Weight Loss Diet Plan : आजकाल कामामुळे ताणतणाव एवढा वाढला आहे की, तब्येतीकडे योग्य प्रकारे लक्ष देण्यासाही वेळ पुरतं नाही. त्यामुळे अपुरी झोप, निद्रानाश किंवा वजन वाढणे यांसारख्या समस्यांना बहुतेक जण बळी पडत आहेत. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत अनेक जण वाढत्या वजनाच्या अर्थात लठ्ठपणाच्या समस्येमुळे त्रस्त आहेत. यावर उपाय म्हणून अनेक जण व्यायाम तर काही जण डाएटिंगचा पर्याय निवडतात. मात्र. काही जणांना व्यायाम करण्यासाठी पुरेसा वेळ नसतो, तर काहींना व्यायाम हा पर्याय पटत नाही. अशा व्यक्तींसाठी ही बातमी आहे. तुम्हाला व्यायाम न करताही वजन कमी करता येईल. त्यासाठी काय करावं लागेल ते सविस्तर वाचा.


'या' पाच गोष्टी वापरू पाहा.


भाज्या (Vegetables)


हिरव्या भाज्यांचे आरोग्यासाठीचे फायदे प्रत्येकालाच माहित आहेत. भाज्या प्रत्येक स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात. या हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने तुम्ही वजन झपाट्याने कमी करण्यास मदत होते. दुपारच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी किंवा स्नॅक म्हणून भाज्या पॅनमध्ये भाजून तुम्ही खाऊ शकता. किंवा स्वच्छ धुऊन कच्च्या भाजांचेही सेवन करता येतं.
 
अक्रोड (Walnut)
अक्रोड खाल्ल्याने वजन झपाट्यानं कमी होण्यास मदत होते. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असतात. यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते. दररोज एक ते दोन अक्रोड खाल्ल्याने दिर्घायुष्य मिळते आणि निरोगी राहण्यासही मदत होते.
 
ब्लूबेरी (Blueberry)
ब्लूबेरी खाणं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे आपलं पोट भरतं आणि भूक कमी लागते. ब्लूबेरीचं सेवन केल्याने पोट भरलेलं वाटते, त्यामुळे आपण जास्तीचे अन्नपदार्थ खात नाही. ब्लूबेरीमध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी, फायबर, मॅंगनीज आणि इतर अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. ब्लूबेरी दह्यासोबतही खाऊ शकता. जेवणात कॅलरीज कमी घेतल्यास वजन वाढत नाही, त्यामुळे ब्लूबेरी वजन कमी करण्यात फायदेशीर ठरतं.
 
ओट्स (Oats)
ओट्समध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो. हा टाइप-2 मधुमेह असलेल्या लोकांसाठी चांगला असतो. ओट्समधील फायबरचे मुबलक प्रमाण वजन कमी करण्यास मदत करते आणि पचनक्रिया सुरळीत राखण्यास मदत करते. तुमच्या आहारात ओट्सचा समावेश केल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होण्यास मदत होईल.
 
सॅल्मन (Salmon)
सॅल्मन हा एक प्रकारचा मासा आहे. याला 'रावस' असंही म्हणतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्ही याचा आहारात समावेश करु शकता. यामध्ये आढळणारे ओमेगा-3 फॅटी अॅसिड वजन कमी करण्यास मदत करते. याशिवाय हे केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. सॅल्मन खाल्ल्याने पोट नेहमी भरलेलं वाटतं. ज्याद्वारे तुम्ही अतिरिक्त खाणं टाळता, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तुम्ही मासांहारी असाल तर याचा आहारात नक्की समावेश करा, याने वजन कमी होण्यास मदत होईल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.