Brain Tumor Symptoms:  ब्रेन ट्यूमर ही सध्याच्या काळात एक गंभीर समस्या बनली आहे. ब्रेन ट्युमर आजाराची (Brain Tumor Symptoms) काही लक्षण दिसून येतात. सामान्य वाटणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं हे एखाद्याच्या जीवावर बेतू शकते. किरकोळ डोकेदुखी देखील ब्रेन ट्युमरचे लक्षण असू शकते. 
सतत डोकेदुखी होत असेल, मग ती डोकेदुखी सौम्य असो वा तीव्र.. सतत त्रास जाणवत असेल उशीर न करता ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. 


ब्रेन ट्यूमरवर (Brain Tumor ) अद्याप कोणताही इलाज नाही. या आजाराचे तीन टप्पे आहेत. या आजाराचे वेळीच निदान झाल्यास प्राण वाचू शकतात. 
परंतु जर तुम्ही त्याच्या लक्षणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले तर तुमच्या जीवावरही बेतू शकते.


ब्रेन ट्यूमर म्हणजे काय?


ब्रेन ट्यूमरमध्ये मेंदूतील ऊती असामान्यपणे वाढू लागतात. मेंदूमध्ये अनियंत्रितपणे वाढणाऱ्या गाठीला ब्रेन ट्युमर म्हणतात. 


ब्रेन ट्युमरचे प्रकार


ब्रेन ट्युमरचे काही प्रकार आहेत. बेनाइन आणि मॅलिग्नंट असे ब्रेन ट्युमरचे प्रकार असतात. बेनाइन म्हणजे साधी गाठ आणि मॅलिग्नंट म्हणजे कर्करोगाची गाठ असते. मेंदूतील गाठ ही मेंदूतच विकसित होत असेल तर त्याला प्रायमरी ब्रेन ट्युमर म्हणतात. जर, शरीरातील अन्य भागातून गाठ मेंदूत तयार होत असेल तर त्याला सेकेंडरी अथवा मेटास्टॅटिक ब्रेन ट्युमर म्हणतात. 


ब्रेन ट्युमरची सुरुवातीची लक्षणे 


सुरुवातीला किरकोळ डोकेदुखी होते. 


त्यानंतर काही काळानंतर डोकेदुखीचा आजार तीव्र होतो.


चक्कर येणे, उल्टी होणे


दृष्यमानता कमी होणे, अंधुक दिसणे, वस्तू  दोन-दोन दिसणे


एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यास त्रास होणे


ऐकण्याची क्षमता, चव किंवा वास कमी होणे


चेहरा, हात किंवा पाय मध्ये अशक्तपणा जाणवने आदी लक्षणे ब्रेन ट्युमरशी निगडीत आहेत.


ब्रेन ट्यूमरशी संबंधित चाचणी


ब्रेन ट्युमरचे निदार करण्यासाठी काही चाचण्या आहेत. डॉक्टर रुग्णांची लक्षणे पाहून चाचणी करण्यास सांगतात. 


सीटी स्कॅन, एमआरआय स्कॅन, एंजिओग्राफी, एक्स-रे आदी विविध चाचण्यांच्या माध्यमातून ब्रेन ट्युमर झाला आहे की नाही याचे निदान करता येते. 


उपचार पद्धत


शस्त्रक्रिया : ब्रेन ट्युमरवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करता येणे शक्य आहे. ट्युमरचा आकार लहान असेल तर शस्त्रक्रिया होते. कर्करोगाची गाठ असल्यास, कर्करोगाचा फैलाव अधिक झाला नसल्यास शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला जातो. 


रेडिएशन थेरपी :  एक्स-रे किंवा प्रोटॉन सारख्या रेडिएशनचा उपयोग ट्यूमरच्या ऊतींना मारण्यासाठी केला जातो. याला रेडिएशन थेरपी म्हणतात.


केमोथेरपी - केमोथेरपीमध्ये, ट्यूमरच्या ऊतींना काढून टाकण्यासाठी औषधे वापरली जातात.


 


(Disclaimer : ही बातमी केवळ वाचकांच्या माहितीसाठी देण्यात आली आहे. आरोग्यासंबंधी एखादी समस्या, त्रास जाणवत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार घ्यावेत.)