Important days in 2nd April : एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे. अशा वेळी प्रमुख सण कोणत्या दिवशी आहेत, सामाजिक आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे याची माहिती आम्ही तुम्हाला या दिनविशेषच्या माध्यमातून देणार आहोत. त्यानुसार जाणून घ्या 2 एप्रिलचे दिनविशेष. 


गुढीपाडवा - हिंदू नवीन वर्षाची सुरुवात 


गुढीपाडवा हा चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवश साजरा केला जातो. गुढीपाडवा महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी साजरा केला जातो. देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक नावांनी, सांस्कृतिक श्रद्धा आणि उत्सवाच्या रुपात हा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रात या दिवशी सूर्योदयानंतर घरासमोर गुढी उभारून तिची पूजा केली जाते. दक्षिण भारतातील मूळ रहिवासी गुढीपाडव्याचा सण उगादी म्हणून साजरा करतात. ह्या दिवसापासूनच शालिवाहन शके दिनदर्शिकेप्रमाणे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होते. 


जागतिक ऑटिझम दिन 


संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर दरवर्षी 2 एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिन (World Autism Awareness Day) साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे जो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. जगभरात या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. 


गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना


गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांनी 2 एप्रिल 1870 रोजी पुणे सार्वजनिक सभेची' स्थापना केली.या संस्थेतर्फे त्यांनी जी विधायक आणि समाजोपयोगी कामे केली,त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले.राजकारणाचे आद्यपीठ किंवा कांग्रेसची जननी म्हणता येईल अशी 'सार्वजनिक सभा'ही जनतेची गाऱ्हाणी सरकार दरबारी आणि वेशीवर टांगणारी क्रियाशील संस्था होती.


2 एप्रिल 1894 - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक 


छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती (इ.स. 1884-1922 दरम्यान) होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) आणि मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना "राजर्षी" ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली.शाहू महाराजांचा राज्याभिषेक 2 एप्रिल 1894 रोजी झाला. 


बॉलिवूड चित्रपट अभिनेता अजय देवगणचा जन्म


बॉलिवूड सुपरस्टार अजय देवगणचा जन्म 2 एप्रिल 1969 मध्ये दिल्ली येथे देवगण या पंजाबी परिवारात झाला.त्याचे जन्म नाव विशाल वीरू देवगण आहे.अजय देवगणचे वडील वीरू देवगण भारतीय चित्रपटाचे एक दिग्गज एक्शन डायरेक्टर आणि फिल्म प्रोडयुसर आहेत.आई विणा देवगण हया चित्रपट निर्माती आहेत.अजय देवगणने अनेक हिंदी सुपरहिट चित्रपट दिले आहे. अभिनयाबरोबरच अजय देवगणने अनेक चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. 


भारतीय नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझाचा जन्म


रेमो डिसूझा हा भारतीय नृत्यदिग्दर्शक आहे. त्याचबरोबर तो अभिनेता आणि चित्रपट निर्माताही आहे. प्रसिद्ध रिअॅलिटी शो डान्स इंडिया डान्समध्ये तो प्रमुख दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसला होता. रेमो डिसूझाचे मूळ नाव रमेश गोपी असे आहे. 


भारतीय स्टॅंड-अप कॉमेडीयन कपिल शर्माचा जन्म


कपिल शर्मा हा भारतीय स्टॅंड-अप कॉमेडीयन आहे. 'द कपिल शर्मा शो' या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. कपिल शर्माचा जन्म पंजाबमधील अमृतसर येथे झाला. 


इ.स. 1564 साली मुघल शासक अकबर यांनी जजिया कर रद्द


1562 मध्ये अकबराने गुलामी प्रथा संपुष्टात आणली.1564 साली त्याने जिझिया कर रद्द केला. 1576 साली हल्दीघाटीच्या प्रसिद्ध लढाईत अकबराचा सेनापती मानसिंग याने मेवाडचा राजा महाराणा प्रताप यास पराभूत केले.


सन 1679 साली मुघल बादशाहा औरंगजेब यांनी हिंदुवर ‘जिझिया’ कर लावला


औरंगजेब (इ.स. 1618 - इ.स. 1707) हे मोगल सम्राट होते.त्यांनी त्या वेळी आपल्या राज्यात शरियत (इस्लामी कायदा)लागू केला होता.गैर-मुसलमान जनतेवर असा कायदा लागू करणारे ते पहिले मुसलमान राज्यकर्ता होते.तसेच त्यांनी जिझिया कर परत लागू केला.त्यांनी आपल्या आयुष्यातील बराच काळ दक्षिणेत मराठा साम्राज्यावर आणि इतर विरोधकांवर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्‍नांत घालवला. 


विंग कमांडर राकेश शर्मा यांचे अंतराळ यानातून उड्डाण


इ.स. 1984 साली पहिले भारतीय अंतराळवीर विंग कमांडर आणि भारतीय वायुसेनेचे माजी पायलट राकेश शर्मा यांनी सोयुज टी-11 या अंतराळ यानातून उड्डाण केले. त्यांनी 7 दिवस 21 तास 40 मिनिटे अवकाशात प्रवास केला.


बॅंक ऑफ इंडियाची स्थापना 


सन 1988 सालच्या संसद कायद्यानुसार सन 1990 साली स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.या बँकेची मुख्य शाखा लखनौमध्ये आहे.


28 वर्षांनी भारतीय क्रिकेट संघाने विश्वकप जिंकला 


इ.स.2011 साली भारतीय क्रिकेट संघाने सन 1983 सालानंतर जवळपास 28 वर्षांनी विश्वकप जिंकला.
इ.स. 2011ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी 19 ते एप्रिल 2, इ.स. 2011च्या दरम्यान भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली.चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत 50 षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले. 2 एप्रिल रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारताने श्रीलंकेचा 6 गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले.


भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे उद्घाटन 


सन 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेनानी-नाश्री आणि जम्मू-काश्मीर यांची ‘लाईफलाईन’असलेल्या ‘चेनानी-नश्री’ या सर्वात मोठ्या लांब बोगद्याचे उद्घाटन केले.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha