Health Tips : अलीकडेच जागतिक आरोग्य संघटनेनं असा दावा केला आहे की, जगभरात हृदयाशी संबंधित आजारामुळे ( heart diseases ) जास्त मृत्यू होतात. जगभरात हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे दरवर्षी 1.5 कोटी लोकांचा मृत्यू होतो. प्रत्येकी पाच लोकांपैकी चार जणांचा मृत्यू हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका आल्यामुळे होतो. यामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्या लोकांपैकी एक तृतीयांश लोक वयाची सत्तरी पूर्ण होण्याआधीच मरण पावतात. पण तुम्हाला हे माहिती आहे का की चांगल्या जीवनशैलीचा स्वीकार केला, तर हृदयविकाराशी संबंधित आजाराचं प्रमाण कमी करता येऊ शकतं.
अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राच्या (CDC) म्हणण्यानुसार, जीवनशैलीत काही आवश्यक बदल केले आणि सदृढ जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर हृदयाशी संबंधित आजाराचा धोका कमी केला जाऊ शकतो. आता तुम्हाला वाटू शकतं की कोणते बदल करण्याची आवश्यकता आहे ज्यामुळे हृदयाशी संबंधित आजारापासून सुटका होईल. यासाठी तुम्हाला काही पथ्य पाळावी लागणार आहेत. तुम्हाला शरीरातील रक्ताची पातळी आणि साखरेची पातळी तपासून घ्यावी लागणार आहे. याचं योग्य संतुलन राखण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हे सर्व बदल स्वीकारण्याची मानसिक तयारी असेल, तर हृदयविकारापासून दूर राहू शकता. याबद्दल सविस्तर माहिती घेऊया...
नियमित व्यायाम करा
तुम्हाला हृदयरोगापासून दूर राहायचं असेल, तर नियमितपणे व्यायाम करा. दररोज व्यायाम केल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते आणि उच्च रक्तदाब, रक्तातील साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल पातळी संतुलित राहते. त्यामुळे दररोज कमीत कमी 30 मिनिटे व्यायाम कराला हवं.
सिगारेटपासून दूर राहा
तुम्हाला सिगारेट पिण्याची सवय असेल, तर तात्काळ बंद करा. कारण सिगारेट पिल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांचा धोका असतो. तसेच सिगारेटमुळे हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका वाढतो. तुम्हाला जर सिगारेटचं व्यसन नसेल, तर चांगली गोष्ट आहे. पण इतर कुणी सिगारेट पित असेल तर तात्काळ बंद करायला हवं.
वजन नियंत्रित करा
अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राने (CDC) सांगितलं आहे की, ज्या लोकांच्या शरीराचं वजन मर्यादेपेक्षा जास्त आहे त्यांना हृदयाशी संबंधित आजाराचा जास्त धोका आहे. त्यामुळे वेळोवेळी वजन तपासणं खूप आवश्यक आहे. तुमच्या शरीराच वजन माहिती करून घेण्यासाठी तुमचा बॉडी मास इंडेक्स तपासून घ्या. कारण जास्त वजन वाढल्यामुळे ह्रदय आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो.
हेल्दी फूड आणि हेल्दी ड्रिंक्सचं सेवन करा
तुम्हाला आरोग्यसंपन्न जीवनशैलीचा अंगीकार करायचा असेल, तर सर्वप्रथम हेल्दी फूड आणि हेल्दी ड्रिंक्स घ्यायला सुरूवात करा. तसेच ताजी फळे आणि पालेभाज्या खायला सुरूवात करा आणि बाहेरचं जेवण करणे टाळा. फक्त फळे किंवा पालेभाज्या खाल्यामुळे फरक पडणार नाही, तर त्यासाठी मीठ आणि साखरेचं प्रमाण नियंत्रित करावं लागणार आहे.
नियमितपणे शरीरिक तपासणी करा.
हृदयाशी संबंधित आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमितपणे शारीरिक तपासण्या करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला नेमकी कोणती समस्या आहे, हे आधीच समजून येईल. त्यामुळे वेळोवेळी शारीरिक तपासण्या करून घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)