Covid Variant FLiRT Cases : कोरोनाची (Coronavirus) डोकेदुखी संपली असं कुठे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगात नवीन कोरोना व्हेरियंटमुळे चिंता वाढली असताना आता भारतातही नवीन कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. सिंगापूरमध्ये कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटच्या FLiRT प्रकाराचे रुग्ण आढळले होते. आता भारतातही कोरोनाच्या फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद झाली आहे.


भारतात नवीन फ्लर्ट व्हेरियंटचा शिरकाव


भारतात कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटच्या 300 हून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रात ओमायक्रॉनच्या फ्लर्ट व्हेरियंटचे सुमारे 100 रुग्ण आढळले आहेत. देशात फ्लर्ट व्हेरियंटच्या 324 रुग्णांची नोंद झाली आहे. देशात महाराष्ट्रासह गोवा, कोलकाता, ओडिसा, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात या राज्यांमध्ये नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत.


कोरोनाच्या नव्या लाटेने जगाची चिंता वाढवली


कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार समोर आला आहे. सिंगापूरमध्ये कोविडच्या नवीन लाटेचा उद्रेर झाला, त्यानंतर आता हा व्हेरियंट जगभरात पसरताना दिसत आहे. कोरोनाच्या नव्या लाटेने जगाची चिंता वाढवली आहे. सध्या, सिंगापूरमध्ये KP.1 आणि KP.2 ची दोन तृतीयांश प्रकरणांची नोद झाली आहे. जून महिन्याच्या मध्य आणि शेवटच्या दरम्यान कोविडच्या (COVID) लाटेचा उच्चांक दिसून येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. सिंगापूरमध्ये सध्या एका दिवसात नवीन कोरोना व्हेरियंटचे 25,000 हून अधिक सक्रिय कोविड रुग्ण आढळून येत आहेत.


भारतातही नवीन फ्लर्ट व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद


कोरोनाच्या नवीन फ्लर्ट व्हेरियंटचे रुग्ण भारतातही आढळले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतात आतापर्यंत 324 कोविड प्रकरणांची नोंद झाली. यामध्ये ओमायक्रॉनच्या KP.2 आणि KP1.1 सब-व्हेरियंटचे रुग्ण सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. ओमायक्रॉन सब-व्हेरियंट (Omicron sub-variant KP.2) चे महाराष्ट्रात 100 रुग्ण आढळून आले आहेत. नवीन सब-व्हेरियंटची लागण झालेल्यांमध्ये रुग्णांमध्ये पुण्यात सर्वाधिक 51 रुग्ण आढळले असून, ठाणे जिल्ह्यात 20 रुग्णांची नोंद झाली आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी सात प्रकरणांची नोंद झाली आहे.


ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन उपप्रकार KP.1 आणि KP.2 आढळले


गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर होती, मात्र आता पुन्हा एकदा प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अमेरिकन आरोग्य प्रशासन म्हणजेच यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या (CDC) ताज्या अहवालानुसार, कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे दोन उपप्रकार KP.1 आणि KP.2  आढळून आले आहेत, ज्याला FLiRT व्हेरियंट असं नाव देण्यात आलं आहे. युनायटेड स्टेट्स आणि सिंगापूरसह अनेक देशांमध्ये या नवीन कोरोना व्हेरियंटची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. वेगाने वाढणाऱ्या संसर्गामुळे सिंगापूरच्या आरोग्य मंत्रालयाने पुन्हा एकदा सर्व लोकांना मास्क घालण्याचे आवाहन केलं आहे. भारतातही हा व्हेरियंच हात-पाय पसरताना दिसत आहे.