Health Tips : आरोग्‍यदायी, सर्वांगीण जीवन जगण्‍यासाठी प्रबळ रोगप्रतिकार शक्‍ती निर्माण करण्‍यासोबत राखण्‍याला प्राधान्‍य दिले जाते, जे अलिकडील काळात अत्‍यंत महत्त्वाचे बनले आहे. सौम्‍य संसर्गांमधून गंभीर आजार न होण्‍यासाठी पीडित व्‍यक्‍तींची रोगप्रतिकारशक्‍ती (Immunity) प्रबळ असणे अधिक महत्त्वाचे आहे. उत्तम, संतुलित पोषण प्रबळ रोगप्रतिकारशक्‍तीसाठी उत्तम स्रोत असले, तरी बहुतांश व्‍यक्‍तींना माहित नाही की, स्‍नायूंचे (Muscles) आरोग्‍य कमकुवत असल्‍यास त्‍याचा रोगप्रतिकारशक्‍तीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.


डॉ. इरफान शेख याबाबत सांगताना म्हणतात की, स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम असणे महत्त्वाचे आहे, कारण ते हालचालीमध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात आणि वय वाढत असताना शक्तिशाली व कार्यरत राहण्‍यासाठी स्‍नायूंचे संरक्षण महत्त्वाचे आहे. स्‍नायू रोगप्रतिकारशक्‍तीमध्‍ये देखील महत्त्वाची भूमिका बजावतात. स्‍नायू संयुगे निर्माण करतात, जी काही रोगप्रतिकारक पेशींची निर्मिती, सक्रियकरण व वितरणामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय स्नायू तणाव किंवा संसर्गादरम्यान शरीराद्वारे वापरल्या जाणार्‍या अमिनो आम्‍लाचे मुख्य स्‍त्रोत देखील आहेत.  वयाच्‍या चाळीशीनंतर पुरूष व महिला या दोघांच्‍या शरीररचनेमध्‍ये बदल होऊ लागतात. अधिक महत्त्वाचे म्‍हणजे शरीरामधील स्‍नायूशक्‍ती वेगाने कमी होऊ लागते.


गंभीर आजार स्‍नायूशक्‍ती कमी करू शकतात!


कमकुवत स्‍नायूशक्‍ती आणि प्रथिनांचे अपुरे सेवन यामुळे शरीराची दुखापत किंवा संसर्गाप्रती प्रतिकार कमकुवत होऊ शकतो आणि उदयोन्मुख संशोधन निदर्शनास आणते की, स्‍नायूशक्‍ती कमकुवत असल्‍यास रोगप्रतिकारशक्‍ती कमी होऊन आजार होण्‍याची शक्‍यता वाढू शकते. प्रत्‍येकाने वय वाढत असताना स्‍नायूंचे आरोग्‍य उत्तम ठेवण्‍याला आणि स्‍नायूशक्‍ती कमी होण्‍यास प्रतिबंध करण्‍याला प्राधान्‍य दिले पाहिजे. तसेच, गंभीर आजारांनी पीडित व्‍यक्‍तींनी याबाबत अधिक काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, गंभीर फुफ्फुसाचे आजार, मधुमेह, हृदयविषयक आजार इत्‍यादींसारखे आजार स्‍नायू कमकुवत करण्‍यासोबत स्‍नायूशक्‍ती कमी करू शकतात.


नियमितपणे व्‍यायाम करणे महत्त्वाचे!


आठवड्यातून किमान 150 मिनिटे पुरेसा व्‍यायाम करण्याचे लक्ष्‍य आणि संतुलित आहाराचे सेवन हे आरोग्यदायी राहण्‍यासाठी, स्‍नायूंना बळकटी देण्‍यासाठी, तसेच रक्‍तातील शर्करेचे व्‍यवस्‍थापन करण्‍यासाठी आवश्‍यक आहे. शारीरिक व्‍यायामाचे फायदे अनेक आहेत. संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, शारीरिक व्‍यायाम केल्‍याने लठ्ठपणा कमी होण्‍यास मदत होते. तसेच, आपले लिपिड प्रोफाईल, इन्‍सुलिन सेन्सिटीव्‍हीटी सुधारतात आणि रक्‍तदाब कमी होतो.


चेअर चॅलेंज टेस्‍ट ही देखील स्‍नायूशक्‍ती तपासण्‍यासाठी, स्‍नायू क्षमता जाणून घेण्‍यासाठी आणि वेळेवर योग्‍य उपाय अवलंबण्‍यासाठी सुलभ पद्धत आहे. अंदाजे 43 सेमी (1.4 फूट) उंची असलेल्‍या खुर्चीवर 5 सिट-अप्‍स करण्‍यासाठी लागणारा कालावधी तुम्‍हाला तुमच्‍या स्‍नायूशक्‍तीबाबत माहिती देऊ शकतो. उदाहरणार्थ, 40 ते 50 वर्षे वय असलेल्‍या पुरूषांना ही चाचणी करण्‍यास जवळपास 6.8 ते 7.5 सेकंद वेळ लागू शकतो आणि महिलांना ही चाचणी करण्‍यासाठी 6.9 ते 7.4 सेकंद वेळ लागू शकतो.


नियमित व्‍यायाम आणि आरोग्‍यदायी जीवनशैली सवयींचा अवलंब करण्‍याव्‍यतिरिक्‍त दैनंदिन जीवनात योग्‍य पोषण पद्धतींचा समावेश करणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी काही गोष्टी करणे महत्त्वाचे आहे.


* भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, प्रथिने आणि आरोग्‍यदायी फॅट्सने संपन्‍न संतुलित आहार सेवन करा. 


* चिकन, सीफूड, अंडी, नट, बीन्स किंवा दुग्धजन्य पदार्थ यांसारखे पुरेसे प्रथिनयुक्‍त पदार्थ सेवन करा. प्रौढांनी प्रत्येक प्रमुख आहारात सुमारे 15 ते 20 ग्रॅम प्रथिने घेतलेच पाहिजे. पण, 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्‍या प्रौढांना, विशेषत: आरोग्‍यविषयक आजार असलेल्‍यांना तरुणांना प्रौढांपेक्षा जास्त प्रथिनांची आवश्यकता असू शकते.


* व्हिटॅमिन सी, जस्त, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी यांसारख्या निरोगी रोगप्रतिकारक शक्‍तीला साह्य करणारे सूक्ष्म पोषक घटक असलेल्या दर्जेदार पदार्थांना प्राधान्य द्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.)


महत्वाच्या बातम्या :