Assembly Election 2022 : काँग्रेस खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी नुकत्याच लागलेल्या पाच विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होईल यावर प्रतिक्रिया दिली आहे. पाच विधानसभापैकी चारमध्ये भाजपची सत्ता आली आहे. केतकर यांनी म्हटलं आहे की, ''भाजपचा आत्मविश्वास आणि उन्माद यांच्यामधील अंतर नाहीस होईल. भाजपच्या आत्मविश्वासाचं रूपांतर आता उन्मादामध्ये होईल त्यामुळे त्यांना अधिक असं वाटायला गेला की आपण महाराष्ट्रातील सरकार पाडू शकतो. जो प्रयत्न भाजप दोन वर्ष आधीपासूनच करत आहे पण काही झालं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फोडून नवीन सत्ता प्रस्थापित करण्याचा भाजपचा प्रयत्न राहील.''


पुढे केतकर यांनी सांगितलं की, ''तसं जमलं नाही तर राष्ट्रपती राजवट लावून नव्याने निवडणूक घेण्याचा भाजपचा प्रयत्त राहील. निकालामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे की स्वतंत्र निवडणुका लागल्या तर महाराष्ट्रात भाजप निवडून येईल. मात्र, त्यांच्या पुढे अडचण म्हणजे इतर पक्ष फोडल्याशिवाय महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता येणार नाही. भाजपकडे 105 जागा आहेत. त्यांना आणखी किमान 41 जागा हव्या आहेत. त्यामुळे हे सरकार पाडून किंवा राष्ट्रपती राजवट लावून पुन्हा निवडणुका घेऊन महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करेल. त्यामुळे निकालाचा महाराष्ट्रातील राजकारणावर परिणाम हे नक्कीच.''


केतकर यांच्यानुसार, भाजप आता सरकारमधील तिन्ही पक्षातील नेते फोडण्यावर भर देईल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस तिन्ही पक्षांतील काही नेत्यांना भाजपकडे वळवण्याचा त्यांचा मानस असेल. ज्याप्रमाणे राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले त्याप्रमाणे पुढच्या काळात इतर काही नेतेही भाजपमध्ये जाऊ शकतात असं भाजपला वाटणे स्वाभाविक आहे. मात्र, प्रत्यक्षात काय होतं ते पाहावं लागेल.


पाहा व्हिडीओ : महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम नक्की, सरकार पाडण्यासाठी BJP जोमाने प्रयत्न करणार



 


महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्ष एकजुटीने तोपर्यंतच आहेत जोपर्यंत यापैकी एखादा पक्ष फुटत नाही, असंही कुमार केतकर यांनी सांगितलं आहे. ''तिन्ही पक्ष आतापर्यंत तरी ते तीन पक्ष एकमेकांना धरून आहेत. याचं कारण केवळ विचारसरणीच्या नाही तर त्यांना माहित आहे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे गरजेच आहे. आपण एकत्र आलो तरच हे शक्य आहे, हे त्यांना ठाऊक आहे. त्यामुळे या जाणिवेतून ते एकत्र टिकून आहेत. भाजपला दूर ठेवण्यासाठी तिन्ही पक्ष वैचारिक आणि संघटनात्मकदृष्ट्या 100 टक्के एकत्र आहेत एवढं नक्कीच'', असं केतकर म्हणाले.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha