Mangoes Ripened With Calcium Carbide: मुंबई : आंबा (Mango)... म्हटलं की, कदाचितच कुणी असेल, जो नको म्हणेन. अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा अगदी नकोसा करतो, पण अनेकजण फक्त आणि फक्त आंब्यासाठीच उन्हाळ्याची वाट पाहत असतात. उन्हाळ्यात बाजारात गेलं की, चोहीकडे फक्त आंबेच दिसतात. रसरशीत, पिवळ्या धम्मक आंब्याची गोड फोड जीभेवर ठेवली की, जीवन अगदी सार्थकी लागल्यासारखं वाटतं. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का? की हे हवेहवेसे वाटणारे आणि ताजे दिसणारे आंबे बनावट, विषारी असू शकतात? हादरलात ना? थांबा गोंधळू नका... सविस्तर जाणून घ्या... 


तामिळनाडूमधील अन्न सुरक्षा विभागानं एका गोदामातून, एक, दोन नव्हे तर तब्बल 7.5 टन विषारी आंबे जप्त केले आहेत. आता प्रश्न असा आहे की, हे विषारी आंबे कोणते आहेत? ते कसे बनवले जातात आणि जर हे आपण खाल्ले तर काय होऊ शकतं? 


विषारी आंबा दिसतो कसा


विषारी आंबा म्हणजे, हा आंबा प्लास्टिक किंवा मातीपासून तयार केलेला नसतो. हे झाडावरचं फळच असतं. पण कृत्रिम पद्धतीनं पिकवलेलं असतं. हे आंबे झाडावरच येतात. ते झाडावरुन तोडले जातात. पण कृत्रिम पद्धतीनं म्हणजेच, रसायनांचा वापर करुन पिकवले जातात. कृत्रिम पद्धतीनं पिकवल्यामुळे आणि घातक रसायनांचा वापर केल्यामुळे त्यांना विषारी आंबे म्हटलं जातं.


दरम्यान, आंबा पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. महत्त्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे, कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावर बंदी आहे. कॅल्शियम कार्बाइड हे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन पिकवलेले आंबे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक असतात. 


विषारी आंबे कसे पिकवले जातात? 


विषारी आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर केला जातो. कॅल्शियम कार्बाइड बाजारात सहज उपलब्ध होतं. हार्डवेअरच्या दुकानातून अगदी सहज कॅल्शियम कार्बाइड खरेदी करता येतं. कॅल्शियम कार्बाइड हा एक प्रकारचा दगड आहे. अनेकजण याला चुनखडी असं देखील म्हणतात. कॅल्शियम कार्बाइडनं आंबे शिजवण्यासाठी कच्च्या आंब्यांमध्ये एका कापडात गुंडाळून ठेवलं जातं. 


कॅल्शियम कार्बाइड कापडात गुंडाळून आंब्यांभोवती ठेवल्यानंतर आंब्याची टोपली किंवा पेटी एखाद्या जाड कापडानं किंवा पोत्यानं बंद करुन ठेवली जाते. त्यानंतर तीन ते चार दिवस वारा नसलेल्या ठिकाणी ठेवतात. त्यानंतर ती पेटी उघडल्यानंतर सर्व आंबे पिकलेले असतात. असं होतं की, जेव्हा कॅल्शियम कार्बाइड आद्रतेच्या संपर्कात येतं, त्यावेळी एसिटिलीन वायू तयार होतो. ज्यामुळे फळं पिकतात. त्यामुळे झाडावर आंबे पिकण्याची वाट पाहावी लागत नाही. आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर करुन झटपट आंबे पिकवले जातात. आंबे पिकवण्यासाठी सर्रास वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाइडचा वापर मेटल कटिंग आणि स्टील उत्पादनात केला जातो.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


केमिकल्सनी पिकवलेला आंबा कसा ओळखायचा? 'हे' 5 सोपे उपाय