मिलाद उन-नबीच्या दिवशी घरं आणि धार्मिक ठिकाणं आकर्षक रोषणाईने सजवले जातात, प्रार्थना केली जाते. ठिकठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. या दिवशी हजरत मोहम्मद यांच्या पवित्र वचनांचं, कुराणाचं पठण केलं जातं.
28 सप्टेंबर : World Rabies Day
रेबीज हा उष्ण रक्ताचे प्राणी (जसे की, कुत्रा , ससा, माकड, मांजर इत्यादी) चावल्यानंतर होणारा हा रोग आहे. रेबिजचा रोग हा पिसाळलेला कुत्रा चावल्याने होतो. या भयानक रोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्याचे बळी ठरणारे प्राणी आणि मानव यांच्यावर इलाज करण्यासाठी 'एकच औषध' उपलब्ध असावे, या हेतूने हा दिवस 2007 पासून '28 सप्टेंबर'ला पाळला जातो. रेबिजच्या रोगाला अटकाव व्हावा आणि तो टळावा म्हणून जगभर प्रयत्न सुरू आहेत.
29 सप्टेंबर : जागतिक हृदय दिन (World Heart Day)
29 सप्टेंबर हा दरवर्षी जागतिक हृदय दिन (world heart day) म्हणून साजरा केला जातो. भारतासह जगभरात हृदयरोगांमुळे सर्वाधिक मृत्यू होत आहेत. वर्ल्ड हार्ट फेडरेशनच्या आकडेवारीनुसार दरवर्षी जगात 1 कोटी 73 लाख लोक हृदयरोगाने मृत्यूमुखी पडतात. भारतात दरवर्षी होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी तब्बल 32% मृत्यू हृदयरोगामुळे होतात. याची अधिकाधिक जनजागृती व्हावी यासाठी हा दिन साजरा केला जातो.
30 सप्टेंबर : जागतिक अनुवाद दिन ( International Translation Day)
जागतिक अनुवाद (भाषांतर) दिन हा दरवर्षी 30 सप्टेंबरला बायबलचे अनुवादक आणि भाषांतराचे जनक, संत जेरॉम यांच्या स्मृत्यर्थ साजरा केला जातो. इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सच्या स्थापनेपासून म्हणजेच 1953 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. जागतिकीकरणाच्या ह्या युगात लोकांना जागृत करण्यासाठी 1991 मध्ये इंटरनॅशनल फेडरेशन फॉर ट्रान्सलेटर्सने जागतिक पातळीवर हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
महत्त्वाच्या बातम्या :