Mansoon News : अवघ्या काही तासातच मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांवर दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच कोकण किनारपट्टीसह राज्यातील 9 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढच्या दोन दिवसात केरळ किनारपट्टीवर मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.


16 ते 19 मे दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रास, मराठवाड्यात पावसाची शक्यता सांगण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांमध्ये कोल्हापूर, सातार, सांगली तसेच मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 


दरम्यान, हवामान विभागाने यंदाही वेळेआधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती.  गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे लाही-लाही होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी नैऋत्य मान्सून  (Monsoon 2022)  देशात वेळेपूर्वी दाखल होऊ शकतो. अंदमान आणि निकोबार बेटांवर 15 मे रोजी पहिला हंगामी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्याप्रमाणे आज मान्सून दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. 


हवामान शास्त्रज्ञांच्या मते, पूर्व मॉन्सून सुरू होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून मान्सून आधी केरळ आणि नंतर उत्तरेकडे सरकेल. केरळमध्ये मान्सून साधारणपणे 1 जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळेआधी म्हणजे 27 मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली होती. मात्र, पुढच्या दोन दिवसात केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आता वर्तवली आहे.  बंगालच्या उपसागरात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी वारे तसेच ताशी 45 किमी झटक्याखाली पुढील 5 दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे, व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून दाखल होण्याची शक्यता जाणवत असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. पश्चिम बंगाल आणि  ईशान्यकडील 7 राज्यात पुढील 5 दिवस जोरदार पूर्वमोसमी पावसाची शक्यता जाणवत असल्याचे माहिती देखील माणिकराव खुळे यांनी दिली.


महत्त्वाच्या बातम्या: