Health Insurance Policy : वर्षागणिक वैद्यकीय खर्चात वाढ होत असल्याने पॉलिसीधारकाने त्यांच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी (आरोग्य विमा पॉलिसी)ची विमा रक्कम आणि कवच यांचा अंदाज घेणे क्रमप्राप्त ठरते. जीवनशैली विषयक विकार, अचानक उद्भवणारे आजार किंवा कोरोनासारख्या महासाथीत आरोग्य विमा ही सर्वसामान्य गरज होऊन बसली. वैद्यकीय क्षेत्र प्रगत झाल्याने चांगले आणि सोपे उपचार उपलब्ध झाले, मात्र त्याचवेळी खर्चही भरमसाठ वाढला. आमच्या अंतर्गत अभ्यासातून असे स्पष्ट होते की, सर्वसाधारण शस्त्रक्रिया जसे की, नी रिप्लेसमेंट (गुडघा प्रत्यारोपण) किंवा बायपास शस्त्रक्रियेचा खर्च मागील काही वर्षांचा वेध घेता 40-45% नी वाढला आहे. त्यामुळे तुमच्या सध्याच्या आरोग्य विमा पॉलिसीची पडताळणी करता, सध्याच्या आणि भविष्यातील वैद्यकीय खर्चाच्या पुरेशा रक्षणाची खातरजमा करणे आवश्यक ठरते. तुमची चालू पॉलिसी पुरेशी आहे की तुम्हाला उच्च संरक्षण देणारी पॉलिसी अथवा सुपर टॉप-अप प्लान घ्यावा लागेल याविषयीचे रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे सीईओ राकेश जैन यांनी प्रकाश टाकलाय. 
 
जीवनशैली मानके : तुम्हाला आवश्यक उपचार, रोगनिवारक पद्धती आणि तुम्ही निवडत असलेल्या देखभाल प्रकारात तुमची जीवनशैली महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. समजा, तुम्हाला सर्वोत्तम रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत, स्वत:ची एकट्याची सोय असणाऱ्या खोलीत राहायचे आहे आणि रोबोटीक सर्जरी किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट सारखे उपचार पर्याय अंगीकारायचे आहेत. तुम्हाला परदेशी प्रवास करतेवेळी आपतकालीन स्थितीत परदेशात रुग्णालय भरतीचा पर्याय पाहिजे आहे. या स्थितीत, तुमच्याकडे पुरेशा विमा रकमेची आणि अॅड-ऑन वैशिष्ट्ये असलेली पॉलिसी असणे आवश्यक ठरते, ज्यामध्ये अतिरिक्त खर्चाचे कवच असते.
 
निवासाचे शहर: आरोग्य देखभालविषयक खर्च, प्रामुख्याने रुग्णालय भरतीचा खर्च महानगर/ लहान शहरागणिक वेगवेगळा असू शकतो. उदाहरणार्थ, महानगरातील रुग्णालय भरती आणि शस्त्रक्रियेचा खर्च हा टायर 3 शहरांच्या कैक पटीने जास्त असतो. त्यामुळे तुम्ही काढलेली पॉलिसी शहरातील तुमच्या निवासी मानकानुसार रुग्णालय भरतीचा खर्चाचे पुरेसे कवच देते हे तपासले पाहिजे.  
 
विमा रकमेत सर्व विमाधारकांना कवच असावे: कुटुंबातील प्रत्येक व्यक्ति सर्वांसह एकत्रित आजारी पडू शकते किंवा एकाच पॉलिसी वर्षात सर्वांना विम्याची गरज लागू शकते. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या वैद्यकीय खर्चाला कवच मिळेल अशी विमा रक्कम असणे महत्त्वपूर्ण ठरते. इथे काही उदाहरणे दिली आहेत. वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेता, हा साधारण 15% दराने वाढत असतो, एखाद्या आपतकालीन स्थितीत 4 व्यक्तिंच्या कुटुंबाला किमान रू. 15-20 लाखांचे कमाल वित्तीय कवच असावे. पुरेसे कवच असूनही जर तुम्हाला अतिरिक्त वित्तीय पाठबळ आवश्यक असल्यास, सुपर टॉप-अप पॉलिसी पर्यायाचा विचार करावा. ही पॉलिसी अतिशय कमी प्रीमियममध्ये अतिरिक्त कवच उपलब्ध करून देते.
 
सह-मर्यादा तपासा: पॉलिसी वैशिष्ट्ये आणि लाभ यांची खातरजमा करत तुमची पॉलिसी सह-मर्यादा तपासणे आवश्यक आहे. रुग्णाच्या रुग्णालय भरतीचा खर्च, आयुष (आयुर्वेद, युनानी, सिद्ध आणि होमियोपॅथी) तसेच आधुनिक उपचार जसे की रोबोटीक सर्जरी, स्टेम सेल किंवा अवयव दात्याचा खर्च कवच किंवा सह-मर्यादेच्या कक्षेत नसतात. तुम्ही निश्चित केलेल्या विमा रक्कमेनुसार सर्व आजार/विकारांना कवच मिळेल अशा पॉलिसींची निवड करा.
 
वाढती आरोग्य जोखीम आणि वैद्यकीय खर्च पाहता, आजच्या तारखेत आणि भविष्यातील वैद्यकीय आपतकाळात तुम्हाला वित्तीय संरक्षण देणारी आरोग्य विमा पॉलिसी असणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चालू पॉलिसीची सखोल अवलोकन करा आणि गरज भासल्यास तुमच्या गरजांप्रमाणे विमा सुधारा/ बदल करून घ्या.