Chikungunya Vaccine:  चिकनगुनिया रोखण्यासाठी आता लवकरच लस उपलब्ध होणार आहे. कारण, चिकनगुनिया लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झालीय. डेन्मार्कमधील  Bavarian Nordic या कंपनीने आज याबाबतची माहिती दिली. चिकनगुणिया लस चाचणीचे सकारात्मक परिणाम समोर आले आहेत. लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली आहे. Bavarian Nordic कंपनीने 65 किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींवर या लसीची चाचणी केली असून त्यामध्ये सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. वातावरण बदलल्यानंतर साथीच्या आजार थैमान घालतात.. त्यामध्ये चिकनगुनिया या आजाराचाही समावेश आहे. एडिस जातीचा डास चावल्यानंतर चिकनगुनिया होतो. चिकनगुनिया या आजाराला रोखण्यासाठी बाजारात लस उपलब्ध नाही. त्यामुळे आजाराच्या विविध लक्षणांवर स्वतंत्रपणे उपचार करावे लागतात. त्यामुळे चिकनगुनिया या आजाराचं गांभीर्य वाढतं.  Bavarian Nordic या कंपनीला मिळालेल्या यशामुळे चिकनगुनिया रोखण्यासाठी मदत मिळू शकते. CHIKV VLP (PXVX0317) 


चिकनगुनिया आजाराला रोखण्यासाठी Bavarian Nordic या कंपनीने तयार केलेली लस प्रभावी असल्याचे 12 जून रोजी लान्सेटमध्ये छापलेल्या रिपोर्टमध्ये म्हटलेय. या लसीमुळे लाखो लोकांना फायदा होणार आहे. या लसीमुळे अनेकांचा चिकनगुनिया आजारापासून बचाव होणार आहे. या लसीच्या मानवी परिक्षणामध्ये सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. लस घेतल्यानंतर 15 दिवसात 80 टक्के तर 28 दिवसात चिकनगुनिया झालेला व्यक्ती जवळपास 99 टक्के बरा होतो, असेही लान्सेटमध्ये म्हटलेय. Bavarian Nordic या कंपनीने 65 वर्ष अथवा त्यापेक्षा जास्त वयाच्या 430 जणांवर या लसीचे परिक्षण केलेय. या परिक्षणामध्ये सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. 22 दिवसानंतर त्या व्यक्तीच्या शरिरात अॅण्टीबॉडिज सक्रिय झाल्याचे दिसून आले. 


चिकनगुनियावर लस नाहीच 


चिकनगुनिया हा आजार प्रामुख्याने आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, भारतीय उपमहाद्वीप आणि अमेरिका यासारख्या भागात आढळतो. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या आजारावर कोणतीही लस मिळालेली नाही.  रिसर्चनुसार, Bavarian Nordic या कंपनीने विकसीत केलेली लसीचा एक डोस चिकनगुनिया आजार नष्ट करेल.    


चिकुनगुनियाची लक्षणे काय ?


चिकुनगुनिया हा एक विषाणूजन्य आजार आहे. हा ताप (CHIKV)विषाणूंमुळे होतो. एडीस इजिप्ती डास चावल्यानंतर हा आजार होतो. रोगाचे पहिले निदान टांझानिया येथे झाले. चिकनगुनिया आजार झालेल्या व्यक्तीला थंडी वाजून तीव्र ताप येतो, सांध्यांच्या ठिकाणी दुखणे अशी प्रमुख लक्षणे आहेत. चिकनगुनियातून सावरल्यानंतरही अनेकांना सांधेदुखीचा त्रास जाणवतो. ताप, तोंड, पाठ, पोट येथे पुरळ उठणे ही चिकनगुनियाची लक्षणे आहेत.