Chia Seeds Health Benefits : वाढलेल्या वजन तसेच लठ्ठपणामुळे (Obesity) अनेकजण त्रस्त आहेत. वजन कमी करण्यासाठी अलिकडच्या काळात अनेक जण चिया सीड्सचा (Chia Seeds) वापर करताना दिसत आहे. चिया सीड्स पौष्टीक असण्यासोबतच वजन कमी (Weight Loss) करण्यासही खूप फायदेशीर आहेत. चिया सीड्समध्ये प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी ॲसिड, कॅल्शियम, तांबे, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात.


आरोग्यासाठी फायदेशीर चिया सीड्स 


चिया सीड्स केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाहीत तर ते आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरतात. चिया सीड्स साल्व्हिया हिस्पॅनिका (Salvia Hispanica) वनस्पतीच्या लहान काळ्या बिया असतात. याचा औषधी गुणधर्म आहे. चिया सीड्सचे उत्पादन मुख्यत: अमेरिका आणि चीनमध्ये होते. भारतातही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये काही ठिकाणी याचे उत्पादन घेतले जाते.


चिया सीड्सचे अनेक फायदे


चिया सीड्स चयापचय वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. चिया सीड्समध्ये असलेले फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट फॅट बर्न करण्याचे काम करतात. या बियांमध्ये कॅलरीजचे प्रमाणही कमी असते. चिया सीड्स खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण, हे खाण्याची योग्य पद्धत कोणती? चिया सीड्स दुधासोबत खाणे जास्त फायदेशीर आहे की, पाण्यासोबत याबाबत सविस्तर जाणून घ्या.


चिया सीड्स दुधात भिजवून खाण्याचे फायदे



  • चिया सीड्समध्ये कॅल्शियम देखील असते आणि दुधात देखील कॅल्शियम असते, त्यामुळे जर तुम्ही दुधात भिजवलेले चिया बिया खाल्ल्यानं तुमची हाडे मजबूत होतात.

  • चिया सीड्स आणि दूध यांचे एकत्रित सेवन केल्यानं थकवा आणि अशक्तपणा दूर होतो.

  • चिया सीड्समध्ये लोह आढळते, जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही चिया सीड्स दुधात भिजवून खाल्ल्यास लोहाची कमतरता दूर होते.


चिया सीड्स पाण्यात भिजवून खाण्याचे फायदे



  • चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

  • चिया सीड्सच् पाण्यासोबत सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. गॅस, बद्धकोष्ठता या समस्यांपासून सुटका होते.

  • जर तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून त्याचे सेवन केले तर ते तुमच्या हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. चिया सीड्समध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि अल्फा लिनोलेनिक ॲसिड हृदयासाठी फायदेशीर आहेत.

  • चिया सीड्स पाण्यात भिजवून सेवन केल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते, यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि त्वचा चमकदार होण्यास मदत होते.


दूध की पाणी चिया सीड्स कशासोबत खाव्यात?


तुम्ही चिया सीड्स पाण्यात किंवा दुधात भिजवून खाऊ शकता. दोन्हींपैकी कोणत्याही प्रकारे याचे सेवन केल्यास तुमचे नुकसान होत नाही. जर तुम्ही चिया सीड्स दुधात भिजवून त्याचे सेवन केले तर तुम्हाला चिया सीड्स आणि दुध दोन्हीचे फायदे मिळतील. तुम्हाला कॅल्शियमचा दुप्पट स्त्रोत मिळेल. पण तुम्ही चिया सीड्स फक्त पाण्यासोबत खाल्ले तरीही तुम्हाला फायदा होईल. तुम्ही तुमच्या आरोग्याचा विचार करून, तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच चिया सीड्सचे सेवन करा.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Health Tips : गॅस, पोट फुगणे आणि अपचन... चुकीच्या वेळी फळे खाल्ल्याने होतात 'या' समस्या, फळे खाण्याची योग्य वेळ कोणती?