Health Tips : सध्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दिवसेंदिवस डोळ्यांची साथ येणारे अनेक लोक सापडत आहेत. त्याचबरोबर डोळ्यांच्या आजारा संदर्भातच नवीन आजार समोर आला आहे तो म्हणजे कंजंक्टिवायटिस (Conjunctivitis). कंजंक्टिवायटिस, ज्याला पिंक आय (Pink Eye) असे देखील म्हणतात. ही कंजंक्टिवा (नेत्रश्लेष्मला) म्हणजेच डोळ्याच्या पांढऱ्या भागावरती असलेल्या पातळ ऊतींची आणि पापणीच्या आतल्या बाजूस दाह होण्याची शक्यता असते. 


या संदर्भात, सीएमओ आणि कॉर्निया कन्सल्टन्ट, आर जे संकरा आय हॉस्पिटलचे डॉ. गिरीश एस बुधरानी (Dr. Girish Budhrani) यांनी कंजंक्टिवायटिस संदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणतात, कंजंक्टिवायटिस हा डोळ्यांचा आजार कुणालाही होऊ शकतो. पण, लहान मुलांमध्ये आजार हा प्रामुख्याने जाणवू शकतो. हा मोठ्या प्रमाणात फैलावतो. पण, डोळ्यांची योग्य ती काळजी घेतल्यास आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यास यामुळे होणाऱ्या दूरगामी समस्या टाळता येऊ शकतात. हा संसर्ग प्रामुख्याने वातावरणामध्ये बदल झाल्याने होतो आणि बॅक्टेरिया किंवा वायरस सारख्या सूक्ष्म जीवाणूंमुळे हा आजार पसरतो.


कंजंक्टिवायटिसची लक्षणे : 


• कंजंक्टायवायटिस (नेत्रश्लेष्मला) वरती सूज येणे.
• डोळ्याचा पांढरा भाग किंवा पापणीचा आतील भाग लाल होणे.
• डोळ्यांची आग होणे आणि खाज सूटणे.
• धुसर दृष्टी आणि प्रकाशाप्रती संवेदनशीलता
• डोळ्यातून स्त्राव येणे.


कंजंक्टिवायटिसचा प्रतिबंध करण्याकरिता सूचना


• स्वच्छता राखणे: जसे नियमित पणे हात धुवावे आणि डोळ्यांना सारखा हात लावणे टाळावे.
• टॉवेल किंवा रूमाल: एकमेकांचा वापरू नये.
• उशीची खोळ नियमित पद्धतीने बदलावी.
• डोळ्यांची सौंदर्य प्रसाधने किंवा डोळ्यांची काळजी घेणाऱ्या वस्तू : एकमेकांच्या वापरू नये.


 कंजंक्टिवायटिस झाल्यास कोणती काळजी घ्यावी?


• संपूर्ण विलगनासह घरी राहून विश्रांती घ्यावी ज्यामुळे आजाराचा प्रादुर्भाव टाळता येऊ शकेल. 
• आपला टॉवेल/रूमाल कुणालाही वापरायला देऊ नये.
• आपले कपडे वेगळे धुतले जातील याची काळजी घ्यावी. 


• लक्षणे दिसून आल्यास स्वत:च्या मनाने औषध घेऊ नये नेत्रतज्ञांचा सल्ला घ्यावा.
• संसर्ग जाई पर्यंत दररोज उशीची खोळ बदलावी.
• संसर्ग झालेला डोळा बोटाने चोळू नये. आवश्यक असल्यास टिशुचा वापर करावा.
• डोळ्यावर आवरण किंवा डोळा झाकू नये. त्यामुळे संसर्ग बळावू शकतो. 
• डोळ्यात धूळ जाण्यापासून किंवा काही जाण्यापासून जपावे त्यामुळे त्रास वाढू शकतो.
• आजारावर योग्य तो उपचार घेणे महत्वाचे असते यामुळे डोळ्याच्या पडद्याच्या संसर्गाची तीव्रता कमी होते आणि दृष्टीवरती होणारी पुढील गुंतागुंत टाळता येऊ शकते.
• डोळ्यातून येणारा कोणताही स्त्राव स्टराईल वाईपच्या मदतीने पुसावा.


हा आजार एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिकडे सहज पसरू शकतो. पण योग्य वेळेला निदान झाल्यास काही चिंता नाही. हा आजार फक्त शरीर संपर्काद्वारे आणि स्त्राव संपर्काद्वारे फैलावू शकतो. जर तुम्हाला या संबंधित काही लक्षणं दिसल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.