मुंबई : भारतीय संस्कृतीत पान खूप लोकप्रिय आहे. अनेक जण जेवणानंतर माऊथ फ्रेशनर म्हणून पान खातात. भारतात पान खाण्याची खूप क्रेझ आहे. देशातील अनेक राज्ये आणि शहरे खास पानासाठी प्रसिद्ध आहेत. काहींना गोड पान खायला आवडते तर काहींना जर्दा पान खायला आवडते. त्याचा इतिहासही अनेक दशकांचा आहे. पण आता हळूहळू आधुनिकतेने खाण्याच्या सवयींमध्येही बदल केला आहे. त्यामुळे पानाचे ही आता विविध प्रकार पा मिळतात. यामध्ये चॉकलेट पान, आईस्क्रीम पान, फायर पान, स्मोक पान यांचा समावेश होतो.


स्मोक पानामध्ये असतं काय?


अलीकडे स्मोक पान खाणं एका 12 वर्षीय मुलीला महागात पडल्याची बातमी समोर आली आहे. बंगळुरूमधील एका मुलीला स्मोकिंग पान खाल्ल्यामुळे ऑपरेशन करावे लागले. स्मोक पान खाल्ल्यानं तिच्या पोटात छिद्र पडलं, यामुळे डॉक्टरांना तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. या स्मोक पानमध्ये नेमकं असतं काय आणि त्याच्या तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या पानात काय मिसळलं जातं, हे सविस्तर वाचा.


स्मोक पानमध्ये कोणतं रसायन किंवा वायू असतो?


स्मोक पानामध्ये द्रव नायट्रोजन वायू आढळतो. ऑक्सिजनप्रमाणेच नायट्रोजन वायूही वातावरणात मुबलक प्रमाणात असतो. हा वायू रंगहीन आणि चवहीन आहे. याला वैज्ञानिक भाषेत N2 असं म्हणतात. द्रव नायट्रोजन वायू म्हणजे जेव्हा नायट्रोजनचे तापमान -195.8 अंश सेल्सिअसच्या खाली जाते, तेव्हा ते द्रव स्वरूपात रूपांतरित होते. पृथ्वीवर तापमान कधीच इतके कमी होत नाही, त्यामुळे त्याचे कृत्रिमरित्या द्रवात रूपांतर होते. सध्या द्रव नायट्रोजन वायूचा वापर वैद्यकीय वापरात, ऑटोमोबाईल आणि अभियांत्रिकीसह अनेक ठिकाणी केला जातो.


खाण्यापिण्यातही द्रव नायट्रोजन वायूचा वापर


एका रिपोर्टनुसार, शेफ हेस्टन ब्लुमेन्थल यांनी त्यांच्या 'द फॅट डक' या रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये द्रव नायट्रोजन असलेले पदार्थ समाविष्ट केले. जसे- नायट्रो स्क्रॅम्बल्ड एग आणि आईस्क्रीम. त्यानंतर अनेक रेस्टॉरंट्सनी द्रव नायट्रोजन वायूचा वापर सुरू केला. तज्ज्ञांच्या मते, नायट्रोजन वायू शरीराला हानी पोहोचवत नाही, पण जेव्हा हा वायू द्रवात बदलतो तेव्हा त्याचे तापमान खूपच कमी होते. खूप थंडी असल्याने त्याचा योग्य वापर केला नाही तर शरीराला गंभीर हानी होऊ शकते.


आरोग्याशी खेळ करणे कितपत चांगलं?


अलीकडे खाण्याच्या सवयींमधील आधुनिकतेने त्या खाद्यपदार्थांचे वास्तव नष्ट केले आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. उदाहरणार्थ, बटाट्याऐवजी नूडल्स घालून समोसा चायनीज समोसा, पाणीपुरीमध्ये पाण्याऐवजी मॅगी टाकली जात आहे. असे अनेक प्रयोग खाद्यपदार्थांवर केले जात आहेत. यातील काही प्रयोग लोकांना खूप आवडले आहेत. पण प्रश्न असा आहे की शरीर सर्व प्रकारचे खाणेपिणे शरीरासाठी चांगले आहे का आणि आरोग्याशी खेळ करणे कितपत चांगलं आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.