Diwali 2021 : दिवाळी म्हटलं की खाण्यापिण्याची चंगळ. दिवाळीत खासकरुन मिठाईचं महत्व खूप असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया दिवाळीत केल्या जातात. बहुतांश मिठाईमध्ये खवा हा असतोच. दूधापासून बनवला जात असलेल्या खव्याची मागणी दिवाळीत मोठ्या प्रमाणावर वाढते आणि मग सुरु होतो भेसळीचा खेळ. भेसळयुक्त खव्याने तुम्हाला दिवाळीची मिठाई 'महागात' पडू शकते. त्यामुळं भेसळयुक्त खवा कसा ओळखायचा हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 


आजच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कोल्हापुरातील तीन कंपनीवर छापा टाकत भेसळयुक्त खवा आणि त्यासाठी वापरण्यात येणारे पदार्थ जप्त केले आहेत.   सणासुदीचे दिवस जवळ येत असल्यानं लोकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. खवा, मिठाई आणि दुधातली भेसळ घरच्या घरी कशी ओळखावी याचं एबीपी माझानं स्वत: फूड अॅण्ड ड्र्ग्सच्या प्रयोगशाळेत जाऊन प्रात्यक्षिक केलं होतं. त्यामध्ये भेसळयुक्त दुध आणि खवा कसा ओळखावा याची माहिती देण्यात आली.


भेसळयुक्त खवा ओळखण्याच्या पद्धती
भेसळयुक्त किंवा बनावट खव्याची चव आणि रंग सामान्य खव्यापेक्षा वेगळा असतो. खवा हातावर घ्या. त्याला चोळा आणि जर त्याला चिकटपणा नसेल तर तो भेसळयुक्त खवा आहे. भेसळयुक्त खवा ओळखण्यासाठी थोडा खवा घेऊन तो एका भांड्यात ठेवावा. त्यात थोडं पाणी घाला. ते गरम केल्यावर टिंचर आयोडीनचे काही थेंब घाला. खव्यामध्ये स्टार्च असेल तर त्याचा रंग लगेच निळा होईल. मात्र, शुद्ध खव्याचा रंग बदलणार नाही, तो आहे तसाच राहील. 


एक लीटर दुधापासून साधारण 200 ग्रॅम खवा तयार होतो. त्यामुळे खवा व्यापाऱ्यांना जास्त नफा मिळावता येत नाही. भेसळयुक्त खवा हा अनेकदा बटाटा आणि मैद्यापासून बनवला जातो. नफेखोरीसाठी काही व्यापारी ग्राहकांच्या जीवाशी असा खेळ करतात.  


दिवाळीच्या तोडांवर बाजारपेठेत मिठाई आणि गोड पदार्थांना मोठी मागणी असते. पण भेसळीचा काळा बाजार करणारे अनेक जण या सणासुदीचा फायदा उचलतात. अशा वेळी आपण ही काळजी घेणं गरजेचं आहे.