Mansoon Pet Care : पावसाने सर्वच भागात चांगलेच थैमान घातलेले आहे. पावसाचा (Mansoon) जोर दिवसेंदिवस वाढत आहे. मनाला आनंद देणारा पाऊस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो. मात्र हाच पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो. अशात माणसांसोबतच घरातील पाळीव प्राण्यांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पावसाळ्यात घरातील पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी जाणून घेऊ.


1. घरातील पाळीव प्राण्यांना शक्यतो कोरड्या जागी ठेवा. बाहेरुन आल्यानंतर त्यांना सुती टाॅवेलने स्वच्छ पुसून घ्या. तसेच त्यांच्या झोपण्यासाठी उबदार कापड ठेवा. 


2. घरात सर्वत्र साफसफाई  करणे पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गरजेचे आहे. शक्यतो फायबर किंवा स्टीलच्या भांड्यात घरातील कुत्रा किंवा मांजरांना खायला द्या. 


3. पावसाळ्यात ओलसर वातावरणामुळे गोचिड आणि पिसूंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यामुळे तुमच्या घरातल्या प्राण्याला वेळेत सगळ्या आवश्यक असणाऱ्या लस देऊन घ्या.


4. तुमच्या पाळीव प्राण्याला पोषक आहार द्या. पचण्यास सोपं आणि जास्तीत जास्त फायबरयुक्त जेवण त्यांना खायला द्या.


5. घरातील पाणी रोज उकळून घ्या आणि मगच तुमच्या घरात असणाऱ्या कुत्र्याला किंवा मांजरीला द्या. अशुद्ध आणि दूषित पाण्यातून त्यांना अनेक संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता असते.


6. पावसाळ्यात किटकांचे प्रमाण वाढते. यामुळे अनेक आजार बळावतात. यामुळे कीटकनाशके आणि इतर रसायनांचा वापर पावसाळ्यात वाढतो. अशा वेळी घरातील पाळीव प्राण्यांना कीटकनाशकांपासून दूर ठेवा. कुत्रा किंवा मांजरीच्या संपर्कात हे कीटकनाशके आल्यास त्यांना अनेक प्रकारच्या अॅलर्जी  होण्याचा धोका असतो.


7. लेप्टोस्पायरोसिस हा पावसाळ्यात होणारा सामान्य आजार आहे. तुमच्या पशुवैद्यकाने तुम्हाला सांगितल्यास लेप्टोस्पायरोसिस लसीसह तुमच्या पाळीव प्राण्याचे लसीकरण करुन घ्या. आपल्या पाळीव प्राण्याचे पाण्याचे भांडे स्वच्छ आणि नियमित धुवून ठेवा.


8. पावसाळ्यात तु्म्ही तुमच्या प्राण्यांना बाहेर फिरायला घेऊन जात नसाल तर त्यांच्याकरता घरातच खेळण्याची सोय करा. तसेच तुम्ही एखाद्या अपार्टमेंटमध्ये राहत असाल तर त्यांना पायऱ्यांवर खेळू द्या. जेणेकरुन त्यांचा शारीरिक व्यायाम होईल.


9. पावसाळ्यात कुत्रा किंवा मांजरीचे केस नियमित स्वच्छ करणे गरजेचे आहे. सोबतच दिवसातून दोन वेळा त्यांना आंघोळ घाला. बाहेरुन आल्यानंतर त्यांचे पंजे साफ करा. यामुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग त्यांना होणार नाही.


इतर महत्त्वाची बातमी


Omega 3 Benefits : निरोगी शरीराकरीता ओमेगा - 3 आहे आवश्यक , काय आहेत फायदे ; पाहा..