Heart Attack: हिवाळा (Winter) ऋतू हा तसा आल्हाददायक आहे. पण हवामानात बदल झाला की, अनेक आजार डोकं वर काढू लागतात. सध्या या हिवाळ्यात वातावरणातील प्रदुषणाचे प्रमाण वाढत आहे. ज्यामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळत आहे. अशात आता हृदयविकाराच्या रुग्णांना देखील अत्यंत काळजी घेणे आवश्यक आहे. कारण हिवाळ्यात हृदयविकाराच्या (Heart Attack) घटनांमध्ये सर्वाधिक वाढ होताना दिसत आहे. कसं टाळाल? काय खबरदारी घ्याल? याबद्दल नवी मुंबईतील मेडिकवर हॉस्पिटल्सच्या डॉ. ऋषी भार्गव यांनी महत्त्वाची माहिती दिलीय.
...म्हणून हिवाळ्यात हार्ट अटॅकचे प्रमाण वाढते
आरोग्य तज्ज्ञ सांगतात, हिवाळ्यातील दिवसात हवामानातील तापमान घटते. हिवाळ्यात कमी तापमानामुळे हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्त हळूहळू हृदयापर्यंत पोहोचते. ज्यावेळी रक्तपुरवठा मंदावतो आणि त्यावेळी रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या तयार होतात. अशा स्थितीत रक्तपुरवठा खंडित होऊन हार्ट अटॅक येतो. थंड वातावरणामुळे शरीरातील उष्णता टिकवून ठेवणे कठीण होते. अशा परिस्थितीमध्ये हायपोथर्मिया होऊ शकतो. ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते. परिणामी हृदयविकाराच्या झटका येण्याची संभावना असते. बाहेरचे तापमान थंड असेल तर शरीराची मज्जासंस्था सक्रिय होते. ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात ज्याला 'व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन' म्हणतात. रक्तदाब अचानक वाढतो आणि शरीरात असलेल्या इतर अवयवांना रक्त पंप करण्यासाठी हृदयाला अधिक मेहनत करावी लागते आणि अशा प्रकारे, एखाद्याला हृदयविकाराचा झटका येतो.
हिवाळ्यात हृदयविकाराच्या झटक्याचा धोका टाळण्यासाठी टिप्स
गरम कपडे घाला : हवामानासाठी अनुकूल असे कपडे परिधान करा. असे केल्याने तुम्हाला उबदार राहण्यास आणि हिवाळ्यात तुमचे हृदय सुरक्षित ठेवण्यास मदत होईल. टोपी, हातमोजे आणि स्वेटर घाला.
दररोज व्यायाम करा : रोजच्या शारीरिक हालचालींमुळे प्रतिकारशक्ती वाढते; शरीरातील उष्णता नियंत्रित करण्यास आणि तंदुरुस्त राहण्यास मदत करते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच व्यायाम करा. पण थंड वातावरणात व्यायाम टाळा. शिवाय, घरामध्येच राहणे आणि तीव्र थंडी टाळणे चांगले.
तुमच्या रक्तदाबाचे निरीक्षण करा : तुमचा रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो.
संतुलित आहार घ्या : ताजी फळे, भाज्या, कडधान्ये, शेंगा, संपूर्ण धान्य, बेरी, शेंगा, फ्लॅक्ससीड्स, पालक, गाजर आणि ब्रोकोली खा. गरम सूप प्या. जंक, मसालेदार, तेलकट आणि हवाबंद डब्यातील अन्नपदार्थ टाळा.
नियमित हृदय तपासणी करा : डॉक्टरांनी सांगितल्यानुसार दर 6 महिन्यांनी हृदय तपासणी करा. जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे
कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR): हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यासाठी सीपीआर तंत्राबद्दल जाणून घ्या आणि मद्यपान टाळा
हेही वाचा>>>
Cancer: सावधान! कॅन्सर होणाऱ्या गोष्टी लपल्यायत तुमच्याच घरात? 'या' 7 गोष्टींचा वापर तुम्ही तर करत नाही ना?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )