Winter Health Tips : बदलत्या वातावरणात शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर (Immune System) परिणाम होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) कमी होऊन आपण विविध साथीच्या आजारांना बळी पडतो. संसर्गजन्य रोगांपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देण्याची गरज असते. अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि पोषकतत्त्वांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढून संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत होते.
संसर्गजन्य रोगांपासून बचावासाठी व्हिटॅमिन 'सी' सोबतच इतर पोषकतत्वांची देखील आवश्यकता असते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आणि डी सोबतच इतर पोषकतत्वांचीही गरज असते. यासाठी तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी-6 आणि व्हिटॅमिन ई असलेल्या गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. याबाबत अधिक माहिती वाचा.
अँटिऑक्सिडंट्स
विविध संशोधनातील चाचणीच्या अहवालानुसार, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अँटिऑक्सिडंट पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर ठरले. डॉक्टरांच्या शिफारसीवरून अँटिऑक्सिडंट सप्लिमेंट्स घेतल्याने रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी, ई आणि ए किंवा बीटा-कॅरोटीनचा समावेश केल्यास तुमची प्रतिकारशक्ती मजबूत होईल. शरीरातील ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी, कॅन्सर आणि अनेक प्रकारच्या जुनाट आजारांपासून संरक्षण करण्यासाठी अँटिऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे सेवन करणेही फायदेशीर ठरू शकते.
व्हिटॅमिन बी-6
शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी-6 च्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. व्हिटॅमिन बी-6 मेंदूच्या विकासासाठी, मज्जासंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी फायदेशीर आहे. यासोबतच रोगप्रतिकार प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 महत्वाचे आहे. कोंबडी, मासे, बटाटे, चणे, केळी आणि तृणधान्ये हे व्हिटॅमिन बी-6 चा उत्तम स्रोत असून या पदार्थांचा आहारात नक्की समावेश करा.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांसाठी अतिशय लाभदायक आहे. मानवी शरीरासाठी व्हिटॅमिन ई हे एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. व्हिटॅमिन ई रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करून रोगप्रतिकारक शक्तीला संसर्गाशी लढण्यास मदत करते. व्हिटॅमिन ई रक्तामध्ये गुठळ्या तयार होण्यापासून रोखण्यास मदत करते. एका संशोधनात असं आढळून आलं की, व्हिटॅमिन ईच्या कमतरतेमुळे रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बिघडण्याची शक्यता असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :