Health News : नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस (NASH) आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) यासारख्या समस्येवर उपचार करण्यासाठी डॉक्टर प्रथम रुग्णांना वजन कमी करण्याचा सल्ला देतात. वजन कमी केल्याने यकृतातील (Liver) चरबी, दाह, फायब्रोसिस किंवा जखम कमी होण्यास मदत होते. पौष्टिक पदार्थांची निवड करुन, तसेच आहारावर नियंत्रिण मिळवणे गरजेचे आहे. वजन कमी करुन नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजवर मात करता येऊ शकते. तुमच्या शरीराचे वजन कमीत कमी 3 ते 5 टक्क्यांनी कमी करुन यकृतातील चरबी कमी करता येते. जर तुम्हाला यकृताचा दाह कमी करायचा असेल, तर तुम्हाला तुमच्या शरीराच्या 10 टक्क्यांपर्यंत वजन कमी करण्याचा सल्ला दिला जातो.
एका वर्षाच्या कालावधीत आपल्या शरीराचे वजन 7 टक्के किंवा त्याहून अधिक हळूहळू कमी करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने जलद गतीने वजन कमी केल्यास नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीजवर विपरीत परिणाम पाहायला मिळतील. बहुतेक लोकांच्या यकृतामध्ये काही प्रमाणात चरबी असते, परंतु यकृतातील चरबीचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तेव्हा फॅटी लिव्हर आजार ओळखला जाऊ शकतो. हा विकार नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (एनएएफएलडी) म्हणून ओळखला जातो.
अतिरिक्त चरबीमुळे यकृताचे नुकसान होते. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त चरबीमुळे वीसपैकी एका व्यक्तीमध्ये यकृताचा तीव्र दाह होतो. हे नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिसच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे.
विषाणूजन्य हेपेटायटिस किंवा यकृत रोग यांसारखी दीर्घकाळ होणारा दाह यकृताला हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे फायब्रोसिस किंवा यकृतावर डाग पडतात. यकृताचा सिरोसिस असलेल्या रुग्णांना यकृताचा कर्करोग आणि यकृत निकामी होण्याचा धोका असतो आणि त्यांना यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.
वजन कमी करणं महत्त्वाचं
फॅटी लिव्हरची गुंतागुंत टाळण्यासाठी वजन कमी करणे महत्वाचे आहे. थेरपीच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहार आणि व्यायाम यांचा समावेश होतो. आठवड्यातून किमान 150 मिनिटे हार्ट-पंपिंग सारख्या क्रियाकलाप करण्याचा सल्ला दिला जातो. मद्यपान टाळणे आणि हेपेटायटिस ए आणि बी ची लस घेणे आवश्यक आहे. हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका कमी करण्यासाठी, नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस असलेल्या व्यक्तीने वेळीच मिदान व तज्ज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावे.
आहारातील बदल
फॅटी यकृत रोगामध्ये वारंवार लठ्ठपणा हे मूळ कारण असते. तुम्ही लठ्ठ असल्यास किंवा जादा वजन असल्यास त्याच्या शरीराचे वजन 3 ते 5 टक्के कमी करण्याचा सल्ला तज्ञ देतात. वजन कमी करुन तुम्ही तुमच्या यकृतातील चरबीचे प्रमाण कमी करु शकता.
- शिफारस केलेल्या प्रमाणात चरबीचा तुमचा दैनिक वापर मर्यादित करा. ट्रान्स आणि सॅच्युरेटेड फॅट्सपासून दूर राहा.
- ओमेगा-3 फॅटी अॅसिडस्, बदाम, एवोकॅडो किंवा एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईल हे यांचा आहारात समावेश करा.
- खूप जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट्सचे सेवन टाळा. पॅकेज्ड फूड, मिठाई आणि शर्करायुक्त पेयांचे सेवन टाळा.
- हळूहळू वजन कमी करणे योग्य राहिल. जलद वजन कमी झाल्यास तुमचा यकृताचा आजार आणखी वाढू शकतो.
- वजन कमी करण्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या
चरबी कमी करण्यासाठी जीवनशौलीत बदल करणे आवश्यक आहे. ते केवळ एक चांगली जीवनशैली जगण्यास आणि यकृतातील चरबी कमी करण्यात मदत करू शकत नाहीत, परंतु ते तुमचे सामान्य आरोग्य देखील सुधारतील आणि मधुमेहासह इतर लठ्ठपणा-संबंधित रोगांचे प्रमाण कमी करु शकतात.फॅटी लिव्हर रोग होण्याची शक्यता दिसून आल्यास त्यावर उपचार कसे करावे याबद्दल वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
- डॉ विक्रम राऊत, यकृत प्रत्यारोपण एचपीबी सर्जरी विभागाचे संचालक, मेडिकव्हर हॉस्पिटल्स, नवी मुंबई
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.