Health : आजकालचे धकाधकीचे जीवन, बदलती जीवशैली, कामाचा ताण, वेळेवर अन्न न खाणे.. या सर्व गोष्टींमुळे मानवी शरीरावर, तसेच नात्यांवर नकारात्मक परिणाम होऊ लागले आहेत. याच काळात जोडप्यांना आणखी एक भेडसावणारी गंभीर समस्या म्हणजे, गर्भधारणेस होणारा विलंब.. आजच्या या लेखात आपण यासंबंधित गोष्टींबाबत माहिती देणार आहोत. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, 30 ते 40 या वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना गर्भधारणेसंबंधीत समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. याची कारणं काय आहेत? तज्ज्ञांनी काय इशारा दिलाय? जाणून घ्या..



30 ते 40 वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना गर्भधारणेची समस्या


तज्ज्ञांच्या माहितीनुसार, तुमच्या आयुष्यातील तणाव जोडप्याच्या कुटुंब नियोजनावर परिणाम करते. गर्भधारणेदरम्यान असलेला तणाव आणि नैराश्य हे आई आणि बाळासाठी चिंताजनक ठरु शकते. कौटुंबिक किंवा गर्भधारणेचे नियोजन करताना जोडप्यांनी तज्ञांचा सल्ला घेणे आणि तणावावर मात करणे गरजेचे आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार 30 ते 40 या वयोगटातील 80 टक्के जोडप्यांना तणावामुळे गर्भधारणेसंबंधीत समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.


 


'या'मुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागतो. 


कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणे, रात्री पुरेशी झोप घेणे आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. कौटुंबिक नियोजन आणि गर्भधारणेवर तणावाचा परिणाम होणार नाही याकडे लक्ष देणे आणि विचार करणे आवश्यक आहे. विविध अभ्यासांनुसार तणावाच्या उच्च पातळीमुळे पुरुष आणि स्त्रिया या दोघांमध्येही हार्मोनल संतुलन बिघडते, ज्यामुळे त्यांची प्रजनन क्षमता खराब होते. गर्भधारणेदरम्यानच्या तणावामुळे मुलामध्ये मुदतपूर्व जन्म, कमी वजनाचे बाळ आणि विकासासंबंधीत समस्या उद्भवू शकतात. दीर्घकालीन ताणतणाव अनुभवणाऱ्या मातांना गर्भधारणेसंबंधीत मधुमेह आणि प्रीक्लेम्पसिया यासारख्या परिस्थितींचा धोका असू शकतो. यामुळे बाळंतपणानंतर चिंता, नैराश्य आणि प्रसुतीनंतर नैराश्याची भावना निर्माण होते. तणावामुळे मासिक पाळीत व्यत्यय येतो, ज्यामुळे जोडप्यांना गर्भधारणेत अडचणींचा सामना करावा लागतो. 


 


निरोगी गर्भधारणेसाठी 'या' गोष्टी आवश्यक 


तणावामुळे नातेसंबंधावर परिणाम होऊन कुटुंब नियोजनाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. तणावाचा सामना करणारी जोडपी निरोगी गर्भधारणेसाठी आवश्यक असलेल्या पद्धतींचे पालन करण्यात अयशस्वी ठरतात जसे की संतुलित आहार, नियमित व्यायाम किंवा रात्रीच्या वेळी चांगली झोप घेणे. कुटुंब नियोजनाच्या प्रवासात तणावाची भूमिका ओळखून तणावाची पातळी व्यवस्थापित करणे गरजेचे आहे. यामुळे यशस्वी गर्भधारणेचा प्रवास सुरळीत होत असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रिथिका शेट्टी (प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, खराडी) यांनी स्पष्ट केले.


 


आयुष्य तणावमुक्त कसे राहील? तज्ज्ञ काय सांगतात..


डॉ. भारती ढोरेपाटील(वंध्यत्व निवारण तज्ज्ञ, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी,पुणे) सांगतात की, जोडप्यांनी एकत्रितपणे मेडिटेशन सारख्या विश्रांती तंत्राचा सराव करून पालकत्व आणि गर्भधारणेच्या नियोजनाच्या प्रवासाला सुरुवात करावी आणि आपले आयुष्य तणावमुक्त कसे राहिल यासाठी प्रयत्न करावा. ध्यान आणि योगामुळे तणावाची पातळी कमी होते आणि जोडप्यांमधील संबंध आणखी घट्ट होतात. तुमच्या भावना, भीती आणि कौटुंबिक नियोजनाविषयीच्या अपेक्षांबद्दल खुला संवाद साधा. एकमेकांसाठी सुरक्षित जागा निर्माण करून तणाव कमी करता येऊ शकतो. जोडप्यांनी त्यांच्या आणि योणाऱ्या बाळाच्या आरोग्याबाबत जागरुक राहणे आवश्यक आहे.


 


 


 


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. कोणताही उपाय वापरण्यापूर्वी, तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यावा)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Skin Tips : ''एक लाजरा नं साजरा मुखडा!'' त्वचा चिरतरूण ठेवण्यासाठी अमृतासमान 'ही' 3 फळे खा; मग कोण म्हणेल तुम्हाला वयोवृद्ध!