Holiday Scams: ऑनलाईन तंत्रज्ञानाच्या दुनियेत आता सगळ्याच गोष्टी घरबसल्या फोन आणि कॉम्प्युटरवरुन करणं सोपं झालं आहे. आपण बरेच आर्थिक व्यवहार हे फोनमधून करतो, पण ऑनलाईन व्यवहारांमध्ये फसवणुकीचा (Online Scam) धोका देखील तितकाच वाढला आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. फिरायला जायचा प्लॅन करताना बहुदा आपण एखाद्या वेबसाईटवरुन चांगले पॅकेज शोधत असतो किंवा बजेटमध्ये राहण्यासाठी हॉटेल किंवा फ्लाईट तिकीट पाहत असतो. याच वेळी कधी कधी लोक बोगस बुकिंग वेबसाईट्सच्या विळख्यात सापडतात आणि त्यातून त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. तुमची ट्रिप खराब होऊ नये म्हणून काही फसवणुकीचे प्रकार लक्षात ठेवायला हवे.


ऑनलाईन घोटाळेबाज हे खोट्या वेबसाईट्स बनवतात आणि ग्राहकांची लूट करतात. 2022-23 मध्ये ऑनलाईन फसवणुकीचे 7 हजारांहून अधिक प्रकार समोर आले आहेत, ज्यात घोटाळेबाजांनी भोळ्याभाबड्या लोकांना फसवून लाखो रुपये कमावले आहेत. यापासून वाचण्यासाठी आणि घोटाळेबाजांपासून सावध राहण्यासाठी सामान्यपमे होत असलेल्या काही फसवणुकींपासून जाणून घेऊया. 


बुकिंग घोटाळे


काही बुकिंग साईट्सवर खोट्या माहिती किंवा ठिकाणं अपलोड केली जातात. आपण राहण्यासाठी एखादे हॉटेल किंवा व्हिला पाहतो आणि साईट्सवर अपलोड केलेले त्याचे फोटो आवडल्यास लगेच बुक करतो. पण काही वेळा बुकिंग साईट्सवर असलेली ही ठिकाणं अस्तित्वात नसतात आणि त्या जागी खोटे फोटो अपलोड केले जातात. Booking.com सारख्या दिसणाऱ्याच बनावट साईटवरुन एका परदेशी पर्यटकाने लंडनमध्ये राहण्यासाठी हॉटेल बुक केलं होतं, पण प्रत्यक्षात जेव्हा तो सूचीबद्ध केलेल्या पत्त्यावर पोहोचला तर ते एका रहिवाशाचं घर होतं. या प्रकरणात परदेशी पर्यटकाचे पैसे तर गेलेच, परंतु लंडनच्या रहिवाशाला देखील त्रास झाला. त्यामुळे कोणतेही बुकिंग करताना फीडबॅक चेक करावा आणि पैसे आधीच पाठवू नये.


बनावट 'ग्राहक सेवा' ट्विटर खाती


जेव्हा पर्यटक ट्विटरवर त्यांना उद्भवलेल्या सुट्टीच्या समस्यांबद्दल ट्विट करतात, जसं की जर एखाद्याचं सामान हरवलं. तर अशा वेळी त्यांना बोगस ट्विटर अकाऊंटवरुन रिप्लाय दिला जातो. त्यांच्या तक्रारीवर कारवाई केली जात आहे, असं त्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं जातं आणि नंतर प्रकरण सोडवण्यासाठी वैयक्तिक माहिती आणि पेमेंटची माहिती देण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. स्वत:ची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती समोरच्यासोबत शेअर केल्याने आर्थिक फसवणूक होऊ शकते, त्यामुळे यापासून सावध राहिलं पाहिजे.


एटीएम स्किमिंग


फसवणूक करणारे पीडितांची बँकिंग माहिती चोरण्यासाठी कॅश मशिनवर 'स्किमिंग' उपकरणं बसवू शकतात. स्किमर हे एक लहान डिव्हाइस आहे जे बँक कार्डच्या चुंबकीय पट्टीमधील तपशील - कार्ड क्रमांक, कालबाह्यता तारीख (Expiry Date) आणि खातेधारकाचं नाव यासह तपशील संग्रहित करते. यूके आणि परदेशात हे प्रकार सर्रास घडतात. पर्यटकांना परदेशी कार्ड मशिन कशा दिसल्या पाहिजेत हे माहित नसतं आणि त्यांची फसवणूक होते. घोटाळेबाज बँकिंग माहिती चोरण्यासाठी छुपे कॅमेरे, खोटे कीबोर्ड यासारख्या इतर उपकरणांचा देखील वापर करू शकतात. त्यामुळे कार्ड मशीन नीट हातात घेऊन पाहा. कार्ड स्लॉट आकाराने मोठा असेल तर त्याच्या आत फसवणुकीची उपकरणं असू शकतात.


जादा टॅक्सी भाडं आकारणे


परदेशी पर्यटक पाहिल्यावर जास्त भाडं आकारुन त्यांची फसवणूक करणं हे अगदी कॉमन आहे. परेदशात पर्यटकांना पाहून टॅक्सी ड्रायव्हर मीटर तुटले असल्याचं सांगतात आणि गंतव्यस्थानी सोडल्यावर मोठ्या रकमेची मागणी करतात. हे टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या हॉटेलच्या वतीने टॅक्सी बुक करू शकता. निघण्यापूर्वीच प्रवासासाठी किती खर्च आला पाहिजे? याची अंदाजे कल्पना तुमच्या हॉटेल, टूर गाईड किंवा विश्वासू लोकलला विचारा.


हेही वाचा:


Sacred Rivers In Hinduism : गंगा, सिंधू, गोदावरी... हिंदू धर्मियांसाठी या 10 नद्या पवित्र