Ramsay Hunt Syndrome: आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. ‘रामसे हंट सिंड्रोम’ (Ramsay Hunt Syndrome) या आजारामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायूचा झटका आल्याने त्याचे सगळे शो रद्द करण्यात आले आहेत. मात्र, यामुळे ‘रामसे हंट सिंड्रोम’ हा आजार चर्चेत आला आहे. हा आजार नेमका काय आहे? याची लक्षणे काय आहेत? याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न सगळेच करत आहेत.


रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. 1907 मध्ये या दुर्मिळ आजाराचे प्रथम संशोधन करणारे डॉक्टर जेम्स रामसे हंट यांच्या नावावरून या आजाराचे नाव देण्यात आले आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येतात, जे वेदनादायक असतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा, व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो, तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो. चला जाणून घेऊया या आजाराबद्दल...


रामसे हंट सिंड्रोम म्हणजे काय?


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, कांजण्यांना कारणीभूत असणारे विषाणूच या आजाराला कारणीभूत आहेत. त्याच विषाणूमुळे ‘रामसे हंट सिंड्रोम’ देखील होतो. एखाद्या व्यक्तीला तेव्हाच रामसे हंट सिंड्रोमची लागण होते, जेव्हा व्हेरिसेला झोस्टर विषाणू मेंदूच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो. या आजारामुळे बाधित व्यक्तीच्या चेहऱ्यावर आणि कानाभोवती पुरळ उठू लागते. रामसे हंट सिंड्रोमची लक्षणे दिसल्यास, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर ताबडतोब उपचार केले पाहिजेत. दुर्लक्ष केल्यास हा आजार अधिक धोकादायक ठरू शकतो.


रामसे हंट सिंड्रोमची लक्षणे


- डोळ्यांमध्ये कोरडेपणा


- चेहऱ्यावर पुरळ उठणे


- एका कानाने ऐकू कमी येणे


- कानाच्या पडद्यावर पुरळ येणे


- चेहऱ्याच्या एका बाजूची हालचाल न होणे


उपाय


या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तीने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. डॉक्टर प्राथमिक स्तरावर वेदनाशामक देतात. त्यांच्या सेवनाने चक्कर येण्याच्या समस्येत आराम मिळतो. तथापि, यातून पूर्णपणे बरे होण्यासाठी उपचार आवश्यक आहेत. यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तरी त्वरित उपचार घ्या.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत


संबंधित बातम्या