Shravan 2024 : श्रावण महिना सुरू झाला आहे. हिंदू धर्मात या श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व आहे. हा महिना व्रत वैकल्याचा महिना आहे. या काळात अनेक भाविकांचे उपवासही सुरू होतात. आयु्र्वेदानुसार, लोकांनी श्रावण महिन्यात सात्विक अन्न खावे. कारण हे ताजे आणि सहज पचणारे अन्न असते, यामुळे केवळ शरीर शुद्ध होत नाही तर अध्यात्माकडे आपले लक्षही एकाग्र होते. याचं महत्त्व लक्षात घेऊन अभिनेत्री श्रेया बुगडे हिने तिच्या मुंबईतील हॉटेलच्या मेन्यूमध्ये खास श्रावण थाळीचा समावेश केला आहे. काय खास आहे या थाळीत जाणून घेऊया...


 


कुळीथ सूप.. काळ्या वाटाण्याची आमटी..अन् बरंच काही!


अभिनेत्री श्रेया बुगडेच्या 'द बिग फिश' हॉटेलच्या मेन्यूमध्ये खास श्रावण थाळीचा समावेश करण्यात आलाय, ज्याबद्दल सर्वाधिक चर्चा आहे. श्रावण महिन्यातील विशेष भाज्यांचा या थाळीत समावेश करण्यात आला आहे. कुळीथ सूप, काळ्या वाटाण्याची आमटी, केळ फूल भाजी, अळू-गोळ्याची आमटी, फणस भाजी अशी खमंग मेजवानी या स्पेशल थाळीतील पदार्थांमध्ये असेल. सोबतच पुरी, कांदा भजी, बटाटे वडे, ओल्या नारळाची खीर, काकडीचे धोंडस, मसाले भात, वरण-भात तूपचा आस्वाद तुम्हाला घेता येईल, श्रेया बुगडेचं हे हॉटेल मुंबईतील दादर परिसरात आहे.


 


 


श्रावण महिन्यात सात्विक अन्न का खातात?


श्रावण महिन्यात काही नियम पाळले जातात. या काळात तामसिक अन्न, मांस, अंडी, लसूण-कांदा इत्यादी टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, केवळ सात्विक अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीराची आंतरिक शुद्धी होते आणि मानसिक आरोग्यही सुधारते. श्रावण महिन्यात सात्विक अन्न का खावे, असा प्रश्न अनेकांना पडतो. तर श्रावणात सात्विक अन्न खाण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे शरीराचे डिटॉक्सिफाय करणे. श्रावण महिन्यात लोक सात्विक अन्न खाऊन शरीर शुद्ध करतात. याचे आरोग्यासाठीही अनेक फायदे होतात. सात्विक अन्नामध्ये लसूण, कांदा, मांस, मासे, मद्य, तंबाखू आणि धूम्रपान इत्यादी सर्व टाळले जातात. त्याऐवजी फळे, भाज्या, धान्ये, नट, सुका मेवा इत्यादींचा वापर केला जातो.



आयुर्वेद काय म्हणतो?


आयुर्वेदानुसार श्रावण महिन्यात भरपूर पाऊस पडतो. अशात आपल्या शरीराला या हवामानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. पावसाळ्यात आपली पचनसंस्था खूप कमकुवत होते. याशिवाय रोगप्रतिकारक शक्तीवरही परिणाम होतो. अशावेळी आपण सर्दी, ताप, विषाणूजन्य संसर्ग इत्यादींना लवकर बळी पडतो. त्यामुळे या काळात तामसिक आणि जड अन्न टाळण्याचा सल्ला दिला जातो, हे केवळ शरीर शुद्ध करण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील आहे. कारण असे अन्न लवकर पचत नाही. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळेच या काळात सात्विक आणि हलके अन्न खाल्ल्यास ते शरीरात लवकर पचते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते. तसेच, आपले मन शांत करण्यास आणि तणावमुक्त राहण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील घाणही निघून जाते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून श्रावण महिन्यात सात्विक आहार घेणे महत्त्वाचे आहे.