Candida Auris Fungal Disease: कोरोनानं (Coronavirus Updates) संपूर्ण जगभरात थैमान घातलं, आता कुठे कोरोनातून जग सावतंय तर पुन्हा एकदा नव्या आजारानं चिंता वाढवली आहे. सध्या अमेरिकेत थैमान घालत असलेल्या आजाराची सगळीकडे चर्चा आहे. या रोगाचं नाव, कँडिडा ऑरिस फंगल डिसीज (Candida Auris Fungal Disease). या महिन्यात, वॉशिंग्टनमध्ये (Washington) किमान 4 लोक या आजाराला बळी पडले आहेत. हा आजार अत्यंत धोकादायक मानला जातो, कारण हा एक दुर्मिळ प्रकारचा संसर्ग आहे. डॉक्टरांच्या मते, या आजाराचा मृत्यूदर (Mortality Rate) खूपच जास्त आहे. तसेच, हा एक बुरशीजन्य संसर्ग आहे, ज्यावर औषधांचा प्रभाव फारच कमी दिसतो. 


झपाट्यानं वाढतो संसर्ग 


कँडिडा ऑरिस फंगल डिसीज रुग्णालयांमध्ये झपाट्यानं पसरत आहे. अमेरिकेत या आजाराचा संसर्ग झालेल्यांची संख्या वेगानं वाढत आहे. या आजाराच्या लक्षणांबाबत बोलायचं झालं, तर काही विशेष लक्षणं दिसत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे, या आजाराची लागण झाल्यानंतर रुग्ण लगेच आजारी पडत नाही. त्यामुळे इतरांमध्येही या आजाराचा संसर्ग झपाट्यानं पसरतो. रुग्णाला कळण्याच्या आतच हा आजार संपूर्ण शरीराचा ताबा घेतो. 


पहिला रुग्ण 10 जानेवारीला आढळला  


एनबीसी न्यूजनुसार, 10 जानेवारी रोजी अमेरिकेत या फंगल इन्फेक्शनच्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. यानंतर, सिएटल आणि किंग काउंटीमध्ये आणखी तीन नवी प्रकरणं नोंदवली गेली आहेत. हा बुरशीजन्य संसर्ग सर्वात आधी कोणत्याही व्यक्तीच्या प्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. त्यामुळे अनेक अँटीफंगल औषधं देखील या आजारावर काम करत नाहीत. त्यामुळे रुग्णाला इतर आजार होऊ लागतात. पुढे जाऊन हा आजार रुग्णाच्या शरीराचा इतका ताबा घेतो की, रुग्णाचा मृत्यू होण्याचाही धोका वाढतो. 


डॉक्टरांचं म्हणणं काय?


डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार पॅथोजन फीडिंग ट्यूब, ब्रीदिंग ट्यूब किंवा कॅटहीटरच्या वापरामुळे हे इन्फेक्शन आणखी वाढतं. एवढंच नाहीतर रक्तापासून त्वचेपर्यंत हा संसर्ग वेगानं पसरतो. या आजारामुळे शरीरावर मोठमोठ्या जखमाही होऊ शकतात. या आजाराची लक्षणं सुरुवातीच्या काही दिवसांत दिसत नाहीत. लक्षण दिसेपर्यंत आजाराचा संसर्ग इतर व्यक्तींमध्ये झालेला असतो. 


जर हा आजार कोणालाही झाला, तर त्या व्यक्तीनं स्वतःला क्वॉरंटाईन करणं गरजेचं आहे. जर तुम्ही रुग्णाच्या जवळ जाणार असाल किंवा त्याच्या संपर्कात येणार असाल तर हातात हँडग्लोज, तोंडावर मास्क लावून जावं. त्यानंतर सॅनिटायझरन हात स्वच्छ करावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लहान मुलांना संसर्ग झालेल्या व्यक्तीपासून लांब ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. 2022 मध्ये 2377, 2016 मध्ये 53 लोकांना या आजाराचा संसर्द झाला होता. आतापर्यंत 40 देशांत या आजाराचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून आले आहेत. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)