Sonomammography : भारतात महिलांमध्ये स्तनांचा कर्करोग (Breast Cancer) सर्वाधिक प्रमाणात आढळतो. त्या खालोखाल गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Ovarian Cancer) प्रमाण जास्त आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीझ इन्फॉर्मेटिक्स अँड रिसर्चच्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम अहवालानुसार 2020 मध्ये भारतातील महिला कर्करुग्णांपैकी 39.2 % महिलांना स्तनांचा किंवा गर्भाशयाचा कर्करोग होता. उपलब्ध संशोधनानुसार, रेडिएशन, अमली पदार्थांचे सेवन, वाढते वय, स्थूलपणा, मद्यसेवन, अनुवंशिकता इत्यादी घटक स्तनांच्या कर्करोगासाठी कारणीभूत होते. 2020 मध्ये भारतातील अंदाजे दोन लाख महिलांना स्तनांचा कर्करोग झाल्याचे निदान झाले, या अंदाजानुसार 76,000 महिलांचा मृत्यू झाला. 2020 च्या नॅशनल कॅन्सर रजिस्ट्री प्रोग्रॅम रिपोर्टनुसार 2025 पर्यंत हा आकडा 2 लाख 30 हजारावर जाईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही भयावह आकडेवारी लक्षात घेता, स्तनांची अत्यंत काळजी घेणे महिलांना अत्यावश्यक आहे. त्यामुळे स्तनांची स्वतःहून नियमित तपासणी करावी आणि डॉक्टरच्या सल्ल्याने मॅमोग्राफी करावी. स्तनांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी तुमचे डॉक्टर तुम्हाला सोनोमॅमोग्राफी करण्याचाही सल्ला देऊ शकतात.


सोनोमॅमोग्राफी म्हणजे काय?


सोनोमॅमोग्राफी किंवा स्तनांची अल्ट्रासाऊंड तपासणी ही छेद न देता (नॉन-इन्व्हेजिव्ह) करण्याचे तंत्र आहे. या प्रक्रियेने स्तनांची तपासणी आणि स्तनांच्या आत होणाऱ्य रक्तप्रवाहाची तपासणी करता येते. स्तनांचा कर्करोग आणि स्तनांमध्ये असलेल्या विकृतीची तपासणीही या तंत्राने करता येते. या चाचणीच्या माध्यमातून स्तनांमधील गाठ किंवा गोळा समजू शकते. सोनोमॅमोग्राफी ही प्रभावी चाचणी आहे आणि सामान्य नसलेली गाठ असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही तात्काळ फाईन नीडल ॲस्पिरेशन सायटोलॉजी (एफएनएसी) चाचणी करु शकता.


कोणी करावी?


स्तनांमध्ये गाठ आढळली किंवा मांसल गोळा झाल्याचे जाणवले, स्तनांमधील ऊती खूप दाट असल्याचे जाणवले, स्तनांचा कर्करोगाची कुटुंबात पार्श्वभूमी असेल आणि स्तनांमध्ये सामान्य नसणारे बदल आढळले तर ही चाचणी करावी.


कशी करावी?


सोनोमॅमोग्राफी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कधीही करता येते. त्यासाठी खास तयारी करावी लागत नाही. या चाचणीमध्ये ती व्यक्ती चाचणी करण्याच्या टेबलवर आडवी होते. रेडियोलॉजिस्ट तिच्या स्तनांच्या भागात जेल लावते आणि खास प्रोबने (लिनिअर, हाय फ्रिक्वेन्सी प्रोब) स्तनांचा पूर्ण भाग आणि काखेच्या भागाची तपासणी करुन गाठ आहे का याची चाचपणी केली जाते.


सोनोमॅमोग्राफीचे फायदे 


ही चाचणी पटकन होते, वेदनारहित असते, सहज उपलब्ध असते आणि नॉन-इन्व्हेजिव्ह असते. 
या चाचणीने स्तनांच्या कर्करोगाचे निदान होऊ शकते. 
ही चाचणी खर्चिक नाही, यासाठी पूर्वतयारीची आवश्यकता नसते आणि स्तनांमध्ये विकृती असलेल्या महिलांसाठी हे महत्त्वाचे साधन आहे. 
स्तनांमध्ये गाठ असेल तर नियमित तपासणी करुन वैद्यकीय सल्ला घ्यावा. निदान लवकर झाले तर जीव वाचू शकतो.



डॉ. सुनिता दुबे, प्रख्यात रेडियोलॉजिस्ट आणि संस्थापक, मेडस्केपइंडिया


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.