मुंबई : गेल्या 15 वर्षांत तंत्रज्ञानाने जगाचं रुपडच बदललं आहे. बँकिंग क्षेत्राचा तर तंत्रज्ञानामुळे अक्षरश: कायापालट झाला आहे. एटीएमपासून इन्स्टंट मनी ट्रान्सफर इत्यादी सर्व बाबींमध्ये तंत्रज्ञानाने सुलभता आणली आहे. मात्र, अनेकदा या तंत्रज्ञानामुळे अडचणींना समोरंही जावं लागतं.


 

एटीएमच्या बाबतीत अशा अडणचणींना अनेकजणांना येतात. म्हणजे कधी-कधी एटीएम ट्रॅन्झॅक्शन पूर्ण होते, मात्र रोकड एटीएममधून बाहेर येत नाही. अशावेळी तुम्ही काय कराल, याबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

 

जर एटीएममधून पैसे निघाले नाहीत आणि अकाऊंटमधून पैसे कमी झाले, तर अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुमचं बँक अकाऊंट असलेल्या बँकेत जाऊन तक्रार दाखल करा. यावेळी तुम्ही कुठल्या बँकेच्या एटीएममध्ये गेला होतात, किती रुपये काढले होतात इत्यादी माहितीसह एटीएम ट्रॅन्झॅक्शनचा मेसेज किंवा रिसिटही तुमच्या बँकेत तक्रारीसोबत जमा करा. तुमचे पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये काही दिवसांतच पुन्हा डिपॉझिट होतील.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा आदेश काय?

 

एटीएमच्या या अडचणीबाबत आरबीआयने खास नियम तयार केले आहेत. आरबीआयच्या मे 2011 च्या आदेशानुसार तक्रार मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत बँकेने ग्राहकाला त्याचे पैसे परत करणं बंधनकारक आहे. याआधी हा अवधी 12 दिवसांचा होता.

 

जर तुमचे पैसे 7 दिवसांत परत मिळाले नाहीत, तर ग्राहक नुकसान भरपाईची मागणी करु शकतो. बँकेकडून जेवढा उशीर केला जाईल, त्यानुसार बँकेकडून ग्राहकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल. म्हणजे दिवसाला 100 रुपये ग्राहकाला बँकेने देणं बंधनकारक असेल, असे आरबीआयचे आदेश आहेत. जुलै 2012 पासून आरबीआयने हा नियम लागू केला आहे.

 

ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यानंतर ग्राहकांसाठी काय नियम आहेत?

 

आरबीआयच्या नियमांनुसार, जर ट्रॅन्झॅक्शन फेल झाल्यानंतरही 30 दिवसांच्या आत ग्राहकाने तक्रार दाखल केली नाही, तर ग्राहक नुकसान भरपाई मिळवण्यास योग्य ठरत नाही.