मुंबई: H3N2 विषाणूमुळे होणाऱ्या फ्लूच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढत आहे, असे आयसीएमआरच्या अलीकडील अहवालांतून दिसून येत आहे. या विषाणू प्रकारामुळे दीर्घकाळ आजारपण येत आहे आणि अन्य विषाणू प्रकारांमुळे होणाऱ्या फ्लूच्या संसर्गाच्या तुलनेत या विषाणूने बाधित रुग्णांमध्ये रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण अधिक आहे . रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना या संसर्गातून न्युमोनिया, ब्राँकायटिस, फेफरे येणे यासारख्या गुंतागुंतींना सामोरे जावे लागण्याची शक्यता अधिक आहे. या गुंतागुंती झाल्यास काही रुग्णांमध्ये H3N2 प्राणघातकही ठरू शकतो . गेल्या तीन महिन्यांत एसएआरआयच्या 10 टक्के रुग्णांना, H3N2 प्रादुर्भावानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतींमुळे, ऑक्सिजनची गरज भासली, तर 7 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागले आहे.
H3N2 हा इन्फ्लुएंझा ए विषाणूचाच उपप्रकार आहे. दरवर्षी ऋतूबदलांच्या काळात होणाऱ्या तापमानातील बदलामुळे फ्लूचा विषाणू वाढीस लागतो आणि त्याचा वेगाने प्रसार होतो. दरवर्षी काही उपप्रकार अन्य उपप्रकारांच्या तुलनेत अधिक प्रसृत होतात. H3N2सह फ्लूचे सर्व विषाणू, संसर्ग झालेल्या व्यक्तीमार्फत पसरतात. प्रादुर्भाव झालेली व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकण्यातून किंवा बोलण्यातून हा विषाणू पसरतो. प्रादुर्भाव न झालेल्या लोकांनी, या विषाणूंनी दूषित अशा वस्तूला किंवा पृष्ठभागाला, स्पर्श केला आणि मग त्याच हाताने स्वत:च्या नाकाला किंवा तोंडाला स्पर्श केला, तरी विषाणूचा प्रसार होतो.
H3N2चा धोका अधिक असलेल्यांमध्ये, 5 वर्षांहून कमी वयाची मुले, वयस्कर लोक, गरोदर स्त्रिया तसेच मधुमेह, दमा, मूत्रपिंडाचे विकार, हृदयविकार आदी गंभीर आजार आधीपासून असलेले लोक, ह्यांचा समावेश होतो. ताप, खोकला, घशाला सूज येणे, नाक चोंदणे किंवा वाहणे, डोकेदुखी व अंगदुखी ही फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याची मुख्य लक्षणे आहेत. H3N2 प्रादुर्भाव झाल्यास ताप सामान्यपणे तीन दिवस राहतो पण खोकला 3 आठवड्यांपर्यंत लांबू शकतो.
अपोलो हॉस्पिटलमधील डॉ. विजय येवले (एमडी. डीसीएच) सांगतात, "5 वर्षांखालील मुलांना फ्लूसारखे प्रादुर्भाव पटकन होतात. या काळात H3N2 फ्लू वाढत आहे. अन्य फ्लूच्या विषाणूंच्या प्रादुर्भावांच्या तुलनेत या विषाणूचा प्रादुर्भाव झाला असता रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागण्याचे प्रमाण वाढू शकते. वैयक्तिक स्वच्छता व सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) ह्यांचे पालन करण्यासोबतच लसीकरण हाही फ्लूचा प्रतिबंध करण्याच्या प्रभावी मार्गांपैकी एक आहे. पालकांनी त्यांच्या डॉक्टरांशी ह्याबाबत चर्चा करावी."
आरोग्यसेवा कर्मचारी, गरोदर स्त्रिया, गंभीर आजारांनी ग्रासलेले लोक, 65 वर्षांहून अधिक वयाचे लोक तसेच 6 महिने ते 5 वर्षे या वयोगटातील मुले अशा धोक्याखालील गटांना हंगामी फ्लू लस देण्याची शिफारस अनेक आरोग्य यंत्रणा करतात. वारंवार हात धुणे, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तींशी संपर्क टाळणे असे अन्य काही उपाय डॉक्टरांद्वारे, H3N2चा प्रसाराचा प्रतिबंध करण्यासाठी तसेच तो रोखण्यासाठी, सांगितले जात आहेत.
Disclamer: ग्लॅक्सोस्मिथक्लाइन फार्मास्युटिकल्स लिमिटेड यांच्याद्वारे जनहितार्थ जारी. ह्या पत्रकात समाविष्ट माहिती ही केवळ सामान्य जागरूकतेसाठी दिलेली आहे. ह्यापैकी कोणत्याही मजकुराकडे वैद्यकीय सल्ला म्हणून बघितले जाऊ नये. तुमच्या अवस्थेविषयी काही शंका किंवा प्रश्न किंवा काही वैद्यकीय शंका असल्यास कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसीकरणासाठी दिलेली आजारांची यादी परिपूर्ण नाही, लसीकरणाच्या संपूर्ण वेळापत्रकासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांनी व्यक्त केलेले दृष्टिकोन/मते स्वतंत्र आहेत आणि त्यावर कोणत्याही संस्थेचा कोणत्याही पद्धतीने प्रभाव नाही.