मुंबई :  सिगरेट-बीडी न पिणाऱ्यांनाही फुफ्फुसाचा कर्करोग (Lung Cancer) होत असल्याचं एका अभ्यासात समोर आलं आहे. यामुळे फक्त सिगरेट-बीडी पिणाऱ्यांनाच (Smokers) नाही, तर न पिणाऱ्यांनाही (Non-Smoker) कॅन्सर होण्याचा धोका असतो, हे समोर आलं आहे. एका अभ्यासानुसार, भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या रुग्णांपैकी बहुतांश रुग्णांना धुम्रपान करण्याचं व्यसन नाही, मात्र तरीबी त्यांना कर्करोगाची लागण झाली आहे. भारतात कर्करोगाचं एक कारण अनुवांशिकता ही आहे, याशिवाय वायू प्रदूषण ही यामागचं महत्त्वाचं कारण आहे.


धुम्रपान न करणाऱ्यांनाही कर्करोगाचा धोका


द लँसेट इक्लिनिकल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, फुफ्फुसाचा कर्करोग झालेले बहुतांश रुग्ण सिगरेट किंबा बीडी पित नसल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण नॉन-स्मोकर्समध्येही जास्त असल्याचं यावरुन दिसून येतं. या अभ्यासामध्ये देशातील फुफ्फुसाचा कर्करोग असलेल्या रुग्णांसंबंधित डेटा गोळा करण्यात आला. यावरुन भारतातील कर्करोगाच्या रुग्णांबाबत अधिक माहिती समोर आली आहे.


सिगरेट-बीडी न पिणाऱ्यांनाही कर्करोगाचं निदान


या अभ्यासानुसार, जगभरात वायू प्रदूषणासह अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. द लँसेट इक्लिनिकल मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, दक्षिण-पूर्व आशियामधील डेटाच्या निरीक्षणावरुन समोर आलं आहे की, भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगाचे असलेल्या बहुतेक रुग्णांना धुम्रपानाची सवय नाही. म्हणजेच यातील बहुतांश रुग्ण सिगरेट किंवा बीडी पीत नाहीत.


धूम्रपान करणाऱ्यांना कर्करोगाचा धोका दुप्पट


या अभ्यासानुसार, जगातील 40 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 37 शहरे दक्षिण आशियातील आहेत. त्यापैकी चार शहरे एकट्या भारतातील आहेत. धूम्रपान न करणाऱ्या लोकांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका दुपटीने वाढतो, हे यावरुन सिद्ध होते. खराब हवा आणि अनेक पर्यावरणीय घटक कर्करोगास कारणीभूत ठरतात. या अभ्यासात 2022 च्या जागतिक वायु गुणवत्ता अहवालाचा संदर्भ देण्यात आला आहे.


हवामान बदलाचाही परिणाम


दरम्यान, 2022 मध्ये हवामानाशी संबंधित 81 आपत्ती आल्या. आशियातील नैसर्गिक आपत्तींनी सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांमध्ये चीन, भारत, इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि थायलंड यांचा समावेश आहे. या देशांमध्ये 2020 मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाच्या नवीन रुग्णांची संख्या सर्वाधिक होती, जी 9.65 लाखांहून अधिक आहेत. शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, येत्या काळात हवामान बदलामुळे हवेची गुणवत्ताही खालावत जाईल आणि फुफ्फुसाचा कर्करोगाचे प्रमाण वेगाने वाढेल, हे आशियासाठी मोठं आव्हान असेल.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.