Whats Is Dermatomyositis Symptoms: बॉलिवूड अभिनेता आमिर खानच्या ब्लॉक बस्टर चित्रपट दंगलमध्ये बबिता फोगटची भूमिका साकारणारी बालकलाकार सुहानी भटनागरच्या (Suhani Bhatnagar) मृत्यूनं सर्वांनाच धक्का बसला. सुहानी फक्त 19 वर्षांची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहानी डर्माटोमायोसायटिसनं त्रस्त होती. सुहानीची आई पूजा भटनागर यांनी सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी सुहानीला डर्माटोमायोसायटिसची (Dermatomyositis) लक्षणं दिसून आली. दोन महिन्यांपूर्वी सुहानीच्या डाव्या हाताला सूज आली होती आणि तिचा एक्स-रे तसेच अल्ट्रासाऊंडही करण्यात आला होता. हळूहळू सूज एका हातातून दुसऱ्या हातापर्यंत आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरू लागली. त्यानंतर सुहानीच्या काही तपासण्या केल्या, त्यातून तिला डर्मेटोमायोसायटिस झाल्याचं आढळून आलं.


डर्माटोमायोसिटिस (Dermatomyositis Symptoms) हा एक दुर्मिळ असा रोग असून या आजारानं पेशींमध्ये जळजळ होते. त्यामुळे स्नायू झपाट्यानं कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठतात. ही स्थिती कोणत्याही वयात उद्भवू शकते, सामान्यतः हा आजार प्रौढांमध्ये 40 ते 60 वर्ष आणि मुलांमध्ये 5 ते 15 वर्ष या वयोगटात दिसून येतो. जेव्हा हे लहान मुलांमध्ये आढळतं, तेव्हा त्याला ज्युवेनाईल डर्माटोमायोसिटिस (जेडीएम) म्हणतात. या आजाराचं निदान करणं हे कठीण आहे. याची लक्षणं कधीकधी चटकन दिसतात, तर कधीकधी ही लक्षणं दिसायला खूप वेळ लागतो. निदानातील विलंबामुळे नुकसान होऊ शकतं. तसेच, कधीकधी रुग्ण दगावण्याचीही शक्यता वाढते. 




पुण्यातील अल्फा सुपरस्पेशालिटी क्लिनिकमधील क्लिनिकल इम्युनोलॉजी आणि बालरोग संधिवातशास्त्र डॉ. हिमांशी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, डर्माटोमायोसिटिसच्या लक्षणांमध्ये त्वचेवर पुरळ येणं, जे सामान्यत: चेहरा, बोटं, कोपर, गुडघे, छाती आणि पाठीवर दिसून येतात. हे पुरळ जांभळ्या किंवा लालसर रंगापासून ते खपलीयुक्त पुरळ असू शकतात. त्वचेवर पुरळ येण्याव्यतिरिक्त, डर्माटोमायोसिटिस असलेल्या व्यक्तींमध्ये अनेकदा स्नायू कमकुवत होतात. यामध्ये नितंब, मांड्या, खांदे आणि दंड यांचा समावेश आहे. यामुळे बसलेल्या स्थितीतून अचानक उभं राहणं, पायऱ्या चढणं किंवा वस्तू उचलणं यांसारख्या सामान्य क्रिया करतानाही अडचणी येऊ शकतात.


डर्माटोमायोसिटिसचे नेमकं कारण माहित नसलं तरी, हा एक स्वयंप्रतिकार विकार आहे. ज्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून स्वतःच्याच स्नायूंवर आणि त्वचेवर हल्ला करते. लवकर निदान आणि उपचारानं या आजाराचं व्यवस्थापन करता येणं शक्य तसेच कॅल्सिनोसिस, फुफ्फुसाचा आजार यासारखी गुंतागुंत टाळण्यासाठी गरजेचं आहे.


डर्माटोमायोसायटिसवर उपचार काय? 


औषधोपचार : स्टिरॉईड्स ही उपचारांची पहिली पायरी ठरते, त्यानंतर आवश्यक असल्यास इतर इम्युनोसप्रेसिव्ह औषधे दिली जातात.


फिजीओ थेरेपी : स्नायूंची ताकद आणि कार्य सुधारण्यासाठी याची मदत होते


नियमित तपासणी : यामुळे भविष्यातील गुंतातगुंत रोखता येणे शक्य असून वेळीच निदानास मदत होते.


दरम्यान, ज्युवेनाईल डर्माटोमायोसिटिस बाबत जनजागृती वाढवणे ही गरजेचे आहे. या आजाराचे वेळीच निदान आणि उपचार झाल्यास प्रभावित मुलांचे जीवनमान सुधारण्यास मदत होते.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मुंबईच्या डॉक्टरांना मोठं यश, कॅन्सरशी दोन हात करण्यासाठी शोधली खास थेरपी