World Mental Health Day 2021 : आजच्या धावपळीच्या युगात सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावे लागते आहे. त्यातील खूप कमी व्यक्ती मानसिक तणावातून बाहेर पडतात. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मानसिक तणाव, डिप्रेशन, एंजायटीपासून हिस्टीरिया, डिमेंशिया, फोबिया सारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. जगाला मानसिक आरोग्याचे महत्त्व समजण्यासाठी, तसेच जनजागृती करण्यासाठी आज, 10 ऑक्टोबरला 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' (World Mental Health Day) साजरा केला जातो. त्यामुळे लोकांमध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती होण्यास मदत होते. 


'जागतिक मानसिक आरोग्य दिना'चा इतिहास


'जागतिक मानसिक आरोग्य दिना'ची सुरुवात 1992 साली झाली. संयुक्त राष्ट्रसंघाचे उपमहासचिव रिचर्ड हंट आणि वर्ल्ड फेडरेशनने हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे. या फेडरेशनमध्ये 150 पेक्षा अधिक देशांचा समावेश आहे. 1994 सालातील संयुक्त राष्ट्रसंघाचे तत्कालीन महासचिव यूजीन ब्रॉडीने एक थीम ठेवत हा दिवस साजरा करण्याचे सांगितले. तेव्हापासून मानसिक आरोग्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी आणि याबाबत जनजागृती करण्यासाठी 10 ऑक्टोबर हा दिवस 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' म्हणून साजरा केला जातो. 


'जागतिक मानसिक आरोग्य दिन 2021'ची थीम


वर्ल्ड फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. इंग्रिड डेनियल यांनी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन 2021 ची थीम ठरवली आहे. 'एका असमान जगाचे मानसिक आरोग्य' ही यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम असणार आहे. आज कोरोनामुळे गरीबांपासून श्रीमंतापर्यंत सारेच मानसिक तणावाला सामोरे जात आहेत. त्यामुळे यावर्षीची थीमही ठेवण्यात आली आहे. पण, आजही सामाजिक आणि आर्थिक स्थितीनुसार मानसिक आरोग्यासंबंधी भेदभाव खूप वाढला आहे.





 


जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे महत्त्व


बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावं लागत आहे. स्टिग्मा, डिमेंशिया, हिस्टीरिया, एग्जाइटी, आत्महीनता यांसारख्या आजारांचा त्यामुळे सामना करावा लागतोय. मानसिक आजारावर किंवा समस्यांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये मानसिक आरोग्याची जनजागृती करण्यात येत असते. तसेच मित्रपरिवार, नातलग आणि समाजाला समजून घेणे देखील गरजेचे असते. 


मानसिक आरोग्य आणि भारतातील परिस्थिती


2015-16 मधील एका सर्वेक्षणानुसार, भारतात दर 8 व्यक्तींमध्ये 1 व्यक्ती म्हणजेच, 17.5 कोटी लोकं कोणत्या ना कोणत्या एका मानसिक आजाराचा सामना करत आहेत. यातील 2.5 कोटी लोक गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. ज्यांच्यावर तत्काळ उपचार करणं गरजेचं आहे.