सातारा : आपल्या देशात तोंडाच्या कॅन्सरच्या (Oral Cancer)  रुग्णांची संख्या जगभरातील एकूण कॅन्सरच्या संख्येपेक्षा जास्त आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तंबाखू व तंबाखुजन्य (Tobacco) पदार्थांचे वाढते सेवन. आपल्या देश तंबाखूचा सर्वात मोठा ग्राहक आणि उत्पादक आहे. यामुळे मौखिक कर्करुग्णांचे (Cancer) प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार तंबाखू, गुटखा, सिगारेट, किंवा खैनी सेवन करणाऱ्यांनी महिन्यातून एकदा तोंडाच्या आरोग्याची तपासणी करणे गरजेचे आहे.


मौखिक कर्करोगाची लक्षणे कशी ओळखाल?


मौखिक कर्करोगाची (ओरल कॅन्सर) सुरुवातीची लक्षणे ओळखण्यासाठी तुमच्या तोंडांत चार बोट घातली तर ते व्यवस्थित उघडत आहे का, हे तपासा. तसे होत नसेल तर वेळ न दवडता डॉक्टरांशी संपर्क साधा. मौखिक कर्करोग टाळण्यासाठी धूम्रपानाची वाईट सवय सोडणे आवश्यक आहे. मौखिक स्वच्छतेची काळजी घेणे, तोंड आणि जीभ नियमितपणे स्वच्छ करणे आवश्यक आहे. तोंडाच्या आत काही बदल दिसल्यास किंवा अन्न गिळताना त्रास होत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.


मौखिक स्वच्छतेसाठी हे करा उपाय


डॉ. विजय सुतार (वैद्यकिय प्रशासक, ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर, सातारा) सांगतात की, तोंडात पांढरे-लालसर पुरळ किंवा फोड, तोंड उघडण्यात अडचण, जीभ बाहेर काढतांना त्रास, आवाजात झालेला बदल यापैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकिय सल्ला घ्या. तोंडाची स्वच्छता आणि दातांची काळजी नियमितपणे घेतली नाही तर हिरड्यांना सूज, जळजळ आणि इतर संसर्ग होऊ शकतात. या दीर्घकालीन संसर्गामुळे त्वचेच्या पेशींच्या डीएनएला नुकसान होऊन कर्करोग होऊ शकतो. मौखिक स्वच्छतेसाठी दिवसातून दोन वेळा दात घासणं, फ्लॉसिंग करणं, टूथब्रश वेळोवेळी बदलणं गरजेचं आहे.


चांगल्या मौखिक आरोग्यासाठी सुदृढ जीवनशैलीचा अवलंब करणे अतिशय गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित व्‍यायाम करणे तसेच ॲन्‍टीऑक्‍सिडंट, प्रोटीन, फायबरर्सचा समावेश असलेला पुरक आहार घेणे गरजेचे आहे. तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे वेळीच ओळखल्यास व वेळीच निदान झाल्यास परिस्थिती नियंत्रणात आणता येऊ शकते. यासाठी तुमच्या तोंडात होणाऱ्या बदलनाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. ठराविक कालावधीनंतर तोंडाची व दातांची तपासणी करत राहायला हवी असेही डॉ सुतार यांनी स्पष्ट केले.


हे ही वाचा