World Brain Tumor Day 2024 : आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवनशैली, जंकफूडचे सेवन, व्यायामाचा अभाव अशा बऱ्याच  गोष्टी विविध गंभीर आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. विविध चुकीच्या सवयींचा अनेक लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. ज्यामुळे क्षयरोग, कर्करोग तसेच ब्रेन ट्युमरच्या रुग्णांमध्येही जागतिक स्तरावर झपाट्याने वाढ झाली असून आता तरूणही त्याचे बळी ठरत आहेत. दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो. एका सर्वेक्षणानुसार, तरुणांनाच ब्रेन ट्यूमर होण्याचे प्रमाण जास्त असल्याचं समोर आलं आहे. याचं नेमकं कारण काय? याबाबत आरोग्यतज्ज्ञांनी माहिती दिलीय. जाणून घेऊया


 


तरुण आणि मुलांना ब्रेन ट्यूमर का होतो?


एका वृत्तसंस्थेच्या घेतलेल्या मुलाखतीनुसार दिल्लीचे न्यूरोसर्जन डॉ. अमित श्रीवास्तव यांनी याबाबत माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते तरुणांमध्ये  ब्रेन ट्यूमरचं प्रमाण वाढण्याचं कारण याला अनुवांशिक कारणं जबाबदार आहेत. मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये मेडुलोब्लास्टोमा आणि एपेंडिमोमा हे सर्वात सामान्य कर्करोग आहेत. याशिवाय ब्रेन ट्युमर होण्याचे मुख्य कारण मोबाईल फोनचा जास्त वापर केल्यास ब्रेन ट्युमरचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. फोनच्या संपर्कात आल्याने डोक्यात असलेल्या कवटीचे हाड कमकुवत होते, त्यामुळे फोनच्या रेडिएशनचा मेंदूवर परिणाम होतो. हे वेगाने वाढणारे ट्यूमर आहेत. या गाठी अनेकदा मेंदूच्या आणि पाठीच्या कण्यातील इतर भागांमध्ये पसरतात.



जागतिक ब्रेन ट्यूमर दिवसाचा इतिहास


2000 मध्ये, जर्मन ब्रेन ट्यूमर असोसिएशनने ब्रेन ट्यूमरच्या रुग्णांची वाढती संख्या पाहिल्यानंतर जागतिक ब्रेन ट्यूमर हा विशेष दिवस म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर हा दिवस साजरा करण्याची तारीख 8 जून निश्चित करण्यात आली. तेव्हापासून दरवर्षी 8 जून रोजी जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस साजरा केला जातो.


 


जागतिक ब्रेन ट्यूमर दिनाचे महत्त्व


जागतिक ब्रेन ट्यूमर दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे ब्रेन ट्यूमरबद्दल लोकांना जागरूक करणे, जेणेकरून अधिकाधिक लोकांना हा आजार समजू शकेल आणि त्याची सुरुवातीची लक्षणे सहज ओळखता येतील. या दिवशी विविध ठिकाणी शिबिरं आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात, ज्यामध्ये डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्ण सर्व सहभागी होतात आणि या विषयावर एकमेकांशी बोलतात.


 



ब्रेन ट्यूमरची लक्षणे


सकाळी वारंवार डोकेदुखी
मळमळ आणि उलटी.
चक्कर येणे
मानसिक संतुलन गमावणे
दृष्टी संबंधित समस्या.
पाठदुखी
चालताना समस्या
स्मृतीभ्रंश
उपचार


यावर उपचार काय?


तज्ज्ञांच्या मते, उपचारामध्ये शक्य तितक्या ट्यूमर काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते, त्यानंतर कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी रेडिएशन थेरपी वापरली जाते. जितक्या लवकर रोग ओळखला जाईल, तितक्या लवकर त्यावर उपचार केले जातील आणि हा रोग टाळणे सोपे होईल.


 


हेही वाचा>>>


Child Health : पालकांनो.. सुट्टीत मुलांना टीव्ही, मोबाईलपासून दूर ठेवायचंय? तर फक्त हे काम करा, जाणून घ्या


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )