Health Tips : साबुदाणा (Sabudana) हा भारतीयांमध्ये एक अतिशय लोकप्रिय आणि आवडीचा खाद्यपदार्थ आहे. विशेषत: भारतामध्ये उपवासाच्या वेळी हा एक उत्तम खाद्यपदार्थ मानला जातो. पण साबुदाण्यामध्ये खरोखर काही पोषक घटक आहेत का, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. फक्त या पदार्थाचा प्रचार केला गेला म्हणून आपण याचं सेवन करतो. साबुदाणा खाणं खरच फायदेशीर आहे का? याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आहे, जाणून घ्या.


साबुदाणाबाबत तज्ज्ञांचं मत काय?


साबुदाण्याच्या फायद्यांविषयी बोलताना एक्सपर्ट क्रिस अशोक यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरील व्हिडीओमध्ये सांगितलं आहे की, त्यांना साबुदाणा खायला आवडतो. तो स्वादिष्ट देखील आहे. पण साबुदाणा म्हणजेच अतिशय अल्ट्रा प्रोसेस्ड स्टार्च आहे. जर तुम्ही उपवासाच्या वेळी ते खात असाल तर, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखर वाढेल, असा याचा अर्थ होत नाही. आता बाजारात मिळणारा साबुदाणा हा पारंपारिक साबुदाणा नाही. पारंपारिक साबुदाणा सुरुवातीला 1940 ते 1950 च्या दशकात उपलब्ध होता. आता तो मिळत नाही. क्रिस अशोक यांच्या मते, साबुदाणा खाणे चविष्ट वाटत असले तरी ते आरोग्यदायी नाही असं त्यांचं मत आहे.


साबुदाणा हा अत्यंत प्रोसेस्ड स्टार्चचा एक प्रकार आहे. आणखी एक आहार आणि पोषणतज्ज्ञ मुग्धा प्रधान यांनी देखील सांगितलं आहे की, साबुदाणा हा अत्यंत शुद्ध केलेल्या स्टार्चचा एक प्रकार आहे, जो कसावा किंवा साबुदाणा वनस्पतीच्या मुळांपासून मिळतो. ते इतके शुद्ध केलं जातं की, ते रक्तामध्ये फार लवकर शोषलं जातं आणि रक्तातील साखर वेगाने वाढतं. हे एक अतिशय उच्च ग्लायसेमिक अन्न आहे, म्हणजेच त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) इंडेक्स खूप जास्त आहे. GI म्हणजेच रक्तातील साखरेच्या पातळीचं मोजमाप.


'या' लोकांनी साबुदाणा खाणं टाळावं


मधुमेह आणि उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि हृदयविकार यासारख्या इतर चयापचयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी असे पदार्थ टाळावेत. जर तुम्हाला मधुमेह आणि चयापचयाशी संबंधित समस्या नसतील, तर तुम्ही संतुलित आहाराचा भाग म्हणून साबुदाणा खाऊ शकता. साबुदाणा हा कर्बोदकांचा चांगला स्त्रोत आहे आणि झटपट ऊर्जा देऊ शकतो. साबुदाणा ग्लूटेन-मुक्त आहे आणि पचायला सोपं आहे, ज्यामुळे लोकांना पचायला साबुदाणा पचायला सोपा जातो. 


साबुदाणा खाण्याचे तोटे


साबुदाण्याचे दररोज सेवन केले तर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी साबुदाणा खाणं टाळावं. साबुदाणा रक्तात लगेच शोषला जातो, त्यामुळे  साबुदाणाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असते. साबुदाण्यामध्ये कॅलरी आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढू शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.