मुंबई : हल्ली प्रत्येकाचंच आयुष्य हे धावपळीचं झालं आहे.  या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनात आपण बऱ्याचदा आपल्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष करत असतो. पण कामा सोबतच आपल्याला आपला आहार, आरोग्य आणि शरीर याकडे देखील लक्ष द्यायला देणे आवश्यक आहे. कामानिमित्त प्रत्येक माणूस हा घरातून घाई गडबडीत न्याहारी (Breakfast) करुन घराबाहेर पडत असतो. बरेच लोक तर सकाळची न्याहारी देखील बाहेरच करतात. अनेकांना घरच्या जेवणाचा कंटाळा येतो. त्यामुळे ते बाहेरचे अन्न खातात पण सतत बाहेरचे तेलकट अन्न खाल्याने तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. 
     
 धावपळीच्या या जीवनात आहार आणि जीवनपद्धतीमध्ये असंख्य बदल झाल्याने अनेक नवनवीन शारीरिक आणि मानसिक व्याधी जन्माला येत असल्याचं पाहायला मिळतंय. यामुळे व्यायाम आणि योगाचे महत्व वाढत चालले आहे. सर्वांनाच निरोगी राहायला आवडते. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती वेळात वेळ काढून आपल्या आरोग्याची काळजी घेत असतो. अनेक लोक हे जिमला जातात. तसेच सध्या अनेक ठिकाणी योगा शिबीरं, व्यायामशाळा येथे नव नवीन उपक्रम राबवले जात असतात. पण व्यायाम आणि योगा सोबतच तुम्ही या पंचसूत्रीचे पालन देखील करु शकता ज्यामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. या पंचसूत्रींविषयी सविस्तर जाणून घेऊयात. 


1) जेवण 


जेवणामुळेच आपल्याला उर्जा आणि ताकद मिळते. त्यामुळे जेवण हे नेहेमी वेळेतच करायला हवे. तसेच आहारात सकस आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करावा. पालेभाज्या,  कंदमुळे, फळे यांचे सेवन करावे. त्याचबरोबर कमी किंवा जास्त प्रमाणात आहार घेऊ नये. शरीराला जितका आवश्यक आहे तेवढाच आहार घ्यावा. अती किंवा कमी आहार शरीरासाठी हनिकारक ठरू शकतो. त्यामुळे आहार हा नेहमी संतुलित असणे आवश्यक असते. 


2) झोप   


निरोगी शरीरासाठी झोप खूप महत्वाची असते. झोपेची कमतरता किंवा जास्त झोप घेणे आजारांचे कारण बनू शकते. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढीच झोप घ्यावी. रात्री जास्त वेळ जागरण करणे टाळावे आणि सकाळी लवकर उठावे. रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे ही उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे. 


3) व्यायाम 


आजच्या या धावपळीच्या जीवनात शारीरिक श्रम हे खूप कमी झाले आहेत. यामुळे अनेक लोकं व्यायामाला प्राधान्य देतात. शारीरिक श्रम कमी झाल्याने शरीराचा कुठल्याच प्रकारे व्यायाम होत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपला दिवसातला थोडा वेळ तरी व्यायामासाठी देणे आवश्यक आहे. प्रत्येकाने नियमितपणे व्यायाम करायला हवा. कारण, व्यायाम ही काळाची गरज बनत चालली आहे. योगा असो किंवा शारीरिक व्यायाम यासाठी प्रत्येकाने आपला दिवसातला थोडा तरी वेळ काढायला हवा. 


4) व्यसनांपासून लांब राहावे 


उत्तम आरोग्यादाठी व्यसनांपासून लांब राहिलेले कधीही चांगले. तंबाखू , सिगारेट, बिडी, दारू यांसारख्या व्यसनांच्या आहारी गेलेले लोक आपल्या आरोग्याचे स्वत:च शत्रू होतात. व्यसनाचे विपरीत परिणाम हे तुमच्या आरोग्यावर होऊ शकतात. तसेच व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना अनेक आजारांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शक्य तेवढे कुठल्याही व्यसनापासून लांब रहिलेले कधीही चांगले. 


5) चांगल्या सवयी 


प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला चांगल्या सवयी लावणे आवश्यक आहे. बाहेरुन आल्यावर स्वच्छ हात पाय धुणे, जेवताना हात धुवूनच जेवायला बसणे यांसारख्या सवयी स्वत:ला प्रत्येकाने लावायला हव्यात. तसेच आवश्यक त्या ठिकाणी स्वत:वर मर्यादा घालणे देखील आवश्यक असते. 
   
 या पंचसुत्रीचे जर तुम्ही पालन केलेत तर तुमचे आरोग्य हे नक्कीच निरोगी आणि चांगले राहण्यास मदत होऊ शकते.