Silent Killer Cancer : कर्करोग म्हणजे कॅन्सर (Cancer) हा सायलेंट किलर (Silent Killer) आजार आहे. कॅन्सर रोगाची लक्षणे (Cancer Symptoms) सुरुवातीला दिसत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा कॅन्सर पुढच्या टप्प्यात पोहोचल्यावर त्याची लक्षणे जाणवतात. त्यामुळे वेळीच सावध होणं गरजेचं आहे. शरीरातील ट्यूमर (Tumor) म्हणजे गाठी दोन प्रकारच्या असतात. एक कॅन्सरची (Cancer Tumor) आणि दुसरी नॉन कॅन्सर (Non-Cancer Tumor). शरीरातील एखाद्या भागात पेशींची अनियंत्रित वाढ होऊन त्याची गाठ तयार होते. हा ट्यूमर किंवा ही गाठ कॅन्सरची आहे की नॉन कॅन्सर आहे, यामधील फरक चाचणी अर्थात बायोप्सी (Biopsy) केल्यानंतरच समोर येतो. हे ट्यूमर किंवा गाठी शरीरातील कोणत्याही भागात तयार होऊ शकतात.


कॅन्सर आजाराबाबतची मुख्य बाब म्हणजे कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात ओळखणे फार अवघड असते. जेव्हा कॅन्सर शरीरातील इतर अवयवांपर्यंत पोहोचतो, तेव्हा त्याची लक्षणे तीव्र गतीने जाणवतात. यावेळी कॅन्सर झाल्याचं समोर येतं. असाच एक कर्करोग आहे, जो सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो, तो म्हणजे फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer). धुम्रपान (Smoking) करणे हा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण आहे.


फुफ्फुसाचा कर्करोग सायलेंट किलर 


कर्करोगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. यामधील फुफ्फुसांचा कॅन्सर (Lung Cancer Symptoms) सायलेंट किलर म्हणजे संथ गतीने पसरणारा अतिशय धोकादायक प्रकार असल्याचं डॉक्टराचं मत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, फुफ्फुसाच्या पेशींमधील ट्यूमर तयार होतो, तेव्हा त्याला फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा फुफ्फुसाचा कर्करोग असं म्हणतात. हा कर्करोग माणसाला हळूहळू मारतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. हा कॅन्सर होण्याचं प्रमुख कारण म्हणजे धूम्रपान. फुफ्फुसाच्या कॅन्सरचं लवकर निदान झाल्यास व्यक्ती दीर्घकाळ आयुष्य जगू शकतो.


एका अहवालानुसार, केवळ 15 टक्के फुफ्फुसांच्या कर्करोग झालेल्या रुग्णावर प्राथमिक अवस्थेत उपचार करता येतात. योग्य उपचार मिळाल्यानंतर असे रुग्ण पाच वर्षांपर्यंत जगू शकतात, पण याचं प्रमाण 54 टक्के आहे. 70 टक्के फुफ्फुसाचा कर्करोग झालेल्या रुग्णावर सुरुवातीच्या काळात उपचार केल्यास हे रुग्णही अधिक काळ जगू शकतात. पण हा कॅन्सर शरीराच्या इतर भागांत पसरल्यास रुग्ण बरे होण्याचं प्रमाण फार कमी असते. अशा प्रकरणांमध्ये रुग्ण वाचण्याचं प्रमाण केवळ 4 टक्के आहे.


धुम्रपान व्यक्तिरिक्त ही आहेत फुफ्फुसांच्या कॅन्सरची कारणं


दरम्यान, फक्त धुम्रपान केल्यावरच फुफ्फुसांचा कॅन्सर होतो असं नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये सिगारेट पिणं हे फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचं मुख्य कारण असल्याचं समोर आलं आहे किंवा बिडी आणि इतर प्रकारचे धूम्रपान हे देखील कर्करोग होण्याचं एक प्रमुख कारण आहे. मात्र, आजकाल धुम्रपान न केलेल्या लोकांनाही फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं दिसून येत आहे. फुफ्फुसाच्या कर्करोगाची कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत.


फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणे (Lung Cancer Symptoms)


फुफ्फुसाच्या कर्करोगाचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे खोकला. हा खोकला हळूहळू गंभीर स्वरुपाचा होतो. खोकला दिवसेंदिवस वाढत कधीही बरा होत नाही. औषध घेतल्यावर या खोकल्यापासून थोडा आराम मिळतो, पण नंतर पुन्हा खोकला सुरू होतो. नंतर फुफ्फुसावर सूज येणे, खोकल्यावर रक्त येणे, श्वासोच्छवासात त्रास होणे, छातीत दुखणे ही देखील याची लक्षणे आहेत. अशा प्रकारची लक्षणे जाणवल्यास वेळीच सावध होऊन बायोप्सी करुन घेतल्यास कॅन्सरचे निदान होईल.


फुफ्फुसांच्या कॅन्सरवरील उपचार (Lung Cancer Treatment)


फुफ्फुसांच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी हे उपचार आहेत. डॉक्टर फुफ्फुसाच्या कर्करोगाचा प्रकार, स्टेज आणि इतर घटकांवर आधारित योग्य उपचार ठरवतात. जर फुफ्फुसाचा कॅन्सर पहिल्या टप्प्यातील असेल तर रुग्ण बरे होण्याची शक्यता जास्त असते. पण हा कॅन्सर शेवटच्या टप्प्यातील म्हणजे मेटास्टॅसिस  (शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोगाचा पसरल्यास) असल्यास, उपचारानंतरही रुग्ण केवळ काही महिने किंवा काही वर्षे जगू शकतो.