सोलापूर: आषाढी सोहळ्यासाठी राज्यभरातून पालखी सोहळे निघण्याची तयारी होत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. माळशिरस तालुक्यातील राऊतनगर-अकलूज व माळीनगर येथे कोरोना रुग्ण आढळल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी प्रियांका शिंदे यांनी दिली असून नागरिकांनी खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. सदरच्या रुग्णांनी प्रकृती अस्वथ्यामुळे खाजगी ऐपेक्स हॉस्पिटल व ऱ्हीदम हॉस्पिटल येथे उपचारासाठी भरती झाले असता खाजगी लॅबमध्ये तपासणी केली. त्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. याची खबर माळशिरस तालुका आरोग्य विभागाला लागताच त्यांनी सदर दोन्ही कुटुंबातील व्यक्तींची पूर्ण तपासणी केली आहे. यातील एका रुग्णाने प्रवास केल्याचे समोर आले आहे.
सदर दोन रुग्णांची माहिती सोलापूर जिल्हा चिकित्सकांना दिल्याचे डॉक्टर शिंदे यांनी सांगितले आहे. सद्य स्थितीमध्ये आषाढीसाठी येणाऱ्या पालखी सोहळ्याबाबत कोरोनाची उपाय योजना म्हणून जिल्हा आरोग्य विभागाकडून 25 हजार रॅट किट, 10 हजार आरटीपीसीआर ट्यूब, 10 हजार एन 95 मास्क, 50 हजार सर्जिकल मास्क, 500 पीपीइ किट, 100 एमएलच्या 1000 सँनिटायझर बाटल्या, 10 हजार हॅन्ड ग्लोजची मागणी केली आहे. येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला अतिदक्षता बाळगावी लागणार आहे. नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विषयक काळजी घ्यावी. लक्षणे आढळताच जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन डॉक्टर शिंदे यांनी केले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे, विशेषतः ज्यांना इतर आरोग्य समस्या आहेत, त्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे आणि लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. सध्या, बहुतेक रुग्ण सौम्य लक्षणांसह घरीच बरे होत आहेत, त्यामुळे घाबरण्याची गरज नाही, परंतु खबरदारी घेणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील एकूण रुग्णसंख्या 425
सध्या महाराष्ट्र राज्यात (Maharashtra) 76 नव्या रुग्णांची भर पडली असून आता 425 अॅक्टिव कोरोना रूग्णांची संख्या आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मते, देशात सर्वात जास्त कोरानाचे रुग्ण हे केरळ राज्यात आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली येथे रुग्ण आहेत. तर इतर राज्यात सुद्धा कोरानाच्या रुग्णांमध्ये सतत वाढ होताना दिसतेय. काही राज्यात मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. तर पश्चिम बंगालमध्ये नव्याने कोरोनाबाधित 5 रुग्ण झाले आहेत. महाराष्ट्रात 86 पर्यंत रुग्णांची संख्या झाली आहे. जर आपण दिल्लीतील कोरोनाच्या अधिकृत आकडेवारीवर नजर टाकली तर सोमवार (26 मे) पर्यंत दिल्लीत कोरोना विषाणूचे 104 सक्रिय रुग्ण होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात 24 रुग्ण बरे झाले. गेल्या आठवड्यात, दिल्ली सरकारने रुग्णालयांना बेड, औषधे आणि ऑक्सिजनची उपलब्धता सुनिश्चित करण्यास सांगितले होते.
कोरोना व्हायरसनं (Covid-19) राज्यासह भारतात पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. महाराष्ट्रासह देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी देशभरातली आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून योग्य ती पावले उचलली जात आहे. शिवाय स्थानिक प्रशासनाला ही त्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. सध्या महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई, पुण्यासह राज्यभरात देखील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे समोर आले आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता नियमांचे पालन करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सल्ला दिला आहे.