Weight Loss Tips : लॅाकडाऊनच्या काळात अनेकजण वर्क फ्रॉम होम करत असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष होत आहे. त्यातच सतत एका जागी तासन्तास बसून बहुतांश जण लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करत आहेत. वाढणारं वजन ही तशी सर्वांसाठीच डोकेदुखी. वाढणारं वजन कमी करण्यासाठी अनेकजण अतोनात प्रयत्न करत असतात. बाजारात मिळणारी औषधं, जिममध्ये घाम गाळणं, घरगुती उपचार, डाएट प्लान यांसारखे अनेक उपाय केले जातात.
बऱ्याचदा आपण थोरामोठ्यांकडून ऐकलं आहे की, एक ग्लास लिंबू पाणी मधासोबत प्यायल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांकडूनही अनेकदा दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण खरंच सकाळी अनोशापोटी लिंबू पाणी प्यायल्यानं फायदा होतो? तसेच, अनेक तज्ज्ञ वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला का देतात? जाणून घ्या...
आपल्या सर्वांना माहीतच आहे की, लिंबू पाणी आपल्या शरीरातील पचनसंस्था सुधारण्याचे काम करते. त्याचबरोबर आपल्या शरीराला असणारी व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरजही लिंबू पाणी पूर्ण करते. तज्ज्ञांच्या मते, योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मदत होते आणि त्यातल्या त्यात लिंबामधील गुणधर्म पोटावरील फॅट्स कमी करण्याचं काम करतं. लिंबामध्ये फायबर, पोटॅशिअम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी-6, पेक्टिन आणि सायट्रिक अॅसिड असतं. फ्री रेडिकल्सविरोधात संरक्षण करण्यासोबतच अॅन्टीऑक्सिडंट्स हृदयाचं आरोग्य उत्तम राखण्यास फायदेशीर ठरतात. त्याचबरोबर आपल्याला कॅन्सरसारख्या आजारापासून सुटका मिळू शकते.
वजन कमी करण्यासाठी कसं फायदेशीर ठरतं लिंबू पाणी?
लिंबू पाण्यात शरीराला आवश्यक असणारी अनेक पौष्टीक तत्व असतात. तसेच यापैकी काही पौष्टीक तत्व वजन कमी करण्यासाठीही फायदेशीर ठरतात. यामध्ये पेक्टिन असतं. ज्यामुळे सतत लागणाऱ्या भूकेवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं. लिंबातील फ्लेवोनॉयड्स शरीरातील मेटाबोलिज्म वाढवतात. मेटाबोलिज्म वजन कमी करण्यासाठी मदत करतं. दररोज लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराची सूजही कमी होते. तसेच शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्याचं कामही लिंबू पाणी करतं. लिंबामध्ये पोटॅशियम असंत, ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते.
घरीच तयार करा लिंबू पाणी
दररोज सकाळी लिंबू पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे होतात. त्यासाठी पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस एकत्र करा. वजन कमी करण्यासाठी त्यात एक चमचा जिऱ्याची पूडही एकत्र करु शकता. त्यानंतर या मिश्रणाला एक उकळी घ्या. पाणी गाळून त्यात एक चमचा मध घाला.
(टिप : सदर गोष्टी केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत, ABP माझा यातून कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :