नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. एका दिवसात देशात कोरोनाच्या नवीन सुमारे साडेतीन लाख रुग्णांची नोंद झाली आहे तर कित्येक संक्रमित लोकांचा मृत्यू होत आहे. मात्र, कोरोनाची लक्षणे असूनही त्यांची कोविड चाचणी निगेटिव्ह का येत आहे? हा प्रश्न लोकांना सतावत आहे.


कोरोना विषाणूची दुसरी लाट झपाट्याने पसरत असताना एखाद्याचा निगेटिव्ह रिपोर्ट खूप धोकादायक ठरू शकते. यामुळे उपचारांना विलंब होऊ शकतो आणि रुग्णाची स्थिती मध्यम ते गंभीर असू शकते. चुकीच्या निगेटिव्ह अहवालांमुळे संसर्ग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. सर्वप्रथम, हे माहित करुन घेऊ, की ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, तीव्र थकवा आणि अतिसार ही कोरोनाची सामान्य लक्षणे म्हणून पाहिली जातात. ही लक्षणे पाहून, कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.


दोन प्रकारच्या टेस्ट
आपल्यास कोरोना आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या उपलब्ध आहेत. आरटी-पीसीआर आणि अँटीजेन चाचणी. यापैकी डॉक्टर आरटी-पीसीआर चाचणी सर्वात योग्य मानतात.


आरटी-पीसीआर चाचणी काय आहे?
रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिअॅक्शन म्हणजेच आरटी-पीसीआर चाचणीमध्ये, नाक किंवा घशातून एक नमुना (स्वॅब) घेतला जातो. एकदा रुग्णाच्या नाकातून किंवा घशातून एखादा स्वॅब घेतला की तो द्रवपदार्थात ठेवला जातो. कापसावरील विषाणू त्या पदार्थामध्ये मिसळून त्यामध्ये सक्रिय राहतो. त्यानंतर हा नमुना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविला जातो.


100% कोणतीच चाचणी अचूक नाही
आरटी-पीसीआर चाचणी अत्यंत संवेदनशील असून बर्‍याच प्रमाणात योग्य अहवाल देते. मात्र, कोणतीही चाचणी 100% अचूक नसते. एखाद्या व्यक्तीला चुकीचा निगेटिव्ह अहवाल येण्याची अनेक कारणे आहेत. संशोधन असे दर्शविते की आरटी-पीसीआर चाचणी शरीरात व्हायरलची उपस्थिती शोधण्यासाठी चांगले कार्य करते. याची अचूकता अनेक घटकांवर अवलंबून आहे.


मानवी त्रुटी सर्वात मोठे कारण
कोविडची आरटी-पीसीआर (RT-PCR) चाचणी चुकीच्या येण्याला सर्वात मोठे कारण मानवी त्रुटी (human error) आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट प्रचंड वेगाने पसरत आहे. परिणामी रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत काहीवेळा स्वॅबचे नमुने घेणार्‍या लोकांना योग्यप्रकारे प्रशिक्षण दिले जात नाही. ते स्वॅब व्यवस्थित घेत नाहीत, ज्यामुळे कोरोना अहवाल नकारात्मक येऊ शकतो.


नमुना घेण्यामध्ये बेजबाबदारपणा
स्वॅब घेताना चूक होणे किंवा चुकीच्या पद्धतीने सँपल घेणे, व्हायरस सक्रिय ठेवण्यासाठी आवश्यक प्रमाणात द्रवपदार्थ नसणे, स्वॅब नमुन्यांची अयोग्य वाहतूक चुकीच्या अहवालासाठी कारणीभूत ठरू शकतात.


व्हायरलचा लोड कमी असणे
रोग प्रतिकारशक्ती व्यक्तीनुसार बदलू शकते. काही लोक दैनदिन काम करतानाही सौम्य तापाचा सामना करण्यास सक्षम असतात, काही लोकांना खोकला आणि सर्दी नसतानाही खूप त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे कोरोनामध्येही काही लोकांमध्ये बरीच लक्षणे दिसतात. मात्र, विषाणूचा लोड कमी असतो त्यामुळेही कोरोना चाचणी निगेटिव्ह येऊ शकते.


वाहतूक करताना नमुना खराब होणे
वाहतुकीदरम्यान कोल्ड-चेनचे योग्यप्रकारे व्यवस्थापन नसल्यास विषाणू सामान्य तापमानाच्या संपर्कात येऊन निष्क्रीय होऊ शकतो. त्यामुळेही रिपोर्ट निगेटिव्ह येतात.


टेस्टपूर्वी अन्नग्रहण करणे
कोविड -19 चाचणीपूर्वी काही अन्न किंवा पाणी पिल्याने आरटी-पीसीआरच्या चाचणीवर परिणाम होऊ शकतो.


जर टेस्ट नकारात्मक झाली आणि कोरोनाची लक्षणे राहिली तर काय करावे?
जर कोरोनाची लक्षणे दिसत असतील आणि चाचणी निगेटिव्ह असेल तर संपूर्ण काळजी घ्या. स्वत: ला आयसोलेटमध्ये ठेवा. तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात रहा. लक्षणे कायम राहिल्यास पहिल्या चाचणीनंतर 3-4 दिवसांनी पुन्हा चाचणी करा. ऑक्सिमीटर, थर्मामीटर आपल्याबरोबर ठेवा. सतत तपासणी करत रहा. जर आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी (SpO2) 91% च्या खाली गेली असेल तर आपल्याला रुग्णालयात जाणे आवश्यक आहे.