Women health: चाळीशीनंतर महिलांमध्ये आरोग्यविषयक अनेक तक्रारी वाढतात. हार्मोन बदलांसह रजोनिवृत्तीचा हा काळ असल्याने महिलांना शारिरीक दुखण्यांसह मानसिक आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. अनेकदा रोजच्या घाईगडबडीत महिला दुखणं अंगावर काढतात आणि रोग बळावतो. त्यामुळे अनेक महिलांना वेळेत बरा होणारा रोग गंभीर झाल्याचंही दिसून आलंय. अशा वेळी योग्य आहार आणि व्यायमासह काही गरजेच्या वैद्यकीय चाचण्याही वेळेत करून घेणं गरजेचंय. 


स्तन तपासणी, मेमोग्राम टेस्ट


स्तनाचा कर्करोग हे भारतातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. वयानुसार स्तनाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने  मॅमोग्राम/अल्ट्रा सोनोग्राफी करून घेतली पाहिजे. हा आजार वेळीच आढळून आल्यास योग्य उपचार करणे शक्य होते. तुमच्या कुटुंबातील कोणाला कर्करोगाचे निदान झाले असेल तर त्या महिलांनी वेळेत ही चाचणी करून घ्यावी.


शुगर टेस्ट


वयाच्या १५ व्या वर्षापासून महिलांना मधुमेहाचा धोका असतो. ते नियंत्रणात ठेवण्यासाठी रक्तातील ग्लुकोजची तपासणी करून घेणं गरजेचे आहे. जेणेकरून मधुमेह किंवा प्री-डायबेटिस ओळखता येईल. चाळीशीनंतर ही टेस्ट आवर्जून करून घ्यावी.


थायरॉईड चाचणी


बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये थायरॉईडची समस्या वाढलेली आहे. पाचमधील ३ महिलांना थायरॉईडचा धोका असल्याने वर्षातून एकदा थायरॉईडची चाचणी करून घेणं आवश्यक आहे.थायरॉईडचा धोका पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असतो. सतत वजन वाढणे किंवा कमी होणे हे थायरॉईडचे कारण असू शकते.टीएसएच (TSH), टी३ (T3), टी४ (T4) पातळी तपासणे आवश्यक आहे. हे जाणून घेण्यासाठी, थायरॉईड चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला जातो.


पेल्विक तपासणी आणि पॅप स्मीअर


वयाच्या चाळीशीनंतर पेल्विक टेस्ट करून घेण्याचा सल्ला दिला जातो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा भारतातील बहूतेक महिलांमध्ये आढणारा आणि मृत्यूचं कारण ठरणारा आजार आहे. वेगाने वाढणाऱ्या या कर्करोगाचं प्रमाण प्रचंड असून दरवर्षी लाखो महिलांचा या कॅन्सरमुळे मृत्यू होतो. यासाठी महिलांनी ही तपासणी करणं आवश्यक असल्याचं तज्ञ सांगतात.


अनुवंशिक तपासणी


अनुवांशिक चाचणीमध्ये अनुवांशिक रोग शोधले जातात. यामध्ये रक्ताच्या नमुन्यांची टेस्ट केली जाते. कुटुंबातील कोणाला कोणताही अनुवांशिक आजार असल्यास जन्माला आलेल्या लहान मुलांची चाचणी करून हा आजार लगेच ओळखता येतो. चाळीशीनंतर अंनुवंशिक एखादा आजार जडला असेल तर तो बरा होण्यास मदत होते.


सीबीसी चाचणी


आजकाल बहुतेक महिलांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे महिलांनी सीबीसी चाचणी करून घ्यावी. याद्वारे, प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि हिमोग्लोबिनची पातळी जाणून घेण्यास आणि योग्य उपचार करण्यास मदत होते.