How to Stop Gaming Addiction : सध्या जग डिजिटायझेशनकडे झुकताना दिसत आहे. लहान-मोठे सर्वच जण सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. ही ज्ञानाच्या दृष्टीने चांगली बाब असली, तरी याचे काही दुष्परिणामही पाहायला मिळत आहेत. लहान मुले त्यांचा जास्तीत जास्त वेळ उपकरणांवर घालवत आहेत. स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने मुलांना आरोग्य आणि विकासाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, असेही तज्ज्ञांचे मत आहे. काही लहान मुलांमध्ये गेमिंगचं व्यसन (Gaming Addiction) पाहायला मिळत आहे. हे आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक आहे.


अनेक मुलांना दिवसभर व्हिडीओ गेम खेळण्याचे व्यसन जडलं आहे. सतत व्हिडीओ गेम खेळण्यामुळे मुलांची चिडचिड होणे किंवा तणावात येणे स्वाभाविक आहे. तुम्ही मुलांना ओरडून किंवा मारून हे व्यसन सोडवण्याचा विचार करत असाल, तर थांबा. कारण यामुळे समस्या पूर्णपणे सुटणार नाही. मुलांना व्हिडीओ गेम खेळण्यापासून रोखण्यासाठी, व्हिडीओ गेमला पर्याय शोधणे आवश्यक आहे. मुलांना व्हिडीओ गेमच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी काय करावे लागेल वाचा.


1. स्वत:द्वारे चांगले उदाहरण दाखवा.


जर तुम्हाला तुमच्या मुलाचा स्क्रीन टाइम कमी करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला हे फॉलो करावे लागेल. स्क्रीन पाहण्याव्यतिरिक्त तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करूनही वेळी घालवू शकता हे मुलांसमोर सिद्ध करा. तुमच्या मुलाला गेमिंगच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे त्यांच्या गेमिंगचा एक भाग बनणे. व्हिडीओ गेम खेळून किंवा त्यांना व्हिडीओ गेम खेळताना पाहून त्यांच्या कामाबद्दल आणि दैनंदिन कामांबद्दल किंवा घटनांबद्दल त्यांच्याशी बोला. तुम्हाला तुमच्या मुलांचे छंद आणि आवडी चांगल्या प्रकारे ओळखण्यास मदत होईल.


2. गेमचे निरीक्षण करा


व्हिडीओ गेममध्ये अनेकदा ग्राफिक्सद्वारे हिंसा दाखवली जाते. तुमच्या मुलाच्या व्हिडीओ गेमचे निरीक्षण कर, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमची मुले जे पाहत आहेत, ते त्यांच्या वयानुसार योग्य आहे याबाबत नेहमी सावधगिरी असावेत.


3. गेमिंगची वेळ शेड्यूल करा


मुलांच्या इतर अ‍ॅक्टिव्हिटींप्रमाणेच तुमच्या मुलाने किती वेळ व्हिडीओ गेम खेळावा, यासाठी नियम ठरवून द्या. यामुळे मुले व्हिडीओ गेममध्ये जास्त मग्न होण्यापासून इतर खेळांकडे दुर्लक्ष करणार नाहीत.


4. मुलांना घरातील कामात सहभागी करून घ्या


तुमच्‍या लहान मुलाला त्‍याच्‍या गेमिंगच्‍या वेळेवर मर्यादा घालून द्या आणि इतर वेळेत त्यांना घरातील छोट्या-मोठ्या कामांमध्ये सामील करुन त्यामध्ये त्यांना गुंतवा म्हणजे त्यांचं गेमिंगवरील लक्ष हटेल. यामुळे मुलाना कंटाळा येणार नाही आणि व्हिडीओ गेमचे व्यसन दूर होण्यासही मदत होईल. यामुळे मुलांना नवीन गोष्टी शिकण्यास आणि त्यांचे मन गेमिंगपासून दूर ठेवण्यास मदत होईल.


5. मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळा.


कुटुंब आणि मित्रांसोबत खेळणे यामुळे मुलांचे गेमिंगचे व्यसन दूर होण्यास मदत होईल. मुलांसोबत वेगवेगळे खेळ खेळा. घरात पाळीव प्राणी असेल तर, मुलांसोबत त्याला फिरायला घेऊन जा. 


5. मुलांना गेमिंगच्या व्यसनाबद्दल माहिती द्या


तुमच्या मुलांसोबत बसा आणि त्यांना गेमिंगचे तोटे सांगा. स्क्रिन टाईम मर्यादित का असावा सांगा. तसेच, त्यांना कोणत्याही गोष्टीला त्रास होत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत असल्याची खात्री करून द्या. मुलांचा तुमच्यावरील विश्वास आणि आत्मविश्वास वाढवा.


या गोष्टी अंगवळणी पडण्यासाठी काही वेळ लागू शकतो. गेमिंग व्यसनाच्या परिणामांपासून तुमच्या मुलांना वाचवण्यासाठी संयम बाळगणे आणि हळूहळू या उपायांची अंमलबजावणी करणे खूप महत्वाचे आहे.