मुंबई : कोरोनासारख्या महामारीच्या काळात आता पावासाळी आजारांनीही डोकं वर काढलं आहे. पावसाळ्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या विषाणुजन्य रोगांच्या प्रकरणांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. तसेच बुरशीजन्य, उघड्यावरील अन्न आणि पाण्यामुळे होणारे रोग आणि इतर त्वचेच्या संक्रमणात वाढ झाली आहे. या आजारांची लक्षणं काहीशी कोरोना सारखीच असल्यानं अशी लक्षणे आढळून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे. कोविड-19 आणि मलेरिया किंवा/ डेंग्यूचं एकाच वेळी होणारं संक्रमण रोखणं ही काळाची गरज आहे. कोविड -19च्या प्रोटोकॉलचं पालन करा आणि संसर्ग होण्याची शक्यता टाळण्यासाठी वैयक्तिक स्वच्छता ठेवा, असं तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.


पावसाळ्यामुळे मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया सारख्या विषाणुजन्य रोगांच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच बुरशीजन्य, उघड्यावरील अन्न आणि पाण्यामुळं होणारे रोग आणि इतर त्वचेच्या संक्रमणातही वाढ झाली असल्याचं मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यात 357 मलेरिया रूग्ण आढळले होते. तर जुलै अखेरच्या आठवड्यात मलेरियाचे 557 रूग्णांची नोंद झाल्यानं चिंता वाढली आहे. एकूण रुग्णांमध्ये 57 टक्के वाढ झाली असून इतर पावसाळी आजारांत 20 ते 30 टक्के वाढ झाल्याचं समोर येत आहे. दरम्यान गॅस्ट्रोचे 221 रूग्ण, 29 लेप्टो, 19 डेंग्यू, 34 काविळ आणि 6 एच1एन1 चे रूग्ण आढळले.


कोहिनूर हॉस्पिटलचे वरिष्ठ फिजीशियन डॉ. शरद कोलके सांगतात, दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात शहरातील मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस, कावीळच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असते. या आजारांमध्ये ताप, अतिसार, उलट्या होणं, डोकेदुखी आणि सांधेदुखीसारखी लक्षणं दिसून येतात. खोकला, वास तसेच चव जाणं किंवा घसा खवखवल्यासारखी अतिरिक्त लक्षणं कोविड -19 च्या निदानात मदत करू शकतात. सम लक्षणांमुळे कोविड रुग्ण ओळखून त्यादृष्टीने अचूक उपचार करणं आव्हनात्मक ठरत आहे. डेंग्यू आणि मलेरियाला दूर ठेवण्यासाठी, डासांच्या उत्पत्तीची ठिकाणं शोधून ती काढून टाकली पाहिजेत. पाणी वाहून जाण्यासाठी योग्य व्यवस्था आहे, याची खात्री करून घ्या. डासांपासून बचाव करण्यासाठी पूर्ण बाहीचे कपडे घाला आणि डास प्रतिबंधक जाळी वापरा. तसेच, वेळोवेळी फवारणी करण्याचीही गरज आहे.


चेंबूरच्या झेन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे जनरल फिजीशियन तसेच संसर्गज्य रोग तज्ञ डॉ. विक्रांत शहा म्हणाले की, "सध्या आमच्याकडे डेंग्यू आणि मलेरियाची लागण झालेले रुग्ण वाढत चालले आहेत. गेल्या दोन आठवड्यांत डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आमच्याकडे उपचाराकरिता आलेल्या रुग्णांपैकी एकाला लेप्टोस्पायरोसिसचे निदान झाले होते. जर लोकांचा ताप 2-3 दिवसांत कमी होत नसेल तसेच थंडी, पुरळ येणं, डोकेदुखीशी होत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांनी अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. ही लक्षणं मलेरिया, डेंग्यूची देखील असू शकतात. लहान मुलं आणि वृद्धांकडे त्वरित लक्ष दिलं पाहिजे. पावसाळ्यात ताप उलट्या आणि जुलाब आणि डोळे पिवळसर होणं, कावीळ सारखी लक्षणं दिसताच पोटविकार तज्ञांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधोपचार करा स्वतःच्या मर्जीने उपचार करू नका.


गॅस्ट्रोइंटेस्टाइनल इन्फेक्शन टाळण्यासाठी, हातांची स्वच्छता राखा, फक्त उकळलेले पाणी प्या, शिळं, कच्चं किंवा दूषित अन्न खाणं टाळा किंवा दुषित पाणी, रस्त्यावरील पेय, द्रव पदार्थांचे सेवन टाळा. शिळे आणि उघड्यावरचे अन्नपदार्थ खाऊ नका. गॅस्ट्रो आणि कावीळ यासारखे विकार टाळण्यासाठी कमी शिजवलेले अन्न खाऊ नका. खराब पाण्यात जाऊ नका, लसीकरण टाळू नका, लेप्टोस्पायरोसिसला कारणीभूत असलेल्या उंदीरांना दूर ठेवण्यासाठी कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, असंही डॉ. शहा यांनी स्पष्ट केलं आहे.