नवी दिल्ली : 'प्रोसेस्ड फूड'चा वाढता वापर, राहणीमानात आलेलं आधुनिकीकरण आणि बदलणारी जीवनशैली या साऱ्याचे थेट परिणाम दैनंदिन जीवनातील आहाराच्या सवयींवर, आरोग्यावर होतात. सतत व्यग्र असण्यामुळं हल्ली अनेकजण सोप्या पद्धतीने उपलब्ध असणाऱ्या 'प्रोसेस्ड फूड'ला प्राधान्य देतात. करायला सोपं आणि चवीला रुचकर असे हे पदार्थ जीभेचे चोचले पुरवतात खरे, पण त्यामध्ये फॅट, ट्रान्स फॅट, साखर आणि मीठाचंही प्रमाण अमाप असतं. 


Covid-19 : कोरोनापासून बचाव अन् रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयनं सांगितले उपाय


मीठ हा सोडियमचा स्त्रोत आहे आणि मीठाच्या अति सेवनामुळे ताणतणाव, हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका संभवतो. या साऱ्यामध्ये फळभाज्या आणि तंतूमय भाज्या खाण्याकडे दुर्लक्ष होतं, ज्याचा शरीराला मोठा फायदा असतो. फळं, भाज्यांमध्ये असणाऱ्या पोटॅशियमचा वापर रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी केला जातो. 


आहारात मीठ विविध मार्गांनी समाविष्ट होत असतं. 


बेकन, चीज, सलामी, वरुनही मीठ शिवरलेले पदार्थ (वेफर्स), इन्सटंट नूडल्स आणि इतही पदार्थ हे साठवणीचे असल्यामुळे त्यामध्ये मीठाचा वापर केला जातो. हे पदार्थ शिजवतानाही त्यामध्ये मीठ टाकलेलं असतं. याव्यतिरिक्त विविध प्रकारचे पदार्थांची चव वाढवणारे सॉसही जेवणात नकळतच मीठाचं प्रमाण वाढवतात. 


कोणासाठी किती मीठ गरजेचं? 


- जागतिक आरोग्य संघटनेच्या सल्ल्यानुसार प्रौढ वयोगटातील व्यक्तींनी एका दिवसाला 5 ग्रॅमहूनही कमी (एका टीस्पूनपेक्षाही कमी) मीठाचं सेवन केलं पाहिजे.


- 15 वर्षांखालील बालकांनी प्रौढ वयोगटाहूनही कमी प्रमाणात मीठाचं सेवन करावं. (या वयोगटात 0 ते 6 महिने वयोगटातील स्तनपान घेणाऱ्या बालकांचा समावेश नाही).


- सेवन केलं जाणारं मीठ आयोडिनयुक्त असावं. याची मदत मेंदूच्या वाढीसाठी होते. 


सोडियम हा घटक शरीरातील प्लाझ्माचं प्रमाण, अॅसिड बेस आणि शरीरारील नसांसाठी महत्त्वाचा असतो. पण, त्याचं अती सेवनही धोक्याचं असतं. ज्यामुळे याचे थेट परिणाम रक्तदाबावर दिसून येतात. 


दैनंदिन जीवनात मीठाचं प्रमाण कमी कसं करावं? 


- रोजच्या जेवणाची तयारी करताना त्यामध्ये मीठ घालणं टाळा


- जेवणाच्या टेबलावर किंवा पानात जास्तीचं मीठ ठेवू नका


- मीठाचा जास्त वापर असणाऱ्या पदार्थांचं सेवन टाळा 


- सोडियमचं प्रमाण कमी असणाऱ्या पदार्थांना प्राधान्य द्या 


फक्त घरच्या घरीच नव्हे तर, रेस्टराँ आणि खाद्यपदार्थ उद्योगांनाही सूचना देत मीठाचं प्रमाण कमी करण्यासा सल्ला देत जागतिक आरोग्य संघटनेकडून काही महत्त्वाचे आणि उपयुक्त असे सल्ले देण्यात आले आहेत. ज्यामध्ये नागरिकांना सोडियमच्या अतिसेवनाने उदभवणारा धोका नेमका कसा आहे हे सांगण्यासोबतच रेस्टराँमधच्या टेबलवरुनही मीठाची बाटली दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे.