मुंबई : गर्भधारणेच्या वेळी जेव्हा पुरूषाचे स्पर्म स्त्रीच्या एग म्हणजे अंड्याशी जुळतात, तेव्हा महिला आणि पुरुषांचे गुणसूत्र एकत्रितपणे मुलाचे लिंग निर्धारित करतात. बाळाचे गुप्तांग विकसित होण्यासाठी काही आठवडे लागू शकतात. सेल-फ्री डीएनए प्रीनेटल स्क्रीनिंगच्या माध्यमातून 10 आठवड्यामध्ये बाळाचे लिंग निश्चित होऊ शकतं. पण 18 ते 22 व्या आठवड्याच्या दरम्यान बाळाचे लिंग निदान होते.


10 व्या आठवड्यात अंदाज येतो


प्राचीन काळी स्त्रियांचे चालणे, बसणे, उठणे आणि त्यांच्या पोटाच्या आकारावरून मुलगा होणार की मुलगी याचा अंदाज लावला जायचा. परंतु शास्त्रज्ञ या गोष्टी पूर्णपणे चुकीच्या मानतात. कारण यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे मिळालेले नाहीत. बाळाचे लिंग हे सुरुवातीच्या 10 आठवड्यांपर्यंत निश्चित होते. परंतु सामान्यतः गर्भधारणेच्या 18 व्या आणि 22 व्या आठवड्यादरम्यान त्याचे निदान  होते.


महिला गर्भवती असताना ती आपल्या बाळाच्या लिंगाबद्दल उत्सुक असणे स्वाभाविक आहे. ज्या क्षणी गर्भधारणा चाचणी सकारात्मक येते तेव्हापासून अनेकांना त्यांच्या बाळाचे लिंग जाणून घ्यायचे असते. असं असलं तरी त्यासाठी नऊ महिने प्रतीक्षा करणे हाच चांगला काळ आहे. कायद्याने लिंग परीक्षण करणे गुन्हा आहे. 


पुरुषाच्या गुणसूत्रावर बाळाचे लिंग अवलंबून 


खरं तर, बाळ जेव्हा गर्भाशयात असते तेव्हा अनेकदा गर्भात मुलगा आहे की मुलगी याचा अंदाज लावला जातो. पण मेडिकल सायन्समध्ये या अंदाजाला कोणतेही महत्व नाही. वैद्यकीय शास्त्रानुसार गर्भ मुलगा आहे की मुलगी हे सर्वस्वी पुरुषाच्या गुणसूत्रांवर अवलंबून असते. 


गर्भवती महिलेच्या गर्भाशयात असलेल्या मुलाचे लिंग पूर्णपणे पुरुषाच्या गुणसूत्राद्वारे निर्धारित केले जाते. प्रत्येकामध्ये गुणसूत्रांच्या 23 जोड्या असतात. महिलांमध्ये XX गुणसूत्र असतात. तर पुरुष गुणसूत्र XY आहेत. जेव्हा स्त्रीचे X आणि पुरुषाचे Y गुणसूत्र एकत्र येतात तेव्हा XY गुणसूत्र तयार होते. यामुळे मुलगा होतो. जर स्त्रीचे X आणि पुरुषाचे X  गुणसूत्र एकत्र आले तर मुलगी जन्माला येते. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की कोणत्याही नवजात बाळाचे लिंग पुरुषावर अवलंबून असते.


गर्भधारणेच्या 18-20 आठवड्यात अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून लिंग निदान होऊ शकते.  त्याला अॅनाटॉमी स्कॅनही म्हटलं जातं. या दरम्यान मुलगा की मुलगी आहे हे गुप्त ठेवलं जातं. कायद्याने तशी बंदी आहे. 


गर्भधारणेच्या 10 आठवड्यांपूर्वी मुलाला काही अनुवांशिक रोग आहे की नाही हे तपासले जाते. त्याला सेल-फ्री डीएनए प्रीनेटल स्क्रीनिंग म्हटलं जातं. या टेस्टला  X आणि Y टेस्ट म्हणूनही ओळखले जाते. हे शरीराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. XX गुणसूत्र असल्यास जन्माच्या वेळी मुलगी मानले जाते आणि XY गुणसूत्र असल्यास मुलगा मानले जाते.



Disclaimer : बातम्यांमध्ये दिलेली माहिती ही काही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कोणतीही सूचना अंमलात आणण्यापूर्वी, आपण संबंधित तज्ंज्ञाचा सल्ला घ्यावा.