Health Tips : पोटाचं आरोग्य जपायचं असेल तर हिंगाचे फायदे नक्की जाणून घ्या. हिंग पोटासाठी अतिशय फायदेशीर आहे. हिंगामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते, याशिवाय वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. आयुर्वेदामध्ये हिंगाचे अनेक फायदे (Hing Water Benefits) सांगितलेले आहेत. हिंगांच्या पाण्याचं सेवन करुन तुम्ही पोटाचं आरोग्य सुरळीत ठेवू शकता. कसं ते जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा.


हिंगाच्या पाण्याचे फायदे (Hing Water Benefits)


पचनासाठी फायदेशीर


पचनाशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या समस्यांपासून सुटका करण्यासाठी हिंगाचं पाणी फायदेशीर ठरते. अभ्यासानुसार हिंगाचा पाचक उत्तेजक प्रभाव असतो, ज्यामुळे लाळेचा स्राव आणि लाळेतील अमायलेस या एन्झायमची क्रिया वाढते. हे शरीरातील पित्त प्रवाह उत्तेजित करून आहार पचनास मदत करतात.


वजन कमी करण्यासाठी प्रभावी


हिंगाचं पाणी नियमितपणे प्यायल्याने वजन कमी करण्यास मदत होते. हिंगामध्ये लठ्ठपणाविरोधी गुणधर्म असतात, असं संशोधनात सिद्ध झालं आहे. याशिवाय हिंग चरबी कमी करण्यात प्रभावी असतो. याच्या मदतीने तुमचं वाढतं वजन नियंत्रित करता येतें.


चयापचय क्रिया सुधारते


हिंगाचं पाणी प्यायल्यानं चयापचय क्रिया सुधारते. अभ्यासानुसार हिंगामध्ये चयापचयासाठी महत्त्वाचे घटक असतात, यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत होते. ही क्रिया चयापचय सुधारू शकते. तुमची चयापचय क्रिया वाढवण्यासाठी कोमट पाण्यासोबत हिंगाचं सेवन करा. याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.


रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवा


हिंगामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवता येते. हिंगाचं पाणी प्यायल्याने साखर नियंत्रित ठेवण्यात मदत होते. संशोधनानुसार, हिंगाच्या पाण्याने रक्तातील साखर कमी होते. यात हायपोग्लाइसेमिक प्रभाव आहे, मधुमेहासाठी फायदेशीर आहे.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :