Holi 2022 : रंगांचा सण म्हणून प्रसिद्ध असलेला होळी (Holi) हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. भारतातील इतर सणांप्रमाणे, होळी देखील वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते. देशभरात होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. होलिका दहन फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला असते.


धार्मिक कथांनुसार, होलिका दहनाची कथा विष्णू भक्त प्रल्हाद, त्याचा राक्षस पिता हिरण्यकश्यपु आणि त्याची बहिण होलिका यांच्याशी संबंधित आहे. असे मानले जाते की, होळीतील अग्नी हे वाईट वृत्ती जाळण्याचे प्रतीक आहे. दुसऱ्या दिवशी वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण म्हणून होळी साजरी केली जाते. यंदा 17 मार्च 2022 रोजी होळी साजरी केली जाणार आहे.


हिरण्यकश्यपू आणि भक्त प्रल्हादाची कथा!


हिरण्यकश्यपू हा प्राचीन भारतातील एक राजा होता, जो राक्षसासारखा होता. दानव असूनही तो स्वतःला देवापेक्षा मोठा समजत असे. लोकांनी फक्त त्याचीच पूजा करावी, अशी त्याची इच्छा होती. आणखी एक कारण होते, ज्यामध्ये भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूच्या धाकट्या भावाला शिक्षा केली होती, ज्याचा तो त्यांच्याकडून बदला घेऊ इच्छित होता. भगवान विष्णूचा बदला घेण्यासाठी त्याने वर्षानुवर्षे तपस्या केली, शेवटी त्याला एक वरदान मिळाले. परंतु, यामुळे हिरण्यकश्यपू स्वतःला देव मानू लागला आणि लोकांना देवाप्रमाणे स्वतःची पूजा करण्यास सांगू लागला.


या दुष्ट राजाला एक मुलगा होता, ज्याला आपण प्रल्हाद म्हणूनही ओळखतो. तो भगवान विष्णूचा महान भक्त होता. प्रल्हादला वारसा म्हणून आईकडून भक्ती मिळाली होती. प्रल्हादने कधीही आपल्या वडिलांची आज्ञा पाळली नाही आणि तो भगवान विष्णूची पूजा करत राहिला. स्वतःच्याच मुलाने त्याची पूजा न केल्याने संतप्त झालेल्या राजाने आपल्या पुत्राला मारण्याचा निर्णय घेतला.


हिरण्यकश्यपूने त्याला मारण्यासाठी आपल्या बहिणीची मदत घेतली. त्याने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला आपल्या मांडीवर घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले. होलिकाला वरदान होते की, अग्नी तिला कोणतीही इजा करू शकत नाही. होलिका अग्नीत जळू शकत नाही. प्रल्हादला जाळण्याची त्यांची योजना होती, पण त्याची योजना यशस्वी होऊ शकली नाही, कारण प्रल्हाद सर्व वेळ भगवान विष्णूचे नाव घेत राहिला आणि यातून बचावला. पण, यात दुष्टप्रवृत्तीची होलिका जळून राख झाली.


होलिकाचा हा पराभव वाईटाच्या अंताचे प्रतीक आहे. यानंतर भगवान विष्णूने हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यामुळे होळीचा सण होलिकाच्या मृत्यूच्या कथेशी जोडला जातो. यामुळे, भारतातील काही राज्यांमध्ये, होळीच्या एक दिवस आधी, वाईटाच्या अंताचे प्रतीक म्हणून होलिकेचा पुतळा चौकात ठेवला जातो आणि त्याचे दहन केले जाते, जे वाईटावर चांगल्याच्या विजयाचा संदेश देते.


हेही वाचा : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha