Justin Bieber : आपल्या ‘बेबी’ गाण्याने सर्वांना वेड लावणारा गायक जस्टिन बीबर (Justin Bieber) सध्या एका गंभीर आजाराशी झुंज देतो आहे. जस्टिन बीबर जगातील प्रसिद्ध पॉप गायकांपैकी एक आहे. अलीकडेच, गायकाने त्याच्या ‘जस्टिस’ या अल्बमच्या प्रमोशनसाठी जगातील अनेक देशांचा दौरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जस्टिनने काही दिवसांसाठी आपला दौरा पुढे ढकलला आहे. ही बातमी कळताच जगभरात पसरलेल्या त्याच्या चाहत्यांची निराशा झाली. मात्र, त्याने एक व्हिडीओ शेअर करत यामागचे कारण देखील सांगितले आहे. यातच त्याने आपल्या आजाराचा खुलासा केला आहे.


या व्हिडीओमध्ये, जस्टिनने त्याच्या चेहऱ्याला अर्धा चेहरा अर्धांगवायू झाला असल्याचे सांगितले आहे. जस्टिन बीबरने खुलासा केला की, तो रामसे हंट सिंड्रोमने ग्रस्त आहे, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्याला अर्धांगवायू झाला आहे.


पाहा व्हिडीओ



या व्हिडीओमध्ये आपल्या सध्याच्या स्थितीबद्दल बोलताना जस्टिन म्हणाला की, ‘तुम्ही बघू शकता, मी माझे डोळे देखील मिचकवू शकत नाही. माझ्या चेहऱ्याच्या या बाजूने मी हसूही शकत नाही. माझा शो रद्द होण्याचे हेच कारण आहे. बरेच लोक यामुळे निराश झाले आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो की, मी यावेळी शारीरिकदृष्ट्या सक्षम नाही. मला आशा आहे की, तुम्ही लोक मला समजून घ्याल.’


जस्टिन म्हणाला की, यातून बरे होण्यासाठी किती वेळ लागेल हे माहित नाही. तथापि, तो विश्रांती आणि थेरपीद्वारे यातून बरा होत आहे. तो म्हणाला की, सध्या मी फक्त विश्रांती घेत आहे आणि पूर्णपणे बरा होण्याचा आणि सेटवर परत येण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून मी जे करण्यासाठी जन्मलो ते करू शकेन.’ याच वर्षी मार्चमध्ये जस्टिन बीबरची पत्नी हेलीला मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.


पुन्हा एकदा दौरा पुढे ढकलला!


बीबरचा दौरा पुढे ढकलण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याचा या आधीचा दौरा कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आला होता. जस्टिनचा दौरा 2020मध्ये सुरू होणार होता. परंतु, जगभरात पसरलेल्या कोरोना साथीच्या आजारामुळे आधीच 2021पर्यंत उशीर झाला होता. नंतर, पुन्हा एकदा 2022पर्यंत पुढे ढकलला गेला होता आणि आता पुन्हा एकदा दौरा रद्द झाल्याने त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे.


रामसे हंट सिंड्रोम (Ramsay Hunt syndrome) म्हणजे काय?


रामसे हंट सिंड्रोम (RHS) हा एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे. यामध्ये कानाभोवती, चेहऱ्यावर किंवा तोंडावर पुरळ येतात, जे वेदनादायक असतात. याशिवाय रुग्णाच्या चेहऱ्यावर अर्धांगवायूही होऊ शकतो. यामुळे बहिरेपणाची गंभीर समस्याही उद्भवू शकते. जेव्हा, व्हेरिसेला-झोस्टर विषाणू डोक्याच्या मज्जातंतूंना संक्रमित करतो, तेव्हा हा दुर्मिळ आजार होतो.


संबंधित बातम्या